प्रकाश आंबेडकरः वंचित बहुजन आघाडीनं विधानसभा निवडणुकीत काय केलं?

  • श्रीकांत बंगाळे
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
प्रकाश आंबेडकर

फोटो स्रोत, FACEBOOK@OFFICIALPRAKASHAMBEDKAR

फोटो कॅप्शन,

प्रकाश आंबेडकर

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात पुन्हा शिवसेना - भाजप महायुती सत्ता स्थापन करण्याची चिन्हं आहेत. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही.

MIMशी युती तोडली म्हणून वंचित बहुजन आघाडीवर ही वेळ आली का, वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीसोबत निवडणूक लढली असती, तर राज्यात वेगळं चित्र दिसलं असतं का? याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.

बीबीसी मराठीनं निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील आकडेवारी पाहिली. त्यात दिसून आलं की, राज्यातील 10 मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळालेली आहेत.

याशिवाय राज्यातील जवळपास 21 मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला विजयी आणि पराभूत उमेदवार यांच्या मतातील फरकाहून अधिक मतं मिळाल्याचं दिसून येतं.

याचा अर्थ वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीसोबत निवडणूक लढवली असती, तर कदाचित राज्यात वेगळं चित्र दिसलं असतं.

वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या दिशा पिंकी शेख मात्र वेगळं मत मांडतात.

MIM बाहेर पडल्याचा फटका?

दिशा सांगतात, "या निवडणुकीत MIMला पडलेली मतं आणि वंचितला मिळालेली मतं यांची बेरीज केल्यास किती जागा निवडून आल्या असत्या, हे पाहायला हवं. पण, लोकसभा निवडणुकीत काही ठिकाणी MIMची मतं वंचित बहुजन आघाडीला मिळाली नसल्याचा अनुभव आहे. त्यामुळे MIMसोबत निवडणूक लढली असती, तर फार काही फरक पडला असता असं वाटत नाही."

फोटो स्रोत, Shahsi k

ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या मते, "वंचित बहुजन आघाडीनं MIMसोबत निवडणूक लढली असती, तर त्यांना डबल डिजिट गाठता आला असता. पण, प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी भाजपची बी टीम म्हणून काम करत आहे, हे लक्षात आल्यामुळे MIM वंचितमधून बाहेर पडलं. देवेंद्र फडणवीस यांना सत्तेत आणणं, यासाठीच प्रकाश आंबेडकरांचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसतं."

दिशा शेख यांना मात्र हे पटत नाही.

त्या म्हणतात, "विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास वंचितचा खरा फटका भाजपला बसल्याचं लक्षात येतं. कारण काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे वंचित म्हणजे 'भाजपची बी टीम' असं म्हणण्यात काही अर्थ नाही. ज्यांना वंचितांचं राजकारण करायचं नाही अथवा वंचितांना समोर येऊ द्यायचं नाही, ते असा आरोप करतात."

'...तर वेगळं चित्रं दिसलं असतं'

वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीसोबत निवडणूक लढली असती, तर राज्यात वेगळं चित्र दिसलं असतं , अशी चर्चा सध्या सुरू आहे.

"वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत जाणं शक्य नव्हतं. कारण त्यांनी अव्वाच्या सव्वा जागांची मागणी केली होती. काँग्रेस ती मान्य करणं शक्यच नव्हतं. त्यामुळे राज्यात वेगळं चित्र दिसलं असतं, अशी चर्चा करण्यात अर्थ नाही," चोरमारे सांगतात.

फोटो स्रोत, Shashi k

तर दिशा शेख यांच्या मते, "काँग्रेसबरोबर युती करण्यासाठी वंचितनं हात पुढे केला होता. पण, काँग्रेसच्या पातळीवर उदासीनता होती. दोघांनी एकत्र येण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वानं पुढाकार घेतला नाही. जेव्हा निर्णय घ्यायची वेळ आली, तेव्हा त्यांनी दिल्लीकडे बोट दाखवलं आणि चर्चा फिस्कटली."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)