क्यार चक्रीवादळ: ऐन दिवाळीत कोकण आणि गोवा किनारपट्टीला धोका? #5मोठ्याबातम्या

चक्रीवादळ

फोटो स्रोत, Getty Images

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. कोकण आणि गोवा किनारपट्टीला 'क्यार' चक्रीवादळाचा धोका?

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण आणि गोवा किनारपट्टीला 'क्यार' या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे.

येत्या 48 तासात महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी ऐन दिवाळीत हे वादळ कोकण आणि गोवा किनारपट्टीवर धडकणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. ही बातमी ABP माझाने दिली आहे.

गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडला मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असून ढगफुटीसारखा पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याच्या तज्ज्ञांनी दिला आहे. वादळाचा फटका मुंबईलाही बसणार आहे.

UPDATE - भारतीय हवामान विभागाने आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार हे चक्रीवादळ पश्चिम आणि वायव्य दिशेने जाण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांच्या कालावधीत हे वादळ ओमानच्या दिशेने सरकेल.

क्यार चक्रीवादळासंदर्भातले सर्वांत ताजे अपडेट पाहण्यासाठी इथे किल्क करा.

केरळ, तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक राज्यातील अनेक बोटी आश्रयासाठी कोकणातील सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या देवगड बंदरात आणल्या आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व बोटी देवगडमध्ये दाखल झाल्या आहेत.

'क्यार' चक्रीवादळचा फटका मासेमारी व्यवसायाला आणि पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तळकोकणात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील मुख्य पीक असलेलं भात पिकांचे मोठं नुकसान झाले आहे.

2. ऐन दिवाळीच्या काळात स्टेट बँकेचा नफा 3 हजार कोटीच्या पार

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने जोरदार मुसंडी मारली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत बँकेच्या निव्वळ नफ्यात तिप्पट वाढ होऊन नफा 3011.73 कोटींवर पोहचला आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच तिमाहीत बँकेला 944.47 कोटी रुपये इतका नफा झाला होता.

ही बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे.

3. 25 वर्षांत प्रथमच नक्षल कारवायामुक्त निवडणूक

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 25 वर्षात पहिल्यांदाच नक्षल कारवायामुक्त निवडणुका झाल्या आहेत. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. विशेष म्हणजे यावेळची मतदानाची टक्केवारी (70.26 टक्के) राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत द्वितीय क्रमांकाची ठरली आहे.

पोलीस दलाच्या योग्य नियोजनासोबतच जवानांनी घेतलेल्या मेहनतीमुळे हे शक्य झाले असून लोकांना नक्षलवाद नको, तर लोकशाही मार्गाने विकास हवा आहे, हेच यातून सिद्ध होत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

4. खडसेंच्या मुलीला पाडणं ही भाजपची चाणक्यनीती : छगन भुजबळ

विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या मुलीला पाडणं ही भाजपाची चाणक्यनीती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे. टीव्ही 9 मराठीने ही बातमी दिली आहे.

विधानसभा निकालसंबंधी नाशिकमध्ये घेतलेल्या एक पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रोहिणी खडसे यांचा जळगावातील मुक्ताईनगर मतदारसंघात पराभव झाला. शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा पराभव केला. याबाबत छगन भुजबळ यांनी ही भाजपची चाणक्यनीती होती असं नमूद केलं.

5. भारत, चीन वादग्रस्त भागात एकत्रितरीत्या गस्त घालणार

अरुणाचल प्रदेशमधल्या भारत-चीन सीमारेषेवर असणाऱ्या वादग्रस्त भागात पहिल्यांदाच भारत आणि चीन एकत्रितरीत्या गस्त घालणार आहेत. ही बातमी हिंदुस्थान टाइम्सने दिली आहे.

या सीमारेषेवर 13 असे भाग आहेत जिथे भारत आणि चीन दोघांनीही आपला हक्क सांगितला आहे आणि त्यावरून दोन्ही देशांमध्ये वाद सुरू आहे. दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये एकमेकांबद्दल विश्वास वाढावा यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याचं सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)