परळी निकाल: धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव कसा केला?

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे

फोटो स्रोत, Getty Images

परळी मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडेंचा पराभव झाला असून राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे विजयी झाले आहेत. निकालानंतर पंकजा मुंडेंनी पत्रकार परिषद घेत आपला पराभव मान्य केला.

"मतदारांनी दिलेला कल नम्रपणे स्वीकारते. हा माझ्यासाठी अनाकलनीय निर्णय आहे. मी ही निवडणूक जिंकू शकले नाही, हे सत्य आहे. लोकांचा कल स्वीकारणं क्रमपाप्त आहे. कदाचित मी स्वत:ला निवडून आणण्यासाठी सक्षम नव्हते. कार्यकर्त्यांनी शांत राहावं, पराभव जड जाईल. पण शांत राहावं. आता कोणत्याही गरीब माणसाच्या कामासाठी मी आहे. मी पराभव स्वीकारलाय, कार्यकर्त्यांनीही स्वीकारावा," असं पंकजा मुंडेंनी म्हटलं.

परळीत राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे आणि भाजपच्या पंकजा मुंडे यांच्यामध्ये चुरशीची लढत होती.

पंकजा मुंडे यांच्या पराभवाच्या कारणाविषयी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सांगतात, "पंकजा मुंडे यांचं सार्वजनिक व्यवहारातलं वर्तन सामान्य जनतेला आवडेललं नाही. पंकजा मुंडेंचा अहंकार, तसंच इमोशनल ड्रामाही परळीच्या जनतेला पसंत पडलेला दिसत नाही. खरं तर नमिता मुंदडा यांच्या भाजप प्रवेशामुळे पंकजा मुंडे विजयी व्हायला पाहिजे होत्या, पण तसंही झालं नाही."

"याशिवाय मतदानाच्या दोन दिवस अगोदर परळीत जो ड्रामा झाला, तो म्हणजे धनंजय मुंडेंना अडचणीत आणण्यासाठीचं कारस्थान आहे, अशी लोकांची समजूत झाली," चोरमारे पुढे सांगतात.

लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान यांच्या मते, "अँटी-इन्कम्बन्सी हे एक कारण पंकजा मुंडे यांच्या पराभवामागे आहे. पण भावा-बहिणीच्या वादाचा परळीतल्या जनतेला उबग आल्याचंही हे निकाल दाखवतात. खरं तर नेत्यांनी जनतेला गृहीत धरायला नको. पण, आपण विजयी होणारच असा भाजपच्या काही नेत्यांचा समज झाला होता. पण, परळीतल्या जनतेनं मात्र उमेदावाराच्या स्थानिक कामकाजाचं मूल्यमापन करून मतदान केलं आहे."

पंकजा मुंडेंचं सामान्य माणसाला व्यवस्थित अटेंड न करणं, त्यांच्या पराभवामागचा मुद्दा आहे, असं लोकसत्ताच्या औरंगाबाद आवृत्तीचे प्रतिनिधी सुहास सरदेशमुख सांगतात.

ते म्हणतात, "धनंजय मुंडे यांनी मतदारसंघात जाऊन सामान्यांच्या छोट्या-छोट्या तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न केला. पण, पंकजा मुंडेंचं मात्र याकडे दुर्लक्ष झालं. याशिवाय पंकजा मुंडेंचं सामान्य माणसाला व्यवस्थित अटेंड न करणं, हाही त्यांच्या पराभवामागचा मुद्दा आहे."

भाजपचं अंतर्गत राजकारण?

पंकजा यांचा पराभव हे भाजपचं अंतर्गत राजकारण आहे की, भाजपच्या मतदारांची पसंती हा प्रश्न असल्याचं संदीप प्रधान सांगतात.

ते म्हणतात, "भाजपचे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जेवढे काही उमेदवार होते, ते एक एक करून बाजूला पडत आहेत. आधी खडसे बाजूला झाले आणि आता पंकजा मुंडेंचा पराभव झाला आहे. मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे, असं पंकजा मुंडेंनी म्हटलं होतं. आता या उमेदवारांना घरी बसवणं हा भाजपच्या अंतर्गत राजकारणाचा भाग होता की, भाजपच्या मतदारांनीच या उमेदवारांना घरी बसवणं पसंत केलं, हा प्रश्न उरतो."

फोटो स्रोत, TWITTER@PANKAJAMUNDE

पण, सुहास सरदेशमुख यांच्या मते, "मतदारसंघातील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ही बाब परळीत कामाला आलेली नाही. मतदारांनी स्थानिक मुद्दे लक्षात घेऊन मतदान केलं आहे."

पुढे काय?

"पंकजा मुंडेंनी आत्मपरीक्षण करायला हवं. आता त्यांनी लोकांमध्ये जायला हवं. त्यांच्या समस्या सोडवण्याकडे लक्ष द्यायला हवं," विजय चोरमारे सांगतात.

फोटो स्रोत, FACEBOOK/DHNANJAY MUNDE

पण, पंकजा मुंडेंकडे आता कष्ट करण्यावाचून पर्याय नसल्याचं संदीप प्रधान सांगतात.

ते सांगतात, "पंकजा मुंडे या मुंडे कुटुंबातील सदस्य आहेत. आता त्यांचं विधानपरिषदेवर पुनर्वसन करून त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जातं का, राज्यपातळीवर एखादी जबाबदारी सोपवली जाते का, याबाबत भाजप पक्ष काय विचार करतो, हे बघावं लागेल. पण आता पुन्हा कष्ट करण्यावाचून त्यांच्यासमोर दुसरा पर्याय नाही."

"पण धनंजय मुंडे यांचे भाजपच्या नेत्यांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे या संबंधांचा वापर करून ते बीडचा आपल्याला हवा तसा विकास करून घेण्याचा प्रयत्न करतील. या परिस्थितीत बीडच्या राजकारणातील आपलं स्थान टिकवणं पंकजा मुंडेंसाठी कठीण जाईल," ते पुढे सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)