महाराष्ट्र विधानसभा निकाल : मुंबईत भाजपचं वाढतं वर्चस्व शिवसेनेसाठी धोक्याची घंटा?

आदित्य ठाकरे

फोटो स्रोत, TWITTER/@AUTHACKERAY

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. मुंबईत कोणाचं वर्चस्व राहणार, याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं.

मुंबईत या वेळेसही शिवसेना-भाजप युतीनं 2014 प्रमाणेच आपला दबदबा राखला असला, तरी शिवसेनेसाठी ही धोक्याची घंटा मानली जातीये. कारण 2014 च्या तुलनेत मुंबईत भाजपची एक जागा वाढली, तर शिवसेनेच्या तेवढ्याच जागा कायम राहिल्या.

दुसरीकडे, गेल्या निवडणुकीत खातेही न उघडणाऱ्या राष्ट्रवादीने मुंबईत खाते उघडले आहे.

2017 ची महापालिका, 2014 ची लोकसभा आणि विधानसभा अशा सलग तीन मोठ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेनं फारशी चमकदार कामगिरी केली नाही.

मुंबई महापालिकेत सलग 25 वर्षे सत्ता गाजवणारी शिवसेना मुंबईत मोठी आघाडी घेईल, असं वाटत होतं. पण आहे त्या जागा वाचवण्यातच शिवसेना गुंतलेली दिसून आली.

साधारण अडीच वर्षांनंतर मुंबईत महापालिका निवडणुका आहेत. 2017 च्या महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढले होते आणि त्यावेळी शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यात मोठी कसरत करावी लागली होती.

त्यामुळं कधीकाळी मुंबईवर एकहाती वर्चस्व गाजवणाऱ्या शिवसेनेच्या हातून बालेकिल्लाच निसटत चालला आहे का आणि याला मित्रपक्ष भाजपच कारणीभूत ठरतोय का, हा प्रश्न राजकीय वर्तुळात आणि मुंबईकरांमध्ये पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागलाय.

या प्रश्नांचा धांडोळा बीबीसी मराठीनं घेतलाय. मात्र, त्याआधी आपण मुंबईतील गेल्या दशकभरातली निवडणुकांमधील जय-पराजयाची आकडेवारी पाहू.

वरील आकडेवारीचा अर्थ काय?

2014 प्रमाणेच शिवसेनेनं या वेळेसही 14 जागा जिंकल्या. मात्र गेल्यावेळेस शिवसेना आणि भाजपनं स्वतंत्रपणे निवडणूक लढविली होती. शिवसेनेनं तेव्हा मुंबईतील सर्वच्या सर्व म्हणजे 36 जागा लढवल्या होत्या. त्यांपैकी 14 जागांवर त्यांनी विजय मिळवला होता.

यावेळेस महायुतीमधून निवडणूक लढवताना सेनेनं मुंबईमधील 36 पैकी 19 जागा लढवल्या होत्या. त्यांपैकी सेनेनं 14 जागा जिंकल्या.

ही तुलना पाहता सेनेनं फार काही गमावलं नाही, असं वाटू शकतं. पण या विधानसभा निवडणुकीतील काही निकाल शिवसेनेसाठी धक्कादायक होते.

शिवसेनेनं मुंबईतले काही बालेकिल्लेही गमावलेत. त्यात ठाकरे कुटुंबीयांचं निवासस्थान असलेली वांद्रे पूर्वची जागा काँग्रेसकडे गेलीये. शिवसेना नेते आणि मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर इथून पराभूत झाले. तृप्ती सावंत यांच्या बंडखोरीचा फटका सेनेला इथं बसला.

फोटो स्रोत, Getty Images

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीचा अर्थ काढायचा झाल्यास, 2014 साली मोदी लाटेचा फायदा घेत शिवसेनेला मुंबईतही खासदार जिंकता आले. मुंबईतील 6 पैकी 3 जागा शिवसेनेने लढवल्या आणि त्या जिंकल्याही.

मात्र, इथेही भाजपनं मुंबईत मोठी मुसंडी मारली. 2014 चीच आकडेवारी 2019 च्या निवडणुकीत दिसली. शिवसेना आणि भाजपनं युती म्हणून लोकसभा लढल्यानं सेनेला अधिक जागा जिंकण्याची शक्यता अर्थातच नव्हती.

2017 आणि 2012 च्या महापालिका निवडणुकीच्या विजयी उमेदवारांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास भाजपनं 2012 च्या तुलनेत 2017 साली जोरदार मुसंडी मारल्याचं दिसून आलं.

2012 साली मुंबई महापालिकेत भाजपचे 21 नगरसेवक होते, मात्र 2017 साली त्यांचे 82 नगरसेवक निवडून आले. शिवसेना आणि भाजपनं 2017 साली मुंबई महापालिका स्वतंत्रपणे लढली होती. असं असूनही भाजपनं स्वबळावर 82 पर्यंत मजल मारली आणि महापालिकेत दोन दशकांहून अधिक काळ सत्तेत असणारी शिवसेना मात्र 84 जागांपर्यंत अडकून राहिली.

2012 आणि 2017 सालच्या महापालिका निवडणुकीच्या आकडेवारी लक्षात घेतल्यास आगामी म्हणजे अडीच वर्षांनी येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका किती चुरशीच्या होण्याची शक्यता आहे, हे लक्षात येते.

भाजप मुंबईत वाढण्याची कारणं काय?

गेल्या साधारण 10 वर्षांच्या आकडेवारीची तुलना केल्यास लक्षात येईल भाजप मुंबईत सातत्यानं वाढते आहे. लोकसभा, विधानसभा आणि महापालिका अशा तीनही निवडणुकांमधील भाजपच्या विजयाचा आलेख चढताच दिसतो.

देशाच्या आर्थिक राजधानीत भाजपच्या वाढीची नेमकी कारणं काय, हे राजकीय विश्लेषकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला.

याबाबत महाराष्ट्र टाईम्सचे माजी संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत सांगतात, "एका बाजूला नोकरदार तर दुसऱ्या बाजूला व्यापारी आणि उद्योगपतींचं शहर अशी मुंबईची आर्थिक आणि सामाजिक रचना आहे."

फोटो स्रोत, Getty Images

"मराठी नोकरदार हे शिवसेनेचं शक्तिस्थळ आहे. भाजपनं मराठी नोकरदार आपल्याकडे ओढले आहेतच, सोबत भाजपचे पूर्वीपासून मतदार असलेले छोटे व्यापारी तसंच छोटे आणि मोठे उद्योगपती यांनाही सोबत घेतले आहे. उद्योगपतींना सोबत घेतल्यानंतर त्या उद्योगपतीसोबत काम करणाऱ्या कामगारांवरही प्रभाव पडतोच. यामुळं भाजपची मुंबईत फार वेगानं वाढ झालीये," असं भारतकुमार राऊत म्हणतात.

कुठल्याही ग्रामीण भागापेक्षा दिल्ली, मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये भाजप वेगानं वाढलीये, असंही निरीक्षण राऊत नोंदवतात.

ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात, "मुंबईत बहुतांश मराठी आणि गुजराती मतदार शिवसेना-भाजपकडे असतात. त्यातही 1995 सालापासून, म्हणजे दंगलींनंतर हिंदी भाषकही शिवसेना-भाजपकडे वळले. मात्र 2014 च्या बदललेल्या राजकारणानंतर हिंदी भाषक भाजपकडे वळल्याचं दिसून येते. गुजराती, हिंदी आणि काही प्रमाणात मराठी मतदार अशी भाजपची ताकद बनली."

"केंद्रातलं सरकार, पक्षाचा विस्तार करण्यासाठी मिळालेले कार्यकर्ते अशा सगळ्या गोष्टींचा विचार केल्यास, आधीचे मतदार आणि इतर पक्षांतील नेते घेऊन मिळालेले मतदार हे चित्रही भाजपच्या फायद्याचं ठरतंय," असं अभय देशपांडे म्हणतात.

शिवसेनेचा मुंबईतील पाया डळमळीत होतोय?

भाजपची वाढ ही मित्रपक्ष म्हणून शिवसेनेसाठी आनंदाची आहे की मुंबईतलं आपलं वर्चस्व कमी होतंय म्हणून धोक्याची घंटा आहे? हा प्रश्न उद्धभवण्याचं कारण असं, की ज्यावेळी भाजपच्या जागा वाढत आहेत, त्याचवेळी त्या शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहेत.

2017 साली महापालिका निवडणुकीत भाजपनं 82 तर शिवसेनेनं 84 जागा मिळवल्या. यावेळी भाजपनंही सत्तास्थापनेसाठी हालचाली केल्या होत्या. मात्र, शिवसेनेनं ऐनवेळी बहुमत दाखवून महापालिकेत सत्तेवर हक्क सांगितला. मात्र, भाजपच्या वाढत्या वर्चस्व पाहता यापुढेही अशीच स्थिती राहील का, हा प्रश्न साहजिकच चर्चेत येतो.

"भाजपची वाढ ही शिवसेनेसाठी धोक्याची घंटा असेल की नाही, हे शिवसेना कशी वागतेय यावर अवलंबून असेल. कारण शिवसेना कधीच उद्योगांमध्ये वाढणार नाही. नोकरदार, मध्यमवर्ग आणि निम्न मध्यमवर्ग यांच्यामध्ये शिवसेना वाढते. त्यातही शिवसेना मराठी भाषकांमध्ये, तर भाजप मराठीसह गुजराती आणि हिंदी भाषकांमध्ये वाढतेय," असं भारतकुमार राऊत सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images

मात्र राऊत पुढे म्हणतात, "आपापल्या बलस्थानानुसार दोन्ही पक्षांनी मुंबईतले क्षेत्र विभागून घेतले, तर दोन्ही पक्षांची वाढ नीट होऊ शकेल. एकमेकांच्या विरोधात लढले, तर मात्र शिवसेनेला महागात पडेल."

अभय देशपांडे म्हणतात, "युती नसल्यास शिवसेनेची मदार मराठी भाषकांवरच असते. त्यामुळं मनसे शक्तिशाली होत नाही, तोपर्यंत शिवसेनेला मुंबईत तसा फटका बसणार नाही. कारण मराठी मतं विभागली जाणार नाहीत. आणि तसंही मराठी मतदार विधानसभेत वेगळ्या पद्धतीनं आणि महापालिकेत वेगळ्या पद्धतीनं मतदान करतो. त्यामुळं युती झाली किंवा नाही झाली तर शिवसेनेवर फारसा परिणाम होणार नाही."

"शिवसेना-भाजप वेगवेगळे लढले तर शिवसेनेऐवजी काँग्रेसलाच अधिक फटका बसेल. महापालिकेत विरोधी पक्षाची जागाही भाजप व्यापून टाकेल," असं अभय देशपांडे सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)