शरद पवार : हे फायटिंग स्पिरिट कुठून आलं आहे?

  • अभिजीत कांबळे
  • बीबीसी मराठी
शरद पवार

फोटो स्रोत, Twitter

विधानसभा निवडणुकीत बहुमत जरी भाजप-शिवसेना युतीला मिळालं असलं तरी चर्चा मात्र राष्ट्रवादीच्या यशाची आणि पवारांच्या लढाऊ बाण्याची अधिक होत आहे.

शिखर बँक प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेनंतर त्या संकटाचे संधीत रुपांतर करत शरद पवार आक्रमक झाले आणि पायाला भिंगरी लागल्यासारखा त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला.

शरद पवार विरुद्ध भारतीय जनता पक्ष याच मुद्द्याभोवती निवडणूक फिरत राहिली आणि याचा निकालावर परिणाम झालेला पाहायला मिळाला.

त्यात साताऱ्याच्या सभेतील पावसात भाषणाचा फोटो पवारांची लढाऊ प्रतिमा अधिक बळकट करणारा ठरला. पवारांचं राजकारण दीर्घकाळ जवळून पाहिलेले ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे सांगतात की पवारांचा लढाऊ बाणा ही काही नवी गोष्ट नाही.

"1980 मध्ये पुलोद सरकारमध्ये मुख्यमंत्री असताना शरद पवार दिल्लीला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना भेटले होते. त्यावेळी इंदिरा गांधींनी सुचवले की तुम्ही यशवंतराव चव्हाणांऐवजी संजय गांधींच्या नेतृत्वाखाली काम करावं. त्यावर पवारांनी संजय गांधींचं नेतृत्व मान्य करण्यास नकार दिला. याच्या परिणामाची त्यांना कल्पना होती तरीही त्यांनी आपल्या बाण्याला अनुसरून भूमिका घेतली. पवारांच्या या भूमिकेचा परिणाम असा झाला की दिल्लीहून मुंबईला परत आल्यावर दुसऱ्याच दिवशी त्यांचं सरकार बरखास्तीचा निर्णय केंद्राने घेतला."

समाजवादी काँग्रेसचं नेतृत्व करत असताना पवार कसे अडचणीत आले होते आणि त्यावर कशी मात केली हेही आसबे सांगतात.

"1980 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पवारांच्या समाजवादी काँग्रेसचे 54 आमदार निवडून आले होते. पण यशवंतराव चव्हाणांनी समाजवादी काँग्रेसचे आमदार ओढून घेतल्यानं पवारांसोबत 54 पैकी केवळ पाच आमदार उरले. पवारांसाठी हा मोठाच धक्का होता. पण खचून न जाता पवार त्यानंतर राज्याचा दौरा सुरु केला. लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर शेतकरी दिंडी काढली. असं करून पवारांनी पुन्हा एकदा आपला जनाधार निर्माण केला."

आसबे यांचे म्हणणे आहे की पवार जितके दिसतात त्यापेक्षा अधिक आक्रमक आणि लढाऊ आहेत. पण संसदीय पद्धतीचा त्यांच्यावर खूप प्रभाव असल्याने तो आक्रमकपणा दिसून येत नाही.

फोटो स्रोत, Twitter

शरद पवारांनी कर्करोगाशी दिलेला लढाही त्यांच्या फायटर व्यक्तिमत्वाला अधोरेखित करणारा आहे. बीबीसीच्या भारतीय भाषांचे डिजिटल एडिटर मिलिंद खांडेकर पवारांच्या कर्करोगाच्या प्रसंगाविषयी सांगतात.

"2004 च्या लोकसभा निवडणुकीत मी शरद पवारांची सभा कव्हर करण्यासाठी पुण्यात गेलो होतो. याच सभेत पवारांनी सांगितलं की ही सभा संपल्यानंतर आता मी तातडीच्या ऑपरेशनसाठी रुग्णालयात दाखल होत आहे. तेथून ते मुंबईला रवाना झाले त्यांच्यासोबत मी गाडीत त्यांची मुलाखत घेतली आणि ते त्यानंतर ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. जेव्हा हे समोर आले की पवारांना कर्करोग झाला. तेव्हा असं समजलं गेलं की आता त्यांचं पुढे काही होऊ शकत नाही. पण आज आपण पाहतोय की त्या कर्करोगावर मात करून ते 15 वर्षं झाले तरी जोमाने कार्यरत आहेत. यातून त्यांची जिद्द स्पष्टपणे दिसते."

शरद पवार यांनी त्यांच्या 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्रात, लढण्याचा गुण आपण आईकडून घेतला हे सांगताना या प्रसंगाचा उल्लेख केलाय,

'आमच्या गावात एक सोडलेला वळू होता, आणि त्याचा लोकांना खूप त्रास होतो म्हणून कोणी तरी त्याला चार दोन गोळ्या घातल्या. गोळ्या घातल्यावर हा वळू घायाळ होऊन रस्त्याच्या एका बाजूला कोपऱ्यात पडला होता. पहाटे उठल्यावर माझ्या आईच्या नजरेस तो पडला. त्याच्या अंगातून रक्त येत आहे, हे पाहून तिनं त्याच्या पाठीवरून हात फिरवला. तसं करताच तो जखमी वळू उसळून उठला आणि आईला जोरदार ढुशी देऊन त्यानं पाडलं. पुढे पंधरा मिनिटं तो आईला धडका देत होता. त्यात तिच्या एका मांडीच्या हाडाचा चुरा झाला. तिला दवाखान्यात दाखल केल्यानंतर एका पायाचं जवळपास सहा इंच हाड काढून टाकावं लागलं. शस्त्रक्रियेतून ती उठली , पण त्यानंतर पुढचं सारं आयुष्य कुबड्या घेतल्याशिवाय ती कधी चालू शकली नाही. एवढ्या मोठ्या अपघातातून उठल्यावरही त्या माऊलीनं दुखण्याचा कोणता बाऊ केला नाही."

स्वातंत्र्यपूर्व काळात लोकल बोर्डाच्या सदस्य राहिलेल्या शारदाताई शेतकरी कामगार पक्षात कार्यरत होत्या.

फोटो स्रोत, Getty Images

पवारांच्या लढाऊ बाण्याचं कौतुक होत असले तरी त्यांच्या बदलत्या भूमिकाही नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे. त्यांच्या बदलत्या भूमिकेमुळे त्यांच्यावर बेभरवशाचे असल्याची टीकाही झालेली आहे.

ज्या भाजप सरकार विरोधात पवार या निवडणुकीत आक्रमक झाले त्याच पवारांच्या भूमिकेमुळे फडणवीस यांचं सरकार वाचलं होतं.

१९९९ मध्ये सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाला विरोध करत पवारांनी राष्ट्रवादी स्थापन केली आणि काही महिन्यांतच काँग्रेस सोबत आघाडी केली आणि कालांतराने सोनिया यांच्या नेतृत्वाखाली UPA मध्ये काम केले. वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडण्याचा आरोपही पवारांवर झाला होता.

पवारांच्या फायटर स्पिरिटचं कौतुक असलं तरी त्यांचं बेभरवरशाचं वागणं हा सुद्धा पवारांच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग असल्याचं वरिष्ठ पत्रकार किरण तारे यांचं म्हणणं आहे.

"शरद पवारांचं फायटर स्पिरिट तर आहेच. वेळोवेळी ते दिसलं आहे. पण शरद पवारांची विश्वासार्हता राजकारणात अत्यंत कमी आहे. पवारांवर पटकन विश्वास ठेवावा अशी परिस्थिती नसते. त्यांनी समजा एखाद्याला म्हटलं की आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. तेव्हा ते देतीलच का याची आणि त्यामागे काय उद्देश असेल याची खात्री देता येत नाही. पवार जे बोलतात त्याच्या नेमकं उलटं होतं. महाराष्ट्रात हेही आपण पाहिलं आहे. तो योगायोग असतो की समजून-उमजून केलेले वक्तव्य असतं ते सांगता येणार नाही. पवारांच्या वेळोवेळी आलेल्या अनुभवामुळेच ते इतर पक्षांना बेभरवशाचे वाटतात."

लढाऊ बाण्याचा राष्ट्रवादीला फायदा होणार का?

पवार यांच्या लढाऊ बाण्याचा थेट फायदा आत्ता राष्ट्रवादीला या निवडणुकीत झालेला दिसला आहे. पण प्रश्न हा आहे की राष्ट्रवादीचे मूलभूत प्रश्न आता सुटणार का?

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे राष्ट्रवादी पुढील आव्हानांचं विश्लेषण करताना सांगतात की, "राष्ट्रवादी काँग्रेस ला केवळ पवारांवर अवलंबून राहून वाटचाल करता येणार नाही. पक्षाला आमूलाग्र बदल करावे लागतील. नेत्यांना आपल्या सरंजामी मानसिकतेत बदल करावे लागतील. केवळ मराठा समाजाचा पक्ष ही प्रतिमा राष्ट्रवादीला बदलावी लागेल."

लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांना वाटते आहे की आता राष्ट्रवादीतील दुफळी समोर येणार नाही. "कोणताही पक्ष सत्तेबाहेर असला, अडचणीत असला की मतभेद प्रकर्षाने उफाळून येतात. पण आता राष्ट्रवादीला पवारांनी एका वेगळ्या वळणावर आणलं आहे. त्यामुळे बंडोबा थंडोबा होतील. अजित पवारही आता आपल्या भावनांना आवर घालतील."

लोकमतच्या पुणे आवृत्तीचे संपादक प्रशांत दीक्षित यांचं म्हणणं आहे की पवारांचं वाढतं वय लक्षात घेता आता त्यांना दुसरी फळी मजबूत करावी लागेल आणि या फळीतील गटबाजी आणि हेवेदावे कमी करावे लागतील.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)