निकाल सातारा: उदयनराजे भोसलेंचा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव नेमका कशामुळे?

उदयनराजे भोसले-श्रीनिवास पाटील

फोटो स्रोत, Getty Images

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उदयनराजे भोसले सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभूत झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे भोसलेंचा पराभव केला.

उदयनराजेंच्या पराभवाबद्दल बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं, की लोकसभेची एकच जागा महाराष्ट्रात होती. स्वाभाविक सगळ्यांचं लक्ष या जागेकडं होतं. साताऱ्याच्या गादीबद्दल सर्वांनाच आदर आहे. पण त्या गादीची प्रतिष्ठा न ठेवल्यास काय होतं, ते दिसून आलं. श्रीनिवास पाटलांसारख्या नेत्याला निवडून दिल्याबद्दल मी साताऱ्याच्या जनतेचे आभार मानतो.

तर श्रीनिवास पाटील यांनी ही निवडणूक साताऱ्याच्या सामान्य नागरिकांनी हातात घेतली आणि शरद पवारांना धोका देणाऱ्यांचा पराभव केला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

साताऱ्यामधील प्रचारसभेत शरद पवारांनी भर पावसात केलेलं भाषण हा या निवडणुकीचा क्लायमॅक्स होता. या भाषणानंतर पवारांबद्दल तयार झालेल्या सहानुभूतीच्या लाटेचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला झाला का, अशी चर्चा निकालानंतर सुरू झाली आहे.

पण उदयनराजेंच्या पराभवासाठी अगदी शेवटच्या टप्प्यातलं हे भावनिक राजकारण कारणीभूत ठरलं की त्यामागे इतरही काही कारणं आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीनं केला.

'जनतेला गृहीत धरणं भोवलं'

"राष्ट्रवादी काँग्रेसचं नेटवर्क आणि शरद पवार यांचा करिष्मा सातारा जिल्ह्यात आजही कायम आहे, हेच या निकालातून स्पष्ट झालं," असं मत दैनिक प्रभातच्या सातारा आवृत्तीचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे यांनी व्यक्त केलं.

"उदयनराजे हे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवायचे तेव्हा हेच नेटवर्क त्यांच्यासाठी महत्त्वाचं ठरत होतं. त्यामुळे या निकालातून उदयनराजेंच्या लोकप्रियतेच्या मर्यादा लक्षात आल्या. पक्ष महत्त्वाचा असतो, हे आता उदयनराजेंना मान्य करावं लागेल," असं श्रीकांत कात्रेंनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं.

श्रीकांत कात्रेंनी म्हटलं, की साताऱ्याच्या जनतेला गृहीत धरण्याची चूक उदयनराजे भोसलेंना भोवली. मला पक्षाची गरज नाही. माझ्यासाठी साताऱ्याच्या जनतेचं प्रेम महत्त्वाचं आहे, असं उदयनराजे म्हणायचे. लोकांचं माझ्यावर प्रेम आहे असं म्हणताना त्यांच्यासाठी फार काही काम त्यांनी केलं नाही. त्यामुळेच जनतेनं त्यांना नाकारलं.

फोटो स्रोत, Getty Images

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

साताऱ्यामध्ये शरद पवारांनी पावसात घेतलेल्या प्रचारसभेचा श्रीनिवास पाटील यांच्या विजयामध्ये किती वाटा आहे, या प्रश्नाला उत्तर देताना श्रीकांत कात्रेंनी म्हटलं, की निश्चितच साताऱ्याच्या जनतेनं शरद पवारांच्या भावनिक आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. मात्र केवळ ती एकच गोष्ट उदयनराजेंच्या पराभवाला कारणीभूत ठरली नाही.

"उदयनराजेंच्या विरोधात उभ्या राहिलेल्या श्रीनिवास पाटील यांची प्रतिमा अतिशय स्वच्छ आहे. त्यांनी खासदार म्हणून केलेलं काम लोकांनी पाहिलं होतं. याउलट उदयनराजे भोसले राजकारणाबाबत गंभीर असल्याचं कधी दिसलं नाही. सातारा शहरापुरतंच त्यांचं राजकारण मर्यादित होतं. त्यामुळे कराड, पाटण तालुक्यातील मतदार त्यांच्यावर नाराज होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस उदयनराजेंना उमेदवारी देऊ नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्यातील आमदार अनुकूल नव्हते. पण त्यावेळी त्यांनी पक्षासाठी उदयनराजेंना मदत केली. यावेळी मात्र या सर्व आमदारांची उदयनराजेंना मदत झाली नाही. किंबहुना त्यांनी आपली सगळी शक्ती उदयनराजेंच्या विरोधात पणाला लावली," असं श्रीकांत कात्रे यांनी म्हटलं.

'अपेक्षित निकाल'

उदयनराजेंचा पराभव हा धक्कादायक नव्हता किंबहुना हा अतिशय अपेक्षित असाच निकाल होता, असं मत महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहायक संपादक विजय चोरमारे यांनी व्यक्त केलं.

सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड आहे, हे या निकालातून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. यापूर्वीही उदयनराजे राष्ट्रवादीच्या तिकीटावरच तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते, असं विजय चोरमारे यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, Getty Images

उदयनराजेंविरोधात श्रीनिवास पाटलांना उमेदवारी देणं, हा चांगला निर्णय ठरल्याचं चोरमारे यांनी म्हटलं. उदयनराजेंच्या दबंगगिरीपुढे टिकून राहिल असा उमेदवार इथून देणं अपेक्षित होतं. श्रीनिवास पाटलांचं वय, अनुभव, कार्यशैली यांमुळे उदयनराजेंविरोधात उमेदवारीसाठी अचूक पसंती असल्याचं चोरमारेंनी म्हटलं.

यशवंतराव चव्हाणांनंतर साताऱ्यातील लोकांनी शरद पवारांना तसाच पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर विधानसभेची जी निवडणूक झाली त्यामध्ये अकरापैकी दहा मतदासंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला विजय मिळाला होता. श्रीनिवास पाटील यांच्या पाठीशी राष्ट्रवादीची ही ताकद होती, असं चोरमारे यांनी म्हटलं.

या सर्व पार्श्वभूमीवर उदयनराजेंचा पराभव अपेक्षित होता. शरद पवारांनी भर पावसात घेतलेल्या सभेमुळं उदयनराजेंचं मताधिक्य घटण्यास मदत झाली, असं मत चोरमारेंनी व्यक्त केलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)