विधानसभा निकालांचा अर्थ: भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी आणि मनसेची कशी झाली कामगिरी?

  • तुषार कुलकर्णी
  • बीबीसी मराठी
महाराष्ट्रातले नेते

फोटो स्रोत, Getty Images

निवडणुका पार पडल्या आणि राज्यात पुन्हा जनतेनं कौल भाजप आणि शिवसेना युतीला दिला. राज्यात प्रमुख सहा पक्ष निवडणुकीच्या रिंगणात होते. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडी.

त्याच बरोबर एमआयएम देखील या निवडणुकीत होतं आणि त्यांच्या दोन जागाही आल्या. या निवडणुकीत कोणत्या पक्षाची कामगिरी कशी झाली हे आता आपण पाहू.

1. भारतीय जनता पक्ष

आमचे पैलवान तेल लावून उभे आहेत. पण रिंगणात कुणीच पैलवान दिसत नाही. आमचा विजय निश्चित आहे, असा आत्मविश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीआधी दाखवला होता.

युतीच्या 220 हून अधिक जागा येतील असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. पण प्रत्यक्षात भाजपच्या 105 जागा आल्या आणि शिवसेनेच्या 56 जागा आल्या.

फोटो स्रोत, narendra modi twitter

2014 च्या तुलनेत भाजपच्या 19 जागा कमी झाल्या. पण भाजपने 2014मध्ये भाजपने 260 जागा लढवल्या होत्या आणि त्यांनी 124 जागा जिंकल्या. यावेळी भाजपने 164 जागा लढवल्या आणि 105 जागा जिंकल्या. त्यामुळे गेल्या निवडणुकीपेक्षा आमचा स्ट्राइक रेट वाढला आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकालानंतरच्या पत्रकार परिषदेत म्हटलं.

या निवडणुकीत एकूण मतदार साडे आठ कोटी होते आणि मतदान 60 टक्के झालं. त्यापैकी 1 कोटी 41 लाख मतदारांनी भाजपला मतदान केलं. भारतीय जनता पक्षाला 25.70 टक्के मतदान झालं आहे. राज्यात सर्वाधिक मतदान भाजपलाच झालं आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला 27.60 टक्के मतदान झालं होतं. त्या तुलनेत दोन टक्क्यांनी भाजपचं मतदान घटलं आहे. तर 2014 विधानसभा निवडणुकीत भाजपला 31 टक्के मतदान झालं होतं. पण 2014 मध्ये चारही पक्ष वेगळे लढल्यामुळे पक्षाला झालेल्या मतदानाची टक्केवारी वाढली होती पण स्ट्राइक रेट कमी होता.

वेळेवर झाली युती

निवडणुकीआधीच भाजप सर्वांत मोठा पक्ष होता आणि निवडणुकीनंतरही तेच चित्र दिसलं. त्यांच्या जागा कमी झाल्या असल्या तरी गेल्यावेळी युती होण्यासाठी बराच काळ गेला. सुरुवातीला भाजपला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आणि शिवसेनेनं विरोधी पक्षनेतेपद घेतलं. नंतर भाजपने शिवसेनेला सत्तेत सामील करून घेतलं.

फोटो स्रोत, Getty Images

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

तीच युती लोकसभेला कायम राहिली आणि विधानसभेलाही कायम राहिली. जागावाटपाहून दोन्ही पक्षात तिढा निर्माण होईल असं वाटत होतं पण भाजपनं 164 जागा लढवण्याचं ठरवलं आणि शिवसेनेनी 124 जागा लढवल्या. शिवसेनेने आमची अडचण समजून घेतली असं मत चंद्रकांत पाटील यांनी दिलं होतं. या युतीचा दोन्ही पक्षांना फायदा झाला.

सुसज्ज प्रचार यंत्रणा

या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी निवडक सभा घेतल्या. यावेळी भाजपने थेट मोदींच्या नावानं मतं मागितली नाहीत. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराची टॅगलाइन होती मी पुन्हा येणार. पंतप्रधानांनी एकूण 9 सभा घेतल्या. अमित शाह यांच्या एकूण 18 सभा होणार होत्या पण 2 पावसामुळे रद्द झाल्या.

त्याच बरोबर भाजपनं महाजनादेश यात्रा काढली होती. त्यामुळे लोकांशी संपर्क साधता आला. थेट लोकांमध्ये जाता आल्यानं भाजपच्या प्रचाराला सकारात्मक प्रतिसाद तर मिळालाच पण याचवेळी आमच्याविरोधात कुणीच नाही असं वातावरण निर्माण करून विरोधकांचं खच्चीकरण करण्याची खेळी यशस्वी झाली असं म्हणण्यास काही हरकत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी एकूण 48 सभा, 3 रोड शो आणि एक मॉर्निंग वॉक केला.

विरोधकांची ताकद कमी पडली

विरोधकांची ताकद कमी पडल्याचा सर्वाधिक फायदा हा भाजपलाच झाला. कारण अॅंटी-इन्कंबन्सीचा फायदा विरोधक पुरेसा करून घेऊ शकले नाहीत. पीकविमा, कर्जमाफी, दुष्काळ आणि पुराचं नियोजन, बेरोजगारी अशा मुद्द्यांवर विरोधकांना सरकारला कोंडीत पकडता आलं असतं, पण उलट विरोधकांचे हे मुद्दे भाजपचाच सहकारी पक्ष शिवसेनेनी उचलले.

फोटो स्रोत, Getty Images

काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी देखील या गोष्टीची कबुली दिली, ते म्हणाले जनता काँग्रेस आघाडीच्या बाजूने होती पण आम्ही कमी पडलो. 25 ऑक्टोबरला एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील ही खंत बोलून दाखवली. आमची मुळात ताकद कमी होती. आम्ही पूर्ण शक्तिनिशी उतरलो पण त्याचा तितका फायदा झाला नाही, असं शरद पवार म्हणाले.

आठ मंत्र्यांना घरचा रस्ता

या निकालानंतर आम्ही समाधानी आहोत असं भाजपनं म्हटलं असलं तरी ते खरंच आनंदी आहेत का, हा प्रश्न आहे. सत्ताधारी पक्षातल्या आठ मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे, हे अॅंटी इन्कंबन्सीचं लक्षण मानलं जात आहे.

फोटो स्रोत, Twitter@pankajmunde

एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे मंत्र्यांना तिकीटच देण्यात आलं नव्हतं. पंकजा मुंडे, कृषी राज्यमंत्री अनिल बोंडे, जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव झाला.

राष्ट्रीय मुद्दे या निवडणुकीत ठरले कुचकामी

निवडणूक जाहीर झाल्यापासून भाजपने कलम 370 रद्द केल्याचं श्रेय घेण्याची एकही संधी सोडली नसावी. अमित शाह यांनी कलम 370 या मुद्द्यावर मुंबईत सभा घेतली तर लडाखचे खासदार नामग्याल यांनी कोथरूड मतदारसंघात कलम 370 वर आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला.

लोकसभा निवडणुकीवेळी सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइक या राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांचा भाजपला फायदा झाला होता, पण त्याच प्रमाणातल्या भव्य यशाची पुनरावृत्ती भाजपला करता आली नाही. राष्ट्रीय प्रश्नांची चर्चा घडवून ही निवडणूक जिंकता येईल हा भाजपचा भ्रम भाजपला नडल्याचं मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांनी व्यक्त केलं आहे.

विदर्भानं दिली नाही साथ

2014च्या निवडणुकीत भाजपकडे 61 पैकी 48 जागा होत्या पण यावेळी भाजप आणि शिवसेनेच्या मिळून 31 जागा आल्या आहेत. चंद्रपूर आणि गोंदियात अपक्ष बंडखोर निवडून आले आहेत. भाजपला आपला गड राखता आला नाही का असं विचारलं असता मुक्त पत्रकार जयदीप हर्डीकर सांगतात, विदर्भ हा काँग्रेसचाच बालेकिल्ला होता.

पण 2014ला आघाडी सरकारला लोक कंटाळलेले होते. त्यांची 15 वर्षांची अॅंटी-इन्कंबन्सी होती, त्याचा निश्चितच फायदा भाजपला झाला. त्यात चारही पक्ष वेगवेगळे लढले. शिवसेनेची विदर्भात ताकद नाही त्याचाही फायदा त्यांना त्यावेळी झाला.

फोटो स्रोत, Pti

यावेळी ग्रामीण भागातल्या लोकांची सरकारवर काही प्रमाणात नाराजी होती. ज्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांवर नाराजी आहे तिथं काँग्रेसचं लोकल नेतृत्व सक्रिय झालं आणि त्यांना मतदान झालं. पण ज्याप्रमाणे ही निवडणूक भाजपनं एक पक्ष म्हणून लढली तशी निवडणूक काँग्रेसनं पक्ष म्हणून लढली नाही. अन्यथा वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं, असं हर्डीकर सांगतात.

पक्षांतराला लोकांनी नापसंती दिली का?

भाजपनं मोठ्या प्रमाणात बाहेरून नेते आणले होते. मधुकर पिचड आणि त्यांचा मुलगा वैभव पिचड, राधाकृष्ण विखे पाटील, राणा जगजीत सिंह, गोपीचंद पडळकर, नितेश राणे, गोपालदास अग्रवाल, हर्षवर्धन पाटील.

यांपैकी वैभव पिचड, गोपीचंद पडळकर, हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला आहे. याचाच अर्थ असा की पक्षांतराचा सरसकट फायदा किंवा नुकसान भाजपला झालं नाही. स्थानिक समीकरणांनुसार या जागा आल्या आहेत. त्याच बरोबर बाहेरून आलेल्या उमेदवारांमुळे पक्षातल्या काही उमेदवारांना तिकीट देण्यात आलं नाही. त्यांपैकी 10-12 बंडखोर म्हणून उभे राहिले आणि निवडून आले. त्यांची संख्या ते पुन्हा पक्षात येतील, असंही देवेंद्र फडणवीस यांनी 24 तारखेला झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

2. शिवसेना

ज्याप्रमाणे भाजपला शिवसेनेच्या युतीचा फायदा झाला त्याच प्रमाणे शिवसेनेला देखील भाजपचा फायदा झाला असं म्हणावं लागेल. शिवसेनेनी 124 जागा लढवल्या आणि त्यांच्या 56 जागा निवडून आल्या. शिवसेनेला 90 लाख 49 हजार मतं पडली आहेत.

त्यांच्या मतांची टक्केवारी ही 16.4 टक्के इतकी आहे. गेल्या विधानसभेत शिवसेना स्वबळावर लढली होती, तेव्हा 19 टक्के मतदान पडलं होतं. पण यावेळी युतीत लढल्यानंतर त्यांच्या मतांची टक्केवारी कमी झाल्याचं चित्र दिसत आहे.

शिवसेनेसाठी फायद्याच्या ठरलेल्या गोष्टी

ठाकरे कुटुंबातली तिसरी पिढी म्हणजेच आदित्य ठाकरे थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे शिवसैनिकांचा उत्साह वाढल्याचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. आदित्य ठाकरे यांनी वरळीतून निवडणूक लढवली आणि ते निवडूनही आले.

फोटो स्रोत, Twitter@authackerey

शिवसेना आणि भाजपमध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधीच धुसफूस सुरू होती. शिवसेनेचं मुखपत्र सामनातून शिवसेनेनी भाजपवर टीका केली होती. दोन्ही पक्ष एकत्र आल्यावर देखील ही टीका थांबली नाही. इतकंच नाही तर निवडणुकीच्या वेळी पीकविमा, कर्जमाफी या गोष्टींचाही त्यांनी विरोध केला.

आरे कॉलनीमध्ये MMRCने जी वृक्षतोड सुरू केली होती. त्याचा आदित्य ठाकरेंनी विरोध केला होता. विरोधकांची जागा घेण्याचाच शिवसेनेनी प्रयत्न केल्याचं गेल्या चार-पाच वर्षांत दिसलं आहे.

त्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की मित्र पक्षावरच काय पण गरज पडली तर आमच्या पक्षातल्या लोकांचाही आम्ही विरोध करू शकतो. विरोधकांचा स्पेस घेण्याचा शिवसेनेनी प्रयत्न केल्याचं दिसलं आहे असं मत राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांनी व्यक्त केलं आहे.

धार्मिक ध्रुवीकरण

पूर्ण राज्यात शिवसेनेनी कर्जमाफी आणि पीकविमा हे मुद्दे लावून धरले पण औरंगाबाद याला अपवाद ठरलं. या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी म्हटलं की औरंगाबादला हिरव्या सापांचा विळखा पडला आहे. त्यांनी एमआयएमच्या उमेदवारांविरोधात हा इशारा दिला होता.

फोटो स्रोत, Getty Images

औरंगाबादच्या निकालाकडे पाहिलं तर लक्षात येतं की मराठवाड्यात शिवसेनेला एकूण 12 जागा मिळाल्या आहेत. त्यांपैकी 6 जागा औरंगाबाद जिल्ह्यातल्याच आहेत. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याने धार्मिक ध्रुवीकरण होऊन त्यांना मतदानात फायदा झाला असावा, अशी शक्यता ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव यांनी व्यक्त केली आहे.

पारंपरिक मतदारसंघात चांगली कामगिरी

शिवसेनेने त्यांच्या पारंपरिक मतदारसंघात चांगली कामगिरी केल्याचं दिसत आहे. मराठवाडा, कोकण, मुंबई आणि ठाणे या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघांत त्यांना 45 जागा मिळाल्या आहेत. ऊर्वरित ठिकाणी त्यांना 11 जागा मिळाल्या आहेत.

पण अनेक गोष्टी शिवसेनेच्या पथ्यावर पडल्या नाहीत. पश्चिम महाराष्ट्रात त्यांची कामगिरी प्रभावी झाली नाही. पश्चिम महाराष्ट्रात एकूण 70 जागा आहेत. त्यापैकी फक्त सात जागांवर त्यांना विजय मिळाला आहे. विदर्भातही शिवसेनेला 3 जागा मिळाल्या आहेत आणि उत्तर महाराष्ट्रात एक जागा मिळाली आहे.

फोटो स्रोत, Twitter

शिवसेनेनं जर स्वतंत्रपणे जागा लढवल्या असत्या तर त्याचा शिवसेनेला निश्चित फायदा झाला असता, असं मत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाईंनी व्यक्त केलं. गेल्या निवडणुकीला मोदी लाट होती त्या लाटेत शिवसेना राहिली आणि दुसऱ्या क्रमांकावर आली. त्यामानाने या निवडणुकीतली त्यांची कामगिरी खालावली आहे. कोल्हापूरमध्ये त्यांना बंडखोरीचाही फटका बसला. प्रमुख शहरांत त्यांना जागावाटपात मतदारसंघ मिळाले नाहीत. विदर्भात शिवसेनेची ताकद मर्यादित आहे त्यामुळे त्यांच्याकडून इथं अपेक्षा नव्हत्या, असं देसाई सांगतात.

मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मराठवाडा या क्रमाने शिवसेनेचा विकास झाला. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाच त्यांचा विस्तार पश्चिम महाराष्ट्रात झाला. शिवसेनेकडे मोठ्या प्रमाणात मराठा आणि ओबीसी मतं आली आहेत. त्याचा फायदा त्यांना होऊ शकला असता पण पश्चिम महाराष्ट्रात त्यांच्या थेट लढती राष्ट्रवादीविरोधात झाल्या तिथं ते कमी पडले, असं देसाई सांगतात.

3. राष्ट्रवादी काँग्रेस

आमदारांच्या संख्येबाबत राष्ट्रवादी काँग्रेस हा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. त्यांना 54 जागा मिळाल्या आहेत. पण एकूण मतांच्या बाबतीत राष्ट्रवादी हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादीला 16.70 टक्के मतदान मिळालेलं आहे.

राष्ट्रवादीला एकूण मतदान 92 लाख 16 हजार इतकी मतं पडली आहेत. 2014 विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वेगवेगळं लढले होते. त्यांना 17.96 टक्के मतदान मिळालं होतं. पण तेव्हा त्यांना 41 जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यांच्या 13 जागा वाढल्या आहेत. सर्वांत जास्त जागा या राष्ट्रवादीच्याच वाढल्या आहेत. या विजयाचं श्रेय हे शरद पवारांचं आहे असं राजकीय विश्लेषक प्रकाश पवार सांगतात.

'ईडीनंतर पवार आक्रमक'

ज्या वेळी महाराष्ट्रात आम्हाला विरोधकच नाहीत असं मुख्यमंत्री म्हणत होते. त्यांना आव्हान शरद पवारांनी दिलं. शरद पवारांनी केवळ राष्ट्रवादीचं नेतृत्व केलं नाही तर पूर्ण विरोधी पक्षामध्ये आशेचा किरण निर्माण केला असं मत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी बीबीसी मराठीच्या कार्यक्रमात मांडलं.

फोटो स्रोत, Getty Images

शरद पवारांचं नाव शिखर बॅंक घोटाळाप्रकरणात ईडीनं घेतलं. त्यानंतर शरद पवार स्वतःहून ईडीच्या कार्यालयात जाण्यासाठी निघाले. ईडीने जेव्हा सांगितलं की तुम्हाला इथं येण्याची गरज नाही तेव्हा ते थांबले. ईडीची नोटीस आल्यानंतर शरद पवार हे आक्रमक बनले. त्यांच्या या आक्रमकतेचं वर्णन वरिष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी ओल्ड मॅन इन अ वॉर असंच केलं होतं.

शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित केलं आणि त्याचं फळही त्यांना मिळालं. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला 29 जागा मिळाल्या. तर काँग्रेसला 10 जागा मिळाल्या.

पवारांची गाजलेली सभा

शरद पवारांची साताऱ्यात सभा झाली त्यावेळी त्यांनी पावसात उभं राहून भाषण केलं. त्यांच्या फोटोची चर्चा सोशल मीडियावर झाली. साताऱ्यात लोकसभा पोटनिवडणूक होती. ती जागा देखील राष्ट्रवादीला मिळाली आहे. उदयनराजे यांचा पराभव करून शरद पवारांनी दाखवून दिलं की सातारा हा राष्ट्रवादीचा गड आहे, उदयनराजेंचा नाही.

फोटो स्रोत, Twitter@pawarspeaks

शरद पवार यांच्या खेळीचं वर्णन निखिल वागळेंनी 'मॅन ऑफ द मॅच' असं केलं आहे. ते सांगतात या निवडणुकीचा सामना भाजप आणि शिवसेनेनं जिंकल्याचं दिसत आहे पण कधीकधी हारलेल्या टीममधल्या खेळाडूचा खेळ उत्तम होतो म्हणून त्याला सामनावीराचा पुरस्कार दिला जातो. शरद पवारांची कामगिरी ही त्याप्रमाणे आहे.

राष्ट्रवादीतून निवडणुकीआधी अनेक नेते भाजप आणि शिवसेनेत गेले होते. सचिन आहिर, चित्रा वाघ, राणा जगजीत सिंह पाटील, गणेश नाईक, दिलीप सोपल, शिवेंद्र राजे हे नेते विरोधकांमध्ये जाऊन बसले त्याचा फटका राष्ट्रवादीला निश्चितच बसला.

शरद पवार हे ईडीची नोटीस आल्यानंतर आक्रमक झाले. अगदी शेवटच्या टप्प्यात ते आक्रमक झाले असं निखिल वागळे सांगतात.

4. काँग्रेस

काँग्रेसला या निवडणुकीत 44 जागा मिळाल्या. त्यांना 15.9 टक्के मतदान पडलं आहे. त्यांना मिळालेलं एकूण मतदान हे 87 लाख 52 हजार इतकं आहे.

राज्यामध्ये सर्वांत आधी भाजपनं महाजनादेश यात्रा काढली होती. शिवसेनेनी जनआशीर्वाद यात्रा काढली होती तर राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रा काढली पण काँग्रेसनेच कोणती यात्रा काढली नव्हती. काही काळासाठी काँग्रेसच्या नाना पटोलेंनी महापर्दाफाश यात्रा काढली होती. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राज्यात प्रचारासाठी आले होते.

काँग्रेसच्या खूप जागा वाढल्या नसल्या तरी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या दोन जागा वाढल्या आहेत. तसेच विखे पाटील, हर्षवर्धन पाटील हे गेल्यावर काँग्रेसला खूप मोठा फटका बसू शकतो असं चित्र निर्माण झालं होतं, पण तसं झालं नाही.

फोटो स्रोत, Getty Images

सर्व पक्ष झंझावती प्रचार करत असताना तुम्ही प्रचारात का दिसत नाहीत, असा प्रश्न काँग्रेसच्या कार्याध्यक्ष यशोमती ठाकूर यांना बीबीसीच्या कार्यक्रमात विचारण्यात आला होता. तेव्हा त्या म्हणाल्या की फक्त मोठ्या सभा म्हणजेच प्रचार करणं नाही तर आम्ही डोअर टू डोअर कॅंपेन करत आहोत.

याचप्रमाणे अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले या नेत्यांना त्यांच्या भागावर लक्ष केंद्रित केलं आणि त्याचा फायदाही त्यांना दिसला.

काँग्रेसची कामगिरी ग्रामीण भागात चांगली होती पण त्या तुलनेत शहरी भागात खराब असल्याचं चित्र दिसत आहे. यावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणतात की काँग्रेसने शहरी भागावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. राज्यात शहरी भागातली कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. यावर आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे असं ते म्हणाले.

5. वंचित बहुजन आघाडी

लोकसभा निवडणुकीवेळी वंचित बहुजन आघाडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीला सात ठिकाणी फटका बसला होता. तसेच त्यांनी पाठिंबा दिलेला एक उमेदवार (MIM) लोकसभेतही गेला. पण यावेळी वंचित बहुजन आघाडीला या निवडणुकीत आपली छाप सोडता आली नाही.

औरंगाबाद मध्य येथे एमआयएमचे नसीरुद्दीन सिद्दिकी आणि वंचितचे अमित भुईगळ यांचं एकत्रित मतदान शिवसेनेच्या प्रदीप जैस्वाल यांच्याहून अधिक होतं. एमआयएमचे राज्यात दोन उमेदवार निवडून आले आहेत. जर या ठिकाणी ते एकत्र आले असते तर त्यांना ही जागा मिळाली असती. वंचित बहुजन आघाडीने 274 जागांवर निवडणूक लढवली आणि त्यांना एकाही जागेवर यश मिळालं नाही.

लोकसभेच्या वेळी मिळालेली मतं विधानसभेत कमी झाली नाहीत, असं प्रकाश आंबेडकरांनी 24 ऑक्टोबरला निकालानंतर म्हटलं. वंचित बहुजन आघाडी हा प्रयोग आहे, आमच्याकडे तितक्या सुविधा आणि प्रचाराला वेळ मिळाला नाही, असं आंबेडकर म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images

वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम एकत्र का आले नाहीत याबाबत आंबेडकरांनी सांगितलं की दोन्ही पक्ष एकत्र आले तर वंचित समाजाची मतं एमआयएमच्या उमेदवाराला मिळत होती पण मुस्लीम समाजाची मतं ही वंचित समाजाच्या उमेदवाराला पडत नव्हती म्हणून आम्ही एकत्र आलो नाहीत.

10 मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर

वंचित बहुजन आघाडीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी लोकसत्तासाठी लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे की वंचित बहुजन आघाडीची कामगिरी समाधानकारक आहे. 10-12 मतदारसंघात 15 व्या फेरीपर्यंत वंचितचे उमेदवार आघाडीवर होते. अकोला पूर्व मधून वंचितचे हरिदास भदे हे केवळ 2440 इतक्या मतांनी हरले आहेत.

शेवटचा निकाल हाती लागला तेव्हा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार 10 ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर होते. याशिवाय राज्यातील जवळपास 21 मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला विजयी आणि पराभूत उमेदवार यांच्या मतातील फरकाहून अधिक मतं मिळाल्याचं दिसून येतं.

म्हणजेच वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने महाआघाडी स्थापन केली असती तर त्यांच्या 20-25 जागा सहज वाढल्या असत्या.

जर वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर महाआघाडी स्थापन केली असती तर त्याचा फायदा झाला असता का? असं विचारलं असता लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान सांगतात की त्याचा फायदा होऊ शकला असता, पण काँग्रेस-राष्ट्रवादीसारखे मोठे पक्ष छोट्या पक्षांचा विचार करताना दिसत नाही आणि दुसऱ्या हाताला ही गोष्टही लक्षात घेतली पाहिजे की छोट्या पक्षांनी अवास्तव जागांची मागणी करू नये.

6. महाराष्ट्र नवनिर्माण सेना

लोकसभा निवडणुकीच्या वेळी एकही जागा न लढवता आपल्या 'लाव रे तो व्हीडिओ' या वाक्याने महाराष्ट्र हालवून सोडणाऱ्या राज ठाकरेंचा करिष्मा विधानसभा निवडणुकीत चालला नाही, असं दिसतंय. विधानसभा निवडणूक जाहीर होण्याच्या काही दिवस आधी राज ठाकरेंना ईडीची नोटीस आली. ईडी नोटीसनंतर राज ठाकरे शांत बसले आहेत असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते.

आचारसंहिता लागू होत असताना मनसेने निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं. राज्यात 100हून अधिक जागांवर त्यांनी निवडणूक लढवली. त्यांपैकी एका जागेवर मनसेला विजय मिळाला. कल्याण ग्रामीण येथून मनसेचे राजू पाटील निवडून आले आहेत.

फोटो स्रोत, INDRANIL MUKHERJEE

फोटो कॅप्शन,

राज ठाकरे

मनसेला पूर्ण राज्यात 12 लाख मतं मिळाली आहेत. एमआयएमच्या तुलनेत मनसेला पाच लाख मतं जास्त मिळाली पण एमआयएमचे दोन आमदार आले आहेत. मनसे या निवडणुकीत मागे का पडलं, असं विचारलं असता ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई सांगतात की या निवडणुकीत मनसे पूर्ण ताकदीनं उतरल्याचं दिसलंच नाही. पावसात अंग चोरून बसल्याप्रमाणे एखादी व्यक्ती कसं बसते त्याप्रमाणेच ते निवडणुकीत उतरले. ते खूप उशिरा या निवडणुकीत उतरले.

एकूण 9 मतदारसंघात मनसेला दुसऱ्या क्रमांकावर मतं मिळाली आहे.

राज ठाकरेंचं व्यक्तिमत्त्व हे तरुणांना आकर्षित करणारं आहे. विरोधी पक्षातला विधानभवनाबाहेरचा एक लोकप्रिय नेता असंही त्यांना म्हटलं जातं पण याचं मतांमध्ये परिवर्तन होताना दिसत नाही. मनसे मुंबई पुण्याबाहेरचे प्रश्न हाताळत नाही. शेतीवर, ओबीसींवर, महिला आणि दलितांच्या प्रश्नांवर त्यांनी आंदोलनं केल्याची दिसत नाहीत. त्यामुळे त्यांना लार्जर मास बेस नाही, असं देसाई सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)