हरियाणा विधानसभा: गोपाल कांडा ते चौटाला, भाजपने असा बदलला गेम

दुष्यंत चौटाला आणि मनोहरलाल खट्टर Image copyright Getty Images

हरियाणात पुन्हा भाजपची सत्ता येणार हे निश्चित झालं आहे. नवं सरकार भारतीय जनता पक्ष आणि जननायक जनता पार्टी (जेजेपी) यांच्या युतीचं असेल.

गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की मुख्यमंत्री भाजपचा तर उपमुख्यमंत्री जेजेपीचा असेल.

दोन्ही पक्षांचे नेते आज (शनिवारी) राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा करतील.

"जनतेने दोन्ही पक्षांना जनादेश दिला आहे, आणि दोन्ही पक्षांनी ठरवलं आहे की हरियाणामध्ये ते एकत्र येऊन सरकार स्थापन करतील," अमित शाह म्हणाले.

अनेक अपक्ष आमदारांनी या युतीला समर्थन दिल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यांनी सरकारला येत्या काळासाठी शुभेच्छाही दिल्या.

अमित शाह यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं नाव तर नाही सांगितलं पण मनोहरलाल खट्टर मुख्यमंत्री तर दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्री होतील अशी अटकळ आहे.

जेजेपीने दिले होते पाठिंब्याचे संकेत

याआधी हरियाणात आपल्या पहिल्याच निवडणुकीत दहा जागा जिंकणाऱ्या जेजेपीने म्हटलं होतं की ते सरकार बनवण्यासाठी कोणत्याही पक्षाला समर्थन द्यायला तयार आहेत पण त्या पक्षाने जेजेपीच्या किमान सामाईक कार्यक्रमाला मान्यता दिली पाहिजे.

शुक्रवारी संध्याकाळी जेजेपीचे प्रमुख 31-वर्षीय दुष्यंत चौटाला यांनी म्हटलं की जो पक्ष जेष्ठांच्या पेन्शनमध्ये वाढ यासह इतर विषयांवर सहमत असेल त्यांच्यासोबत मिळून जेजेपी सरकार स्थापन करेल.

Image copyright facebook

त्यांनी म्हटलं होती की आम्ही संबंधित पक्षांशी बोलू आणि येत्या काही तासात आम्हाला सकारात्मक उत्तर मिळेल.

गुरुवारी झालेल्या मतमोजणीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही. 90 मधल्या भाजपला 40, काँग्रेसला 31, जेजेपीला 10 आणि अपक्ष आमदारांना 7 जागा मिळाल्या. याशिवाय इंडियन नॅशनल लोक दल आणि हरियाणा लोकहित पक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली.

एका प्रेस कॉन्फरन्स दरम्यान दुष्यंत यांना विचारलं गेली की गुरुवारपर्यंत हरियाणातल्या सत्तेची चावी त्यांच्याकडे होती पण आता अनेक अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. याबदद्ल काय सांगाल?

"सत्तेची चावी अजूनही आमच्याकडेच आहे आणि भाजप कोणाबरोबर जाऊ इच्छितं हे त्यांनी ठरवावं," दुष्यंत म्हणाले.

निवडणुकीचे निकाल आल्यानंतर असं म्हटलं जात होतं की जेजेपी नेते दुष्यंत चौटाला किंगमेकर ठरतील पण गुरुवारी रात्रीपर्यंत परिस्थिती बदलली होती.

गुरुवारी रात्री हरियाणा लोकहित पक्षाचे नेते आणि सिरसाचे आमदार गोपाल कांडांनी भाजपला समर्थन देण्याची घोषणा केली. सगळ्या अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे असाही दावा त्यांनी केला.

"माझे वडील 1926 पासून आरएसएसशी संबंधित होते. त्यांनी स्वातंत्र्यानंतर देशाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जनसंघाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.

अपक्षांचा पाठिंबा

हरियाणात निवडून आलेल्या 7 अपक्ष आमदारांपैकी अनेक जण भाजपमधून बाहेर पडलेले बंडखोर आहेत. त्यातल्या अनेकांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा गोपाल कांडा

रानियामधून जिंकलेले रणजीत सिंह यांनी म्हटलं की, "मी तर स्पष्टच सांगितलंय की माझा भाजपला पाठिंबा आहे."

भाजपचे बंडखोर आमदार नयनपाल रावत यांनीही म्हटलं की ते पुन्हा भाजपला पाठिंबा देतील. "पक्षनेतृत्वाकडे कोणालाही मंत्री बनवण्याचे अधिकार असतात. माझीही महत्त्वाकांक्षा आहेच की मी मंत्री बनावं म्हणजे माझ्या मतदारसंघासाठी मी चांगलं काम करू शकेन."

आणखी एक अपक्ष उमेदवार रणधीर गोलान यांनी म्हटलं की, "भाजप माझी आई आहे. मी 30 वर्ष पक्षाचा कार्यकर्ता होतो. मी कुठे जाणार?"

Image copyright ANI
प्रतिमा मथळा रणधीर गोलान

दरम्यान, हरियाणाचे मावळते मुख्यमंत्री मनोहर खट्टर भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घ्यायला दिल्लीत पोहचले. त्याआधी ते म्हणाले होती की हरियाणात आमचंच सरकार बनेल याबाबत आम्ही आशावादी आहोत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)