रोहित पवार हे शरद पवारांचे राजकीय वारसदार ठरतील का?

  • नीलेश धोत्रे
  • बीबीसी मराठी
रोहित पवार

फोटो स्रोत, facebook

"वारसदार कुणी व्यक्ती ठरवत नाही, लोक ठरवत असतात. आज मी शिकतोय, शेवटपर्यंत शिकतच राहणार आहे. लोक जेव्हा मला असं संबोधतात तेव्हा खरंच मनापासून आनंद होते. पण आनंद होत असताना एक मोठी जबाबदारी सुद्धा आहे की आपल्याला काम खूप करायचंय. साहेबांसारखं होण्यासाठी अनेक काळ जाऊ द्यावा लागेल," आमदार झाल्यानंतर बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत रोहित पवार यांनी ही पवारांचे वारसदार म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं या प्रश्नाला उत्तर देताना ही प्रतिक्रिया दिली.

निवडून आल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी कराडमधलं प्रितीसंगम गाठलं आणि यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिंना अभिवादन केलं. त्याच्या आदल्या दिवशीच म्हणजेच निकाल लागला त्या दिवशी त्यांनी ज्यांना हारवलं त्या राम शिंदे आणि त्यांच्या कुटुंबीयांची त्यांनी भेट घेतली. शिंदे यांच्या आईचे आशिर्वादही घेतले.

कर्जत-जामखेडमधून निवडणूक लढवण्याची तयारी रोहित पवार यांनी सुरू केली आणि ते एकदम चर्चेत आले. पण या चर्चेला सुरुवात मात्र एका वेगळ्याच कारणानं झाली.

गोष्ट 11 फेब्रुवारी 2019ची आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांनी रोहित पवार यांच्या बरोबरचा फोटो ट्वीट केला आणि सोशल मीडियात चर्चा सुरू झाल्या. वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत होत्या. त्याचं कारणही तसंच आहे. विखे-पाटील आणि पवार घराण्यांमधलं वैर सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. ही ती वेळ होती जेव्हा सुजय अहमदनगरमधल्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत होते.

राष्ट्रवादीकडून त्यांच्यासाठी जागा सोडली जाईल का याची चाचपणी करत होते आणि राष्ट्रवादीतून त्यांना विरोध होत होता. त्याच दरम्यान दोन्ही तरुण नेत्यांची भेट झाली आणि तिथूनच रोहित पवार यांच्याविषयी महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली.

त्याआधी रोहित पवारांबद्दल फारशी चर्चा होत नसे. शरद पवारांचे नातू आणि जिल्हा परिषद सदस्य इतकीच त्यांच्याबाबत माहिती लोकांजवळ होती. पण या भेटीनंतर ते चर्चेत आले.

रोहित पवार हे शरद पवारांचे सख्खे भाऊ अप्पासाहेब पवार यांचे नातू आहेत.

फोटो स्रोत, facebook

कर्जत-जामखेड मधून निवडणूक लढवली तर विखेंसारख्या जिल्ह्यातल्या प्रबळ घराण्याची साथ मिळावी हा सुद्धा त्यांच्या भेटी मागचा हेतू होता, असंही बोललं जाऊ लागलं.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोहित पवार यांचे आजोबा अप्पासाहेब पवार हे एकेकाळी विखे-पाटलांच्या साखर कारखान्याचे एमडी होते.

तसं रोहित पवार यांनी त्यांच्या रजकीय जीवनाची सुरुवात बारामतीतूनच केली आहे. पुणे जिल्हा परिषदेसाठी ते बारामती तालुक्यातल्या शिरसूफळमधून 2017 मध्ये सदस्य म्हणून निवडून आले होते.

शिवाय कर्जत-जामखेडमधल्या शेतकऱ्यांशी रोहित त्यांच्या साखर कारखान्यामुळे आधीपासूनच जोडले गेले होते.

बारामतीमध्ये होणाऱ्या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांनी राज्यभरातल्या शेतकऱ्यांशी आणखी संपर्क साधता आला. त्याचबरोबर त्याकाळात बारामतीमध्ये आलेल्या लोकांना तिथंली विकासकामं कामं दाखवण्यावर त्यांचा भर असायचा.

फोटो स्रोत, facebook

तरीही कर्जत-जामखेड मतदारसंघ त्यांच्यासाठी तितका सोपा नव्हता. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राम शिंदे हे कॅबिनेट मंत्री आणि सलग 2 टर्म इथं आमदार होते.

शरद पवारांचे वारसदार ठरतील?

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

कर्जत-जामखेडमध्ये झालेल्या निवडणुकीच्या विषयावरून ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा रोहित यांच्या राजकारणाची तुलना शरद पवार यांच्या राजकारणाशी करतात.

ते सांगतात, "रोहित पवार यांनी शरद पवार यांच्या प्रमाणे राजकारण केलं. ते 6 महिने कर्जत-जामखेडमध्ये तळ ठोकून बसले होते. प्रतिकूल परिस्थितीत विजय खेचून आणायचा ही पवारांची किलर इंस्टिंक्ट रोहित पवारांनी दाखवली आहे. जिद्दीने राजकारण पुढे नेण्याची ताकद त्यांच्यात दिसते. शिवाय आजोबा अप्पासाहेबांसारखी चिकाटी त्यांच्या नातवामध्ये दिसते."

त्याचवेळी शरद पवारांच्या राजकारणात एक दोष आहे आणि त्यापासून रोहित पवार यांना धडा घेऊन पुढे जावं लागेल, असंही भटेवरा सांगतात.

"शरद पवारांच्या राजकारणात एक दोष दिसतो. ते कधीच काँग्रेसच्या राजकारणात स्थिर राहिले नाहीत. ते महारष्ट्रात फारसं काही साध्य करू शकले नाही. त्यांना कधीच एकट्याच्या बळावर राज्यात सत्ता आणता आली नाही. तसंच त्यांच्यावर ते भाजपला कधीही साथ देऊ शकतात असा आरोप कायम होतो. त्यासाठी पुलोदचं आणि 2014चं उदाहरण दिलं जातं. पवारांच्या या राजकारणाची रोहित यांच्याकडून पुनरावृत्ती होऊ नये. हे लक्षाच घेऊनच त्यांना पुढे जावं लागेल," असं भटेवरा सांगतात.

फोटो स्रोत, facebook

झी 24 तासचे कार्यकारी संपादक आशिष जाधव यांना मात्र रोहित यांच्या राजकारणात येण्यामागे शरद पवार यांचंच नेपथ्य असल्याचं वाटतं.

ते सांगतात, "शरद पवारांना त्यांच्या विचारांचा वारसा अजित पवारांमध्ये कधी दिसला नाही ही त्यांची खंत होती, त्यांच्या कृतीतून त्यांना कधी तो दिसला नाही. त्यामुळे ते तो वारसा कधी आर. आर. पाटील, जयंत पाटील किंवा दिलिप वळसे पाटील यांच्याच पवारांनी शोधला. माझ्या घरातला कुणी व्यक्ती माझ्या विचारांचा वारसा सर्वदूर सांगेल त्याचा धागा शरद पवारांना दिसला. त्यानंतर मग शरद पवारांनी रोहितवर लक्ष केंद्रीत केलं. त्या अर्थानं रोहित शरद पावरांचा खरा वारसदार होऊ शकतो."

पण त्याचवेळी अजित पवार हे पक्षातले मोठे नेते आहेत. महाराष्ट्रातली पक्षाची सर्व सुत्रं त्यांच्याच हातात आहेत. त्यामुळे रोहित पवार यांना कुठलाही वेगळा विचार न करता त्यांच्या कलानंच राजकारण करावं लागेल, अजित पवार यांना बायपास करणं रोहित यांना शक्य होणार नाही, असं सुद्धा जाधव सांगतात.

रोहित पवारांनी तयारी कशी केली?

रोहित यांचे अजोबा अप्पासाहेब पवार हे समाजकारणात होते. ते कृषी तज्ज्ञ होते. ते राजकारणापासून दूर होते. रोहित यांचे आईवडील सुद्धा राजकारणापासून दूर होते. पण ते समाजकारणात कार्यरत होते. त्यांच्या कुटुंबावर राजकारणत अन्याय झाल्याची चर्चा बारामतीमध्ये कायम होत असते.

पण त्यांच्याच कुटुंबाकडून बारामतीमध्ये वेगवेगळे उपक्रम, कृषीप्रदर्शन, भिमथडीची जत्रासारखे उपक्रम आयोजित केले जातात. या आयोजनांच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षांमध्ये रोहित यांचा संबंध समाजकारणाशी आला. त्याआधीपर्यंत ते बारामती अॅग्रो ही त्यांची कंपनी सांभाळत होते. त्यांच्यावर साखर कारखान्याचीसुद्धा जबाबदारी त्यांच्या वडिलांनी दिली होती.

फोटो स्रोत, facebook

पवार कुटुंबीयांपैकी शरद पवार यांचाच त्यांच्यावर सर्वांत जास्त प्रभाव असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात. रोहित बारामतीमध्येच राहिले आणि शिकले, त्यामुळे त्यांना स्थानिक राजकारण, समाजकारण आणि शरद पवार यांना जवळून अनुभवता आल्याचंही स्थानिक पत्रकार सांगतात.

कौटुंबिक पार्श्वभूमी

रोहित हे शरद पवार यांचे नातू आहेत. दिनकर म्हणजेच आप्पासाहेब पवार हे शरद पवार यांचे सख्खे भाऊ. त्यांचे पुत्र राजेंद्र. आणि राजेद्र यांचा मुलगा रोहित पवार.

रोहित यांच्या आई सुनंदा पवार या महिलांसाठी बचतगटांची चळवळ चालवतात. त्यांच्या माध्यमातून दरवर्षी पुण्यात भरवली जाणारी भिमथडी जत्रा प्रसिद्ध आहे. गेल्या काही वर्षांपासून या भिमथडीच्या जत्रेच्या संपूर्ण आयोजनाची जबाबदारी रोहित स्वतः साभाळत आहेत.

रोहित यांना एक बहीण आहे. त्यांचं नाव सई नेगी आहे.

रोहित यांचं लग्न पुण्यातले प्रसिद्ध बिल्डर सतिश मगर यांची मुलगी कुंती यांच्याशी झालं आहे. त्यांना आनंदिता आणि शिवांश अशी दोन मुलं आहेत.

रोहित पवार हे बारामती ऍग्रो या कंपनीचे ते सीईओ आहेत. तसंच इंडियन शुगरमिल असोसिएशनचे ते अध्यक्षसुद्धा आहेत.

रोहित यांचं शिक्षण बारामतीमध्येच त्यांच्या आजोबांनी सुरू केलेल्या विद्या प्रतिष्ठान या संस्थेत झालं आहे. त्यानंतर मुंबई विद्यापिठातून त्यांनी बॅचलर ऑफ मॅनेजमेंट ही पदवी घेतली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)