सातारा निकाल : शिवेंद्रराजे भोसले साताऱ्यातून विजयी, दीपक पवार पराभूत

शिवेंद्रराजे भोसले

फोटो स्रोत, Facebook

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर जी लक्षवेधी पक्षांतरं झाली, त्यात राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचाही समावेश होतो. परंपरागत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व राहिलेल्या सातारा विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार होते.

यंदा भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवत असलेल्या शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपक पवार यांचा पराभव केला. भोसले यांना 1 लाख 18 हजार 5 मते मिळाली तर पवार यांना 74 हजार 581 मते मिळवता आली.

तब्बल 43 हजार 424 मताधिक्याने शिवेंद्रराजे यांनी विजय प्राप्त केला.

कशी राहिली लढत

1978 सालापासून 1999 पर्यंत अभयसिंहराजे भोसले हे सातारा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत असत. त्यानंतर 2004 सालापासून शिवेंद्रराजे भोसले इथून निवडून येतात.

2019 च्या म्हणजे यंदाच्या निवडणुकीतही शिवेंद्रराजे विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र, यंदा शिवेंद्रराजे भाजपच्या तिकिटावर उभे होते. त्यामुळं इथली निवडणूक रंगतदार झाली.

फोटो स्रोत, Facebook

शिवेंद्रराजे भोसले हे उदयनराजे भोसले यांचे चुलत भाऊ आहेत. ज्या मतदारसंघातून शिवेंद्रराजे भोसले आता निवडून येतात, तिथूनच त्यांचे वडीलच अभयसिंहराजे भोसले निवडून येत असत.

सातारा शहर, सातारा ग्रामीण आणि संपूर्ण जावळी तालुका असा मिळून सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघ तयार होतो. जसा डोंगराळ भाग आहे, तसाच सातारा शहराचा शहरी भागही या मतदारसंघात आहे. या मतदारसंघात पूर्वी दादासाहेब जगताप, बाबूराव घोरपडे, अभयसिंहराजे भोसले हे निवडून गेलेले आहेत.

शिवेंद्रराजे विरूद्ध दीपक पवार

सातारा विधानसभा निवडणूक दुरंगी होईल आणि तीही 2014 साली ज्या उमेदवारांमध्ये झाली त्याच. केवळ पक्ष बदलले, उमेदवार तेच आहेत. म्हणजेच, 2014 साली शिवेंद्रराजे हे राष्ट्रवादीकडून विधानसभेच्या रिंगणात होते, तर दीपक पवार हे भाजपकडून रिंगणात आहेत.

फोटो स्रोत, Facebook

शिवेंद्रराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपनं त्यांना तिकीटही दिलं. तर दुसरीकडे, गेल्यावेळी भाजपकडून लढलेले दीपक पवार यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि राष्ट्रवादीने त्यांना तिकीट दिलं.

शिवेंद्रराजेंना किती आव्हान?

विधानसभेसोबत सातारा लोकसभेची पोटनिवडणूकही लागल्यानं याचा फायदा दिपक पवारांना होण्याची शक्यता आहे. कारण जो फायदा लोकसभेला श्रीनिवास पाटलांना होईल, तोच दीपक पवारांना होण्याची शक्यता आहे. कारण दोन्ही ठिकाणी राजघराण्यातील व्यक्ती आहेत.

"दिपक पवार यांच्याकडे संस्था, ग्रामपंचायती किंवा असे काही नाहीय. शरद पवारांच्या करिष्म्यापलिकडे दीपक पवारांकडे ठोस असे काही दिसत नाही. दुसरीकडे, शिवेंद्रराजेंकडे जिल्हा बँक आहे, अजिंक्यतारा सहकारी कारखान्यावर त्यांचं वर्चस्व आहे, सहकारी सूतगिरीणी, पॉवर लूम आहे तसंच भाजपमध्ये गेल्यानं नगरपालिका ताब्यात आहे," असं साताऱ्यातील ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके सांगतात.

सातारा विधानसभा निवडणूक चुरशीची होईल, मात्र निकालात दीपक पवारांच्या तुलनेत शिवेंद्रराजे उजवे ठरतील, असा अंदाजही मांडके वर्तवतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)