निकाल विधानसभा: देवेंद्र फडणवीस सरकारमधले हे आठ मंत्री हरले

पंकजा मुंडे Image copyright TWITTER@PANKAJAMUNDE

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील आठ विद्यमान मंत्री पराभूत झाले आहेत. यात पंकजा मुंडे, अर्जुन खोतकर यांच्यासारख्या मंत्र्यांचाही समावेश आहे.

1. पंकजा मुंडे - महिला व बालविकास मंत्री

परळी मतदारसंघातून मंत्री पंकजा मुंडे यांचा त्यांचेच चुलत बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पराभव केला. पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. परळीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र, अत्यंत चुरशीच्या या लढतीत पंकजा मुंडे पराभूत झाल्या.

2. जयदत्त क्षीरसागर - रोजगार आणि फलोत्पादन मंत्री

राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात रोजगार आणि फलोत्पादन मंत्री बनलेले जयदत्त क्षीरसागर बीडमधून पराभूत झाले आहेत. जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांनीच त्यांचा पराभव केला. जयदत्त क्षीरसागर हे पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय आणि धनंजय मुंडे यांचे विरोधक मानले जात.

3. राम शिंदे - पणन आणि वस्त्रोद्योग

अत्यंत चुरशीची मानली जाणारी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेडमधील निवडणूक भाजपचे नेते आणि विद्यमान पणन आणि वस्त्रोद्योग मंत्री राम शिंदे पराभूत झालेत. शरद पवार यांचे नातू आणि पुण्यातील जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार हे कर्जत जामखेडमधून विजयी झालेत.

4. संजय (बाबा) भेगडे - कामगार आणि पर्यावरण राज्यमंत्री

राज्यमंत्री आणि मावळचे विद्यमान आमदार संजय (बाबा) भेगडे यांना बंडखोरी महागात पडल्याचे निकालावरून स्पष्ट झालंय. कारण भाजपनं उमेदवारी नाकारल्याने राष्ट्रवादीकडून रिंगणात उतरलेल्या सुनील शेळके यांनी बाळा भेगडे यांचा पराभव केला. मावळमध्ये 25 वर्षांचं भाजपचं वर्चस्व राष्ट्रवादीनं मोडीत काढलंय.

5. विजय शिवतारे - जलसंपदा आणि जलसंधारण राज्यमंत्री

पुणे जिल्ह्यातील पुरंदरचे विद्यमान आमदार, शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा पराभव झालाय. काँग्रेसच्या संजय जगताप यांनी शिवतारेंना पराभूत केलं. पुरंदरमधून दोनवेळा शिवतारे आमदार म्हणून निवडून आले होते.

Image copyright Facebook/Dr Parinay Fuke
प्रतिमा मथळा परिणय फुके

6. परिणय फुके - जंगल, सार्वजनिक बांधकाम आणि आदिवासी विकास राज्यमंत्री

विद्यमान राज्यमंत्री आणि भंडाऱ्यातील साकोली मतदारसंघाचे भाजप उमेदवार परिणय फुके यांचा पराभव झाला आहे. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी त्यांचा पराभव केला. मतमोजणीवेळी सुरूवातीला आघाडीवर असणाऱ्या परिणय फुके शेवटच्या तीन-चार फेरींमध्ये पिछाडीवर गेले आणि अंतिम निकालात पराभूत झाले.

7. अर्जुन खोतकर - पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यपालन

शिवसेनेचे नेते आणि विद्यमान राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा जालन्यातून पराभव झाला. काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी खोतकरांचा पराभव केला. अर्जुन खोतकर हे लोकसभेला लढण्यासही इच्छुक होते. त्यावेळी त्यांनी नाराजीही व्यक्त केली होती. मात्र, आता त्यांना आपली आमदारकीही वाचवता आली नाही.

8. अनिल बोंडे - कृषीमंत्री

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी मतदारसंघातून कृषीमंत्री आणि भाजप नेते अनिल बोंडे हे पराभूत झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार देवेंद्र भुयार यांनी बोंडेंचा पराभव केला. फडणवीस सरकारच्या शेवटच्या मंत्रिमंडळ विस्तारातून अनिल बोंडे पहिल्यांदाच मंत्रिपदी विराजमान झाले होते.

या बड्या मंत्र्यांशिवाय एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा सुद्धा पराभव झाला आहे.

पक्षांतर केलेल्या या नेत्यांचा पराभव झाला आहे.

निवडणुकीपूर्वी या नेत्यांनी पक्षांतर केलं पण त्यांनाही जनतेनं नाकारलं आहे. त्यांची यादी.

क्रमांक उमेदवाराचं नाव (मतदारसंघ ) आधीचा पक्ष आताचा पक्ष
1. नागनाथ क्षीरसागर (मोहोळ) भाजप शिवसेना
2. हर्षवर्धन पाटील (इंदापूर) काँग्रेस भाजप
3. निर्मला गावित (इगतपुरी) काँग्रेस शिवसेना
4. वैभव पिचड (अकोले) राष्ट्रवादी भाजप
5. रश्मी बागल (करमाळा) राष्ट्रवादी शिवसेना
6. दिलीप सोपल (बार्शी) राष्ट्रवादी शिवसेना
7. दिलीप माने (सोलापूर शहर मध्य) काँग्रेस शिवसेना
8. गोपीचंद पडळकर (बारामती) वंचित बहुजन आघाडी भाजप
9. भाऊसाहेब कांबळे (श्रीरामपूर) काँग्रेस शिवसेना
10 शरद सोनवणे (जुन्नर) मनसे शिवसेना
11 गोपालदास अग्रवाल (गोंदिया) काँग्रेस भाजप
12 धैर्यशील कदम (कराड उत्तर) काँग्रेस भाजप
13. शेखर गोरे (माणखटाव) शिवसेना राष्ट्रवादी

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)