जीसी मुर्मू: गुजरात केडरचे अधिकारी जम्मू-काश्मीरचे नवे नायब राज्यपाल

जी.सी. मुर्मू

फोटो स्रोत, Google

गिरीश चंद्र मुर्मू यांची जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राधा कृष्ण माथूर यांच्याकडे लडाखच्या नायब राज्यपालपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

हे दोघेही भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत.

या सोबतच जम्मू-काश्मीर राज्याचे विद्यमान राज्यपाल सत्यपाल मलिक यांची गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर पी. एस. श्रीधरन यांना मिझोरामचं राज्यपालपद देण्यात आलं आहे.

संसदेने 5 ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मिरला विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द केलं. त्यानंतर जम्मू काश्मीर आणि लडाखला विभाजित करून केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला होता.

हे दोन्ही नवे प्रदेश म्हणजेच जम्मू-काश्मीर आणि लडाख येत्या 31 ऑक्टोबरपासून अधिकृतपणे केंद्र शासित प्रदेश म्हणून अस्तित्वात येतील.

जम्मू-काश्मीरचं विभाजन झालं तेव्हापासूनच या दोन्ही नव्या केंद्र शासित प्रदेशांचं नायब राज्यपालपद कुणाला देण्यात येईल, याबद्दल जोरदार चर्चा सुरू होती.

राज्यपाल हा राज्यांचा तर नायब राज्यपाल हा केंद्र शासित प्रदेशांचा सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी असतो. राष्ट्रपती पाच वर्षांसाठी त्यांची नियुक्ती करतात.

गिरीश चंद्र मुर्मू कोण आहेत?

  • ते भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) 1985च्या बॅचचे गुजरात केडरचे अधिकारी आहेत.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गिरीश चंद्र मुर्मू राज्याचे मुख्य सचिव होते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

सत्यपाल मलिक गोव्याचे राज्यपाल होतील.

  • 59 वर्षांचे मुर्मू केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयात व्यय सचिवपदीही होते. सोप्या शब्दात सांगायचं तर व्यय सचिव हा एकप्रकारे भारत सरकारच्या खजिन्याचा प्रभारी असतो.
  • गुजरात सरकारच्या प्रशासकीय विभागाच्या वेबसाईटनुसार मुर्मू मूळचे ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातले आहेत. त्यांनी पॉलिटिकल सायन्समध्ये मास्टर्स आणि पब्लिक सर्व्हिसेसमध्ये एमबीएचं शिक्षण घेतलं आहे.

राधा कृष्ण माथूर कोण आहेत?

  • ते भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) 1977 च्या बॅचचे मणिपूर-त्रिपुरा केडरचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत.
  • ते केंद्र सरकारच्या मुख्य माहिती अधिकारी पदावरून नोव्हेंबर 2018 ला निवृत्त झाले होते.
  • मे 2013 ते मे 2015 या काळात ते संरक्षण सचिव होते.
  • त्यांनी 2003 साली त्रिपुराचे मुख्य सचिव म्हणूनही काम सांभाळलं आहे.
  • त्यांनी आयआयटी कानपूरमधून मेकॅनिकल इंजीनिअरिंगमध्ये पदवी घेतली. त्यानंतर आयआयटी दिल्लीमधून त्यांनी इंजीनिअरिंगरमध्येच मास्टर्स केलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)