निकाल विधानसभा निवडणुकीचा: भाजपच्या जागा का कमी झाल्या?

देवेंद्र फडणवीस Image copyright @Dev_Fadnavis

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर मतमोजणीमुळे कल स्पष्ट होत आहेत. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीमधून पुन्हा महायुतीचे सरकार राज्यात येईल हे स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पार्टीला 100 ते 101 जागांवर विजय मिळत असल्याचे दिसत आहे तर शिवसेनेच्या जागांमध्ये वाढ होईल असं दिसत आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला 122 जागा मिळाल्या होत्या त्यामुळे त्यांच्या जागांमध्ये आता घट होत आहे असं दिसून येत आहे. भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीत मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह इतर भागांमध्ये सर्वाधिक प्रयत्न केले होते.

भाजपच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष अमित शाह, अनेक केंद्रीय मंत्री आणि उत्तरप्रदेश, कर्नाटक, गोव्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन गेले. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा जास्त जागा मिळतील अशी शक्यता वर्तवली होती. त्याचप्रमाणे दोन्ही पक्षांना मिळून 200 पेक्षा एकत्रित जागा मिळतील असे संकेत एक्झिट पोलमधून मिळत होते.

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि मंत्री त्यांच्या महायुतीला 220 पर्यंत जागा मिळतील असं स्पष्ट सांगत होते. मात्र सकाळी 11 नंतर मात्र हे चित्र बदलत गेले. महायुतीला 164-165 पर्यंत जागा मिळतील असं दिसतं.

1)'भाजपची वाटत होती तितकी ताकद नव्हती'

भाजपची वाटत होती तितकी ताकद या निकालांमधून दिसत नाही. भाजप आणि शिवसेना यांच्यातलं सत्तेचं संतुलन फार नाजूक असेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस संपली अशी चर्चा आता करता येणार नाही असं मत राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.

2)शरद पवार यांचे लोकसभेनंतर सतत प्रयत्न

लोकसभेच्या निकालांनंतरचा काही काळ आठवला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळी भागाचे दौरे केले. लोकसभेचा निकाल आपल्याविरोधात जाऊनही लगेच कामाला लागणे, दारुण पराभव होऊनही राजकारणात उभं राहाण्याची तयारी जे राजकीय पक्ष, नेते दाखवतात, ते टिकून राहाण्याची शक्यता असते.. त्यामुळेच जेथे भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पर्याय आहे असं लोकांना दिसलं तिथं शक्य असेल तर लोक राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे उभे राहिले हे कारण भाजपच्या जागा कमी होण्याचं कारण असावं असं पळशीकर यांना वाटतं.

भाजपच्या जागा कमी होण्यामागे शरद पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी पक्ष कसा लढला हे सुद्धा कारण असावं असं मत पत्रकार श्रृती गणपत्ये व्यक्त करतात. आपण जर यांना मत दिलं तर ते सरकारविरोधात भांडतील, आपलं मत मांडतील असा विश्वास लोकांना वाटला. त्यामुळे लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान केलं असावं.

3)लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये वेगवेगळे मुद्दे-

विधानसभा निवडणुकीसाठीही पंतप्रधान आणि केंद्रीय नेतृत्वाने मुद्दे भाजपनं पुढं करण्याबद्दलही सुहास पळशीकर यांनी बीबीसी मराठीकडे मत व्यक्त केलं. ते म्हणतात, "नरेंद्र मोदी आणि पंतप्रधानांचं नेतृत्त्व हे लोकसभा निवडणुकीत महत्त्वाचे असणारे मुद्दे विधानसभा निवडणुकांत तितके प्रभावी नाहीत.

Image copyright FACEBOOK

"मतदानाची टक्केवारीचा विचार केल्यास राज्यात भाजपच्या मतांची टक्केवारी स्थिर दिसून आली तर तिचा विचार करणं आवश्यक आहे. केंद्र पातळीवर लोकसभा निवडणुकीत आम्ही भरभरून मतं मोदींना देतो मात्र विधानसभेसाठी मात्र आम्ही थोडं हातचं राखून ठेवतो असा अर्थ त्यातून निघतो."

या निकालांमधून भाजपचा विजय झाला किंवा विरोधी पक्षाला त्यांना अडवून धरणं जमलं असं काहीच म्हणता येत नाही. हा सामना अनिर्णित राहिला असं म्हणता येईल असंही पळशीकर म्हणाले.

4)कमी जागांवर निवडणूक लढवणे-

गेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढली होती मात्र यंदा दोन्ही पक्षांमध्ये युती असल्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या वाट्याला गेल्या वेळेपेक्षा कमी झाल्या आहेत. हा महत्त्वाचा मुद्दाही पळशीकर मांडतात.

ते म्हणाले, "यावेळेस त्यांना कमी जागा लढता आल्या. त्यामुळे त्यांनी 80 टक्के जागा जिंकल्या असं म्हटलं तरी त्यांच्या 125 पेक्षा कमीच जागा राहाणार होत्या हे साहजिक होतं." असंच मत भाजप प्रवक्ता आरती साठे यांनी व्यक्त केलं आहे. भारतीय जनता पार्टीने 165 जागाच यावेळेस लढल्या होत्या. त्यामुळे ता जिंकलेल्या जागा पाहाता भाजप आणि शिवसेनेचा स्ट्राइक रेट तोच असल्याचं मत त्या मांडतात.

Image copyright Getty Images

5)पक्षांतर आणि अंतर्गत धुसफूस-

भाजपला आज बसलेल्या फटक्यामागे पक्षांतर्गत धुसफूस हे कारण असावं तसेच ऐनवेळेला काँग्रेस-राष्ट्रवादीसारख्या इतर पक्षांमधून लोक आपल्या पक्षात घेणं हेसुद्धा कारण असावं असं मत गणपत्ये मांडतात. काँग्रेस-राष्ट्रवादीमधून ऐनवेळेला नेते पक्षात गेतल्यामुळे भाजपचे परंपरगत निष्ठावंत दुखावले गेले, असं त्यांना वाटतं.

6)स्थानिक मुद्दे महत्त्वाचे-

धर्मपाल मेश्राम, भाजप प्रवक्ते म्हणतात, "आमच्या पक्षानं मतदारांना गृहित धरलं नाही. आम्ही गेल्या पाच वर्षांमध्ये लोकांचा सन्मान करून जितकं काम करता येईल तितकं केलं. स्थानिक मुद्दे कधीकधी अचडणीचे ठरू शकतात. 2014 आणि 2019 या निवडणुकांची तुलना होऊ शकत नाही. त्यावेळेस आम्ही विरोधी पक्षात होतो आता आम्ही सरकारची कामं घेऊन लोकांच्या समोर गेलो आहोत. "

7)उन्माद पसंत नाही-

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित प्रामाणिकपणे प्रयत्न केले. सत्तेचा उन्माद लोकांन पसंत नाही. लोकांना जमिनीवर पाय ठेवून काम करणारे हवे असतात हे या निवडणुकीतून दिसून आलं असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं. पक्षांतराच्या निर्णयाला लोकांनी पाठिंबा दिलेला नाही. जे पक्ष सोडून समोर जाऊन उभे राहिले त्यांच्याबाबत लोकांनी अनुकूल निर्णय दिला नाही. सकृतदर्शनी ज्यांनी पक्षांतर केलं त्यांच्याबाबत नकारात्मक भावना व्यक्त झाली असं मत पवार यांनी व्यक्त केलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)