ओवेसींच्या MIMने महाराष्ट्रात कसा प्रवेश मिळवला?

  • ओंकार करंबेळकर
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
ओवेसी

फोटो स्रोत, PTI

एमआयएमची 2 मतं शिवसेनेच्या संजय पवार यांना दिली जातील असं खासदार एम्तियाज जलील यांनी सांगितलं आहे. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपला हरवण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करणार असल्याचं ट्वीट करून जाहीर केलं आहे.

विधानसभा निवडणुकीत असदुद्दिन ओवेसी यांच्या ऑल इंडिया मजलिस ए- इत्तेहादुल-मुसलमीन (AIMIM) या पक्षाला दोन मतदारसंघात विजय मिळाला आहे.

2014 साली पक्षानं विधानसभेत आपलं खातं उघडलं तेव्हासुद्धा त्यांच्या दोन जागा आल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबादेत त्यांचे उमेदवार इम्तियाज जलील हे निवडून आले.

मात्र वंचित बहुजन आघाडीबरोबरची बोलणी फिसकटल्यावर MIMने निवडणुका स्वतंत्र लढविण्याचा निर्णय घेतला. MIMचे राष्ट्रीय अध्यक्ष असादुद्दिन ओवेसी यांनी राज्यभरात विविध मतदारसंघात प्रचारसभा घेतल्या होत्या.

त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत MIMच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

AIMIM पक्षाचा इतिहास

AIMIMचे पूर्ण रूप ऑल इंडिया मजलिस-ए इत्तेहादुल-मुसलमीन असं आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात या संघटनेची स्थापना हैदराबाद संस्थानात झाली होती. इत्तेहाद म्हणजे ऐक्य.

संस्थानातील सर्व मुस्लिमांचे ऐक्य साधून उत्कर्ष साधणे असा त्याचा मागचा हेतू होता. सुरुवातीच्या काही काळानंतर नवाब बहादूरयार जंग यांनी या संघटनेचा कार्यभार स्वीकारला.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

MIM ची हैदराबाद शहरात स्थापना झाली.

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

याच इत्तेहादच्या लातूर शाखेचे काम कासीम रझवी पाहत असत. कासीम रझवी यांनी आपली स्थावर मालमत्ता घर संघटनेला देऊ केल्यामुळे बहादूर यार जंगांच्या मनामध्ये रझवींना स्थान मिळाले होते.

बहादूरयार जंगांनी आपल्या हयातीमध्येच कासीम रझवी यांना जवळ केले होते, त्यामुळे 1944 मध्ये बहादूर यार जंग यांच्या निधनानंतर कासीम रझवी यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढविली आणि ते अध्यक्ष झालेही. त्यांनी सर्व चळवळ्या किंवा कार्यकर्त्या (रझाकार) लोकांची संघटना तयार केली आणि त्याला रझा असे नाव दिले.

'पोलीस अॅक्शन'नंतर रझाकारांवर खटले दाखल करण्यात आले. कासीम रझवीनाही शिक्षा होऊन चंचलगुडा कारागृहात धाडण्यात आले. नंतर त्यांना पुण्याच्या येरवडा कारागृहात ठेवण्यात आले. 1957 मध्ये सुटका झाल्यावर रझवी हे कराचीला गेले. निर्वासिताचे आयुष्य जगून 1970 साली त्यांचा मृत्यू झाला.

इकडे इत्तेहादुल मुस्लमीनचे अब्दुल वाहिद ओवेसी यांनी पुनरुज्जीवन केले. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र सुलतान सलाहुद्दिन ओवेसी यांनी MIMचे अध्यक्षपद घेतले.

सलाहुद्दिन हैदराबाद पालिकेच्या सदस्यत्वानंतर ते आंध्र प्रदेशाच्या विधानसभेत पाथरघट्टी, चारमिनार आणि युक्तापुरा मतदारसंघातून निवडून जात. 1962 साली ते आंध्र प्रदेश विधानसभेत पहिल्यांदा निवडून गेले होते. 1984 ते 2004 या कालावधीत ते हैदराबादचे खासदार होते.

फोटो स्रोत, AIMIM.ORG

फोटो कॅप्शन,

असादुद्दिन ओवेसी आणि अकबरुद्दिन ओवेसी

सलाहुद्दिन ओवेसी यांचे पुत्र असदुद्दिन ओवेसी 1994 ते 2004 या कालावधीत आंध्र प्रदेश विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर 2004 साली हैदराबादचे खासदार झाले व 2009, 2014 आणि 2019 मध्येही त्यांनी विजय प्राप्त केला. तर त्यांचे भाऊ अकबरुद्दिन तेलंगण विधानसभेचे सदस्य आहेत.

मात्र हैदराबादचा स्थानिक पक्ष अशी ओळख पुसून आता MIMने शेजारच्या राज्यांपासून ते उत्तर प्रदेश आणि बिहारपर्यंत आपली ओळख निर्माण केली आहे.

महाराष्ट्रातील काही पालिका तसेच कर्नाटकमधील बिदर आणि बसवकल्याण पालिकांमध्येही स्थान मिळवलं आहे. तेलंगण विधानसभेत MIMचे 7 सदस्य आहेत.

बिहारमध्ये किशनगंज विधानसभेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत MIMचे कामरुल होदा विजयी झाले आहेत, तर उत्तर प्रदेशातील प्रतापगड जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत MIMचे इसरार अहमद यांनी 13.59 टक्के मते मिळवली आहेत.

नांदेड ते धुळे-मालेगाव व्हाया औरंगाबाद

महाराष्ट्राच्या राजकारणात MIMची चर्चा गेल्या दशकभरापासून आहे. पण MIMने 1999 साली पहिल्यांदा महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक लढवली. त्यानंतर या पक्षाने 2009 साली नांदेड उत्तर आणि लातूर शहर या जागा लढवल्या.

नांदेड महानगरपालिकेमध्ये 2012 साली MIMचे 11 सदस्य निवडून आले. मात्र 2017 साली झालेल्या निवडणुकीत या पक्षाला खातंही उघडता आलं नाही.

फोटो स्रोत, FACEBOOK/IMTIAZ JALEEL

फोटो कॅप्शन,

लोकसभा निवडणुकीत MIM चे आमदार इम्तियाज जलील विजयी झाले आणि ते औरंगाबादचे खासदार झाले.

2014 साली विधानसभा निवडणुकीत MIM दोन उमेदवारांना विजय मिळाला. त्यानंतर 2015 साली औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत या पक्षाच्या 25 सदस्यांना विजय मिळाला.

2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचे इम्तियाज जलील औरंगाबादमध्ये विजयी झाले आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत MIM चे पुन्हा दोन उमेदवार विजयी झाले आहेत. 2012 साली महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने या पक्षाला नोंदणीकृत पक्ष म्हणून दर्जा दिला आहे.

2014च्या निवडणुकीत MIMची स्थिती कशी होती?

2014 साली महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकांच्या मतमोजणीवेळी ते चार जागांवर पुढे आहेत, असा कल येत होता. त्यापैकी त्यांना दोन जागा मिळाल्या. एकेकाळी निजामाच्या संस्थानातील दुसर्‍या क्रमांकावर असणार्‍या औरंगाबाद शहरामधील औरंगाबाद मध्य मतदारसंघातून सय्यद इम्तियाज जलील व मुंबईमध्ये भायखळ्यात वारीस पठाण विजयी झाले होते.

सोलापूर शहर मध्य, औरंगाबाद पूर्व आणि परभणी येथे MIMचे उमेदवार दुसर्‍या क्रमांकावर तर नांदेड दक्षिण, कुर्ला, वर्सोवा, वांद्रे पूर्व, मुंबादेवी येथे तिसर्‍या क्रमांकावर राहिले.

सोलापूर शहर मध्य मतदारसंघामध्ये मतमोजणीच्या वेळेस काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्याविरोधात अनेकदा MIMचा उमेदवार पुढे असल्याचे काही फेर्‍यांमध्ये दिसत होते. शेवटी प्रणिती शिंदे तिथे विजयी झाल्या.

भायखळा आणि औरंगाबाद मध्य आणि औरंगाबाद पूर्व मतदारसंघ

2014मध्ये भायखळा मतदारसंघात काँग्रेसचे मधुकर चव्हाण व भाजपाचे मधू (दादा) चव्हाण यांच्यामध्ये लढत होती. तसेच अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळीही स्पर्धेत होत्या. या निवडणुकीमध्ये MIMच्या पठाण यांना 25,314 मतं मिळाली होती ते 1357 मतांनी विजयी झाले होते.

तिकडे औरंगाबाद मध्य मतदारसंघामध्ये इम्तियाज जलील यांना 61,843 मतं मिळाली. शिवसेनेचे प्रदीप जयस्वाल यांना 41,861 तर भाजपच्या किशनचंद तनवाणी यांना 40,770 मतं मिळाली होती. याचाच अर्थ शिवसेना आणि भाजप यांची युती असती तर दोघांच्या मतांची बेरीज 80 हजारपेक्षाही जास्त होते. त्यामुळेच या दोन पक्षांमध्ये विभागल्या गेलेल्या मतांचा फायदा MIMला झाला असं म्हणता येईल.

उल्लेखनीय बाब ही की या मतदारसंघात काँग्रेसने मुस्लीम उमेदवार देऊनही ते 9,093 मते मिळून सहाव्या क्रमांकावर फेकले गेले होते.

फोटो स्रोत, FACEBOOK/ATUL SAVE

फोटो कॅप्शन,

औरंगाबादमधील प्रचारसभेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप आमदार अतुल सावे, शिवसेनेचे प्रदीप जयस्वाल

औरंगाबाद पूर्वमध्ये भाजपाच्या अतुल सावे यांना 64,528 मतं मिळाली तर MIMचे उमेदवार डॉ. अब्दुल कादरी यांना 60,268 मते मिळाली होती. म्हणजे केवळ चार हजार मतांनी MIM इथे मागे पडला.

शिवसेनेच्या उमेदवार कला ओझा (या तेव्हा शहराच्या महापौरही होत्या) यांना फारच कमी मतं मिळाली. या मतदारसंघामध्ये तेव्हाच्या आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्री राजेंद्र दर्डा यांचा पराभव झाला होता.

2019 मध्ये याच मतदारसंघांमध्ये MIMची स्थिती

नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये औरंगाबाद मध्य मतदारसंघात MIM ने नसिरुद्दीन सिद्दिकी यांना तिकीट दिले होते. (मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत MIMचे आमदार इम्तियाज जलील विजयी झाले आणि ते औरंगाबादचे खासदार झाले). मात्र यावेळेस शिवसेनेच्या प्रदीप जयस्वाल यांनी MIMचा पराभव केला. जयस्वाल 13,892 मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत.

औरंगाबाद पूर्व मतदारसंघात डॉ. अब्दुल कादरी यांना भाजपच्या अतुल सावे यांनी पुन्हा एकदा पराभूत केले आहे. अतुल सावे यांचं गेल्या निवडणुकीत मताधिक्य 4,260 इतकंच होतं. त्यांनी यंदा 13,930 मतांनी आघाडी घेतली आहे. शिवसेना-भाजपा एकत्र लढणं हे त्यामागचं कारण असू शकेल.

भायखळ्यात शिवसेनेचा झेंडा

भायखळा मतदारसंघात वारिस पठाण यांना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. शिवसेनेच्या यामिनी यशवंत जाधव यांनी त्यांना 20,023 मतांनी पराभूत केले. मतदारसंघ पुनर्रचनेआधी हा भाग चिंचपोकळी मतदारसंघाचा भाग होता. तेव्हा 2004 साली अखिल भारतीय सेनेचे अरुण गवळी त्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते.

त्यानंतर 2009 साली काँग्रेसचे मधुकर चव्हाण भायखळ्याचे आमदार झाले आणि 2014 साली वारिस पठाण यांना विधानसभेत जाण्याची संधी मिळाली आणि आता 2019 साली शिवसेनेला इथं यश मिळालं आहे.

धुळे शहर आणि मालेगाव मध्य मतदारसंघ

या निवडणुकीमध्ये MIMला धुळे शहर आणि मालेगाव मध्य इथं यश मिळालं आहे. धुळे शहर मतदारसंघात शाह फारुख अन्वर यांनी राजवर्धन कदमबांडे यांचा 3,307 मतांनी पराभव केला आहे.

गेल्या निवडणुकीत इथं भाजपचे अनिल गोटे 12,928 मतांनी विजयी झाले होते. अनिल गोटे यांनी आपल्या लोकसंग्राम पक्षातर्फे ही निवडणूक लढवली. मात्र ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. शाह फारुख अन्वर यांना 28.93 टक्के मतं मिळाली आहेत.

फोटो स्रोत, FACEBOOK/ASADUDDIN OWAISI

मालेगाव मध्य मतदारसंघात MIMचे मोहम्मद इस्माइल अब्दुल खलिक विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या आसिफ शेख रशिद यांचा 38,519 मतांनी पराभव केला आहे.

शेख आसिफ रशिद 2014 साली इथं विजयी झाले होते. तेव्हा त्यांना 16,151 मतांची आघाडी मिळाली होती. मोहम्मद इस्माइल अब्दुल खलिक यांना एकूण मतांपैकी 58.52 टक्के मिळाली आहेत. तर शेख आसिफ यांना 39.29 टक्के मते मिळाली आहेत.

फोटो स्रोत, Twitter

सोलापूर मध्य मतदारसंघाचा निकाल पाहाता MIM इथं दुसऱ्या स्थानावर आहे. प्रणिती शिंदे यांना यंदा 51,153 मते तर MIMच्या हाजी फारुख मकबूल शाब्दी यांना 38,619 मते मिळाली आहेत.

गेल्या निवडणुकीत प्रणिती 9,769 मतांनी विजयी झाल्या होत्या आता त्यांमा 12,719 इतकं मताधिक्य मिळालं आहे. या निवडणुकीमध्ये सोलापूर शहरमध्य, भायखळा, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पूर्व या मतदारसंघांमध्ये MIM दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला दिसून येतो.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)