भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना 'भारतरत्न' द्या - काँग्रेस #5मोठ्याबातम्या

मनिष तिवारी Image copyright Getty Images

आजच्या विविध दैनिकांतील आणि वेबसाईटवरील प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी या आहेत आजच्या पाच मोठ्या बातम्या :

1) भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना 'भारतरत्न' द्या - काँग्रेस

शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना 'भारतरत्न' या भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात यावं, अशी मागणी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मनिष तिवारी यांनी केलीय. एनडीटीव्हीनं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

पंजाबमधील मोहालीस्थित विमानतळाचं 'शहीद-ए-आजम भगतसिंग विमानतळ' असं नामकरण करावं, अशी मागणीही तिवारींनी केली.

तसेच, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांनाही अधिकृतरित्या 'शहीद-ए-आजम' म्हणून घोषित करावं.

काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं आपल्या जाहीरनाम्यात विनायक दामोदर सावरकर यांना 'भारतरत्न' देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून करण्यात आलेल्या या मागणीला महत्त्व आलंय.

2) कोकणाला चक्रीवादळाचा तडाखा, राज्यात जोरदार पावसाचा अंदाज

अरबी समुद्रातील 'कयार' चक्रीवादळानं तीव्र रूप धारण केल्यानं शनिवारी (26 ऑक्टोबर) कोकण किनारपट्टीला मोठा फटका बसला. तसेच, वादळामुळं राज्यभरात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. कोकण किनारपट्टीलगतच्या आणि राज्यातील इतरत्रही शेतीचं मोठं नुकसान झालं. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

Image copyright Getty Images

'कयार' चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवरुन ओमानच्या दिशेनं जात असून, पुढील दोन दिवसात वादळाची तीव्रता वाढणार आहे. ताशी 180 ते 200 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय.

दुसरीकडे, कयार वादळ राज्याच्या किनारपट्टीपासून 190 किलोमीटरवर आहे. परिणामी येत्या 24 तासांत मुंबईसह कोकणात मुसळधार, तर राज्याच्या उर्वरित भागातही पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय.

3) प्राध्यापकांची रिक्त पदं भरा, अन्यथा कारवाई - यूजीसी

देशभरातील विद्यापीठं आणि महाविद्यालयांमधील प्राध्यापकांची पन्नास टक्क्यांहून अदिक पदं रिक्त आहेत. ही पदं न भरल्यास कारवाईचा इशारा विद्यापीठ अनुदान आयोगानं (यूजीसी) विद्यापीठांच्या कुलगुरूंना दिलाय. टाईम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिलीय.

प्राध्यपकांची पदं भरण्यासाठी यूजीसीकडून पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली असून, आता 10 नोव्हेंबरपर्यंत पदभरती करावी लागणार आहे.

महाराष्ट्रातही प्राध्यापकांची हजारो पदं रिक्त असल्याचे उघड झाले आहे. त्यातील 3,580 पदं भरण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. मात्र, भरती अद्याप सुरू झालेली नाहीय.

4) रेल्वेच्या उत्पन्नात 3901 कोटी रूपयांनी घट

भारतीय रेल्वेच्या दुसऱ्या तिमाहीचे उत्पन्न जाहीर झाले. यानुसार, रेल्वेच्या माल वाहतुकीच्या उत्पन्नात 3901 कोटी रूपयांची घट झाली आहे. हिंदुस्तान टाईम्सनं ही बातमी दिलीय.

पहिल्या तिमाहीच्या तुलनेत प्रवासी भाड्याच्या उत्पन्नात 1500 कोटी रूपये, तर माल वाहतुकीच्या उत्पन्नात 3901 कोटी रूपयांची घट झालीय.

Image copyright Getty Images

मध्य प्रदेशातील आरटीआय कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी दाखल केलेल्या अर्जाच्या उत्तरात भारतीय रेल्वे प्रशासनानं ही आकडेवारी दिली.

रेल्वेच्या प्रवासी भाड्याचे पहिल्या तिमाहीतील उत्पन्न 13,398.92 कोटी रूपये होतं, ते दुसऱ्या तिमाहीत 13,243.81 कोटी रूपये झालंय. तर माल वाहतुकीचं पहिल्या तिमाहीत 29,066.92 कोटी असलेलं उत्पन्न दुसऱ्या तिमाहीत 25,165 कोटी रुपये एवढं झालंय.

5) महाराष्ट्रात तब्बल 6,390 जणांना डेंगीची लागण

महाराष्ट्रात डेंगीनं थैमान घातल्याचं ताज्या आकडेवारीवरून समोर आलंय. राज्यातील 31 जिल्हे आणि 26 शहरांमध्ये एकूण 6,390 जणांना डेंगीची लागण झाली आहे. सकाळनं ही बातमी दिलीय.

Image copyright Getty Images

राज्यात अनेक भागात पावसाची रिपरिप सुरूच आहे. त्यामुळं घरांच्या छपरांवर, खड्ड्यांमध्ये साठत असलेल्या घाण पाण्यामुळं डेंगीचे डास तयार होत असल्यानं ही साथ पसरतक आहे. डेंगीवर नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून जनजागृती मोहित हाती घेण्यात आलीय.

30 सप्टेंबरपर्यंत डेंगीमुळं चार जणांच्या मृत्यूची नोंदही झालीय. 2017 साली महाराष्ट्रात डेंगीमुळं 65 जणांचा, तर 2018 साली 70 जणांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)