नरेंद्र मोदींनी सभा घेऊनही भाजप उमेदवारांचा पराभव, #5मोठ्याबातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Narendra Modi/twitter

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. मोदींनी सभा घेऊनही भाजप उमेदवारांचा काही ठिकाणी पराभव

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यामध्ये एकूण 9 सभा घेतल्या पण त्यापैकी 5 जागी भाजपला फटका बसला आहे, लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यातील पहिली प्रचार सभा 13 ऑक्टोबरला जळगाव येथे झाली. याच दिवशी पंतप्रधानांनी साकोली (जिल्हा भंडारा) येथेही सभा घेतली. साकोलीमधून काँग्रेसचे नाना पटोले विजयी झाले आहेत.

मोदींनी 17 ऑक्टोबरला परळी, सातारा आणि पुण्यात सभा घेतल्या होत्या. पुणे आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये भाजपाला फटका बसला आहे. पुणे शहरातील 8 मतदारसंघांपैकी 2 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला.

साताऱ्यामध्ये लोकसभेच्या पोट निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी भाजपाच्या उदयनराजे भोसलेंचा पराभव केला. तर परळीत भाजपच्या माजी महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंचा पराभव झाला.

अकोल्यामध्ये पंतप्रधानांची 16 ऑक्टोबरला सभा झाली होती. या ठिकाणीही भाजपनं एक जागा गमावली आहे.

2. लातूर ग्रामीणमध्ये 'नोटा'ला दुसऱ्या क्रमांकाचं मतदान

लातूर ग्रामीण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख याचे चिरंजीव धीरज देशमुख विजयी झाले आहेत. त्यांची लढत नेमकी कोणाशी होती हे मात्र मतदानाच्या आकडेवरुन स्पष्ट होत नाही.

कारण धीरज देशमुख यांच्यानंतर नोटाला मतदारांनी सर्वाधिक मतदान केलं आहे. मतदारांनी तब्बत 26,899 मतं याठिकाणी नोटाला दिली आहेत. ही बातमी ABP माझाने दिली आहे.

दरम्यान, दोन्ही भावांच्या विजयानंतर अभिनेते रितेश देशमुख यांनी भावनिक ट्वीट करत म्हटलं, "बाबा, आम्ही करून दाखवलं."

त्यांनी लातूर शहर आणि ग्रामीणच्या लोकांचे आभारही मानले.

3. ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये भारताचं स्थान सुधारलं

जागतिक बँकेच्या 'ईज ऑफ डुईंग बिझनेस- 2020'च्या यादीत भारताचं स्थान 14 क्रमांकांनी सुधारलं आहे. इकॉनॉमिक टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

आता 'ईज ऑफ डुईंग बिझनेस'च्या यादीत भारत 63व्या क्रमांकावर पोहोचला आहे. यापूर्वीच्या यादीत भारत 77व्या क्रमांकावर होता.

फोटो स्रोत, Getty Images

या यादीत जगातल्या 190 देशांचा समावेश आहे. भारत सरकारचा मेक इन इंडिया हा कार्यक्रम आणि गुंतवणुकीसाठी केलेल्या सुधारणा यामागे प्रमुख कारण असल्याचं म्हटलं आहे.

4. पी. चिदंबरम यांना 30 ऑक्टोबरपर्यंत कोठडी

INX Media गैरव्यवहारप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयानं काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांची 30 ऑक्टोबरपर्यंत ईडीच्या कोठडीत रवानगी केली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.

पी. चिंदबरम यांची अजून 7 दिवस चौकशी करण्याची परवानगी विशेष न्यायाधीश अजय कुमार यांनी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

पी.चिदंबरम

तसंच चिदंबरम यांना आरोग्यविषयक समस्या जाणवल्यास त्यावर त्वरित AIIMS मध्ये अपचार करण्यात यावेत, असंही अजय कुमार यांनी म्हटलं आहे.

चिदंबरम यांची तब्येत व्यवस्थित नसल्याचं त्यांचे वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला सांगितलं होतं.

5. कर्तारपूर कॉरिडॉर सुरू

भारत आणि पाकिस्तानमध्ये गुरुवारी (24 ऑक्टोबर) ऐतिहासिक 'कर्तारपूर कॉरिडॉर'चा करार करण्यात आला. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

पाकिस्तानातल्या नारोवाल जिल्ह्यातील कर्तारपूरमधील गुरुद्वारा (दरबार साहिब) येथे भारतातील शीख बांधवांसह इतर भारतीयांनादेखील आता जाता येणार आहे.

कॉरिडॉर सुरू झाल्यानंतर ऑनलाइन नोंदणी तत्काळ सुरू करण्यात आली आहे.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये नारोवाल जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेपासून 4 किलोमीटर अंतरावर दरबार साहिब गुरुद्वारा आहे. हा कॉरिडॉर भारतातील पंजाब प्रांतातील डेरा बाबा नानक आणि पाकिस्तानातील कर्तारपूरमधील गुरुद्वारा यांना जोडेल.

शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू नानक देव यांनी या ठिकाणी 18 अठरा वर्षं व्यतीत केली होती. त्यामुळे शीख बांधवांसाठी हे ठिकाणी महत्त्वाचं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)