नानम्मलः शंभरीला टेकलेल्या योगाआजीनं मला योगासनं करून दाखवली तेव्हा...

  • ओंकार करंबेळकर
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
नानम्मल

फिकट गुलाबी साडी, अगदी साधं पांढरं ब्लाऊज, तितकेच पांढरे झालेले केस असणारी लहानखुरी चण असलेल्या त्या बाई... एखादं किल्ली दिलेलं यंत्र चालावं तशा हालचाली करत योगासनं करणाऱ्या त्या आजींना पाहिल्यावर यांना एकदा भेटायचंच असा विचार केला आणि त्यांचा पत्ता शोधून काढला.

या होत्या नानम्मल आजी. वयाची 99 वर्षे पूर्ण केलेल्या नानम्मल आजींचं काल निधन झालं आणि दोन वर्षांपूर्वी त्यांची याच काळात झालेली भेट पुन्हा डोळ्यांसमोर आली.

सोशल मीडियावर इंडियाज ओल्डेस्ट योगिनी, योगाग्रॅनी अशा नावानं त्यांचे व्हीडिओ भरपूर पाहायला मिळाले होते पण कोइमतूरमध्ये त्या राहातात यापेक्षा त्यांच्याबद्दल फारशी माहिती मिळत नव्हती.

शेवटी कसाबसा त्यांच्या मुलाचा म्हणजे बालाकृष्णन यांचा फोननंबर शोधून काढला. मी बंगळुरूमध्ये आहे म्हटल्यावर ते म्हणाले, "सरळ बस पकडून कोईमतूरला ये. आमचं योगा सेंटर सहज सापडेल इतकं प्रसिद्ध आहे."

कोईमतूरला गेल्यावर खरंच त्यांचं ओझोन योगा सेंटर सहज सापडलं. बालाकृष्णनसुद्धा साधारण साठीच्या आसपासच्या वयाचे होते. आई म्हणजे नानम्मल सध्या भावाकडे राहात आहे. थोड्यावेळानं आपण तिला भेटायला जाऊ असं सांगून ते मला योगा स्टुडिओ दाखवायला घेतला.

तिथं गेल्यागेल्या त्यांच्या पत्नीनं गढुळशा पाण्याचा पेला हातात ठेवला. मी गोंधळलेला पाहून ते म्हणाले 'ड्रींक्क'. ते गोडसर पाणी प्याल्यावर म्हणाले. "हे मध घातलेलं पाणी होतं. आमच्याकडे चहा कोणीच पित नाही. आम्ही सगळे खाण्या-पिण्याचे नियम कडक पाळतो. "

नानम्मल आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबानं योगासनं आणि योगासनांच्या प्रचाराला वाहून घेतलं होतं. बालाकृष्णन यांनी भिंतीवरचे फोटो आणि पदकं दाखवायला सुरुवात केली. गेल्या चाळीस पन्नास वर्षात लाखो विद्यार्थी त्यांच्या स्टुडिओत किंवा मोठ्या कार्यक्रमांमध्ये त्यांच्यापासून योगासनं करण्याची प्रेरणा घेऊन गेले होते.

फोटो स्रोत, Getty Images

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

बालाकृष्णन यांनी आता बोलतबोलत माझा चांगलाच ताबा घेतला होता. एखादं लहान मूल बोलावं तसं ते धडाधड माहिती देत सुटले होते. अमक्या कार्यक्रमात काय झालं होतं. आईला आता कसं फारसा प्रवास झेपत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपतींची भेट झाली तेव्हा काय झालं असे भरपूर विषय त्यांच्याकडे होते.

नंतर फोटोंचा अल्बम काढून ते तोडक्यामोडक्या हिंदी-इंग्लिशमध्ये मला माहिती सांगू लागले. नानम्मल यांच्या कुटुंबातले 35 जण योगासनं शिकवत असल्याचं त्यांनी सांगितलं. देश-परदेशात त्यांचे विद्यार्थी असल्याचं समजलं. त्यांच्या स्टुडिओमध्ये शिकून गेलेले लोक परदेशात योगासनांचे प्रशिक्षणही देतात. बालाकृष्णन एकूणच योगासनांच्या प्रसारावर आणि त्यांच्या प्रशिक्षण केंद्रावर खुश होते.

थोड्यावेळानं ते त्यांच्या भावाच्या आरोग्य मंदिरात घेऊन गेले. तिथं आम्हाला नानम्मल भेटणार होत्या. आम्ही येतोय हे आधी कळल्यामुळे त्या दारामध्ये खुर्ची टाकून बसल्या होत्या. नेहमीची गुलाबी साडी, त्यांची ओळख बनलेली कपाळावरची ती विभूतीची तीन बोटं पाहून त्यांना कोणीही ओळखू शकेल अशा त्या होत्या.

थोडावेळा नमस्कार स्वागतात गेल्यावर त्याही बालाकृष्णन यांच्यासारख्याच खुलल्या आणि बोलू लागल्या.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

राष्ट्रपतींकडून नारीशक्ती पुरस्कार स्विकारताना

नानम्मल यांचं कुटूंब खरं तर आंध्र प्रदेशातलं. नायडू. कोईमतूरला कापड व्यवसायात आंध्र प्रदेशातले अनेक तेलगू लोक येऊन राहिले होते त्यापैकीच ते होते. पण आता घरात सगळीकडे तमिळच बोललं जातं. नानम्मल म्हणाल्या, मी अगदी लहानपणापासून योगासनं करत आहे.

आमच्या आईनंसुद्धा शंभरी पार केली होती. मला आज सुईत सहज दोरा ओवता येतो. मला चष्माही लागत नाही. सकाळी थोडसं जेवल्यावर रात्री फक्त दूध आणि केळ किंवा एखादं फळ खाते. तोच माझा आहार. रोजचा योगासनांचा क्रम आजही चुकवलेला नाही.

थोड्यावेळानं नानम्मल बाईंनी बाहेर उन्हात सतरंजी टाकली आणि योगासनं करून दाखवयाला सुरुवात केली. एकदा हात जोडून प्रार्थना केल्यावर त्यांनी सलग आसनं सुरू केली.

पाठ टेकवून आपल्याच चेहऱ्यावरून पाय मागे नेऊन मागे जमिनीवर टेकवले. हे त्यांचं फेमस हलासन. इतक्या सहज आणि वेगानं हलासन करणं तेही वयाच्या 97-98 व्या वर्षी आजिबातच सोपं नाही. पण नानम्मल यांच्यासाठी त्याचं काहीच विशेष नाही. सूर्यनमस्कार आणि काही आसनं झाल्यावर मीच त्यांना थांबवलं. सकाळी बोलताना त्यांची तब्येत थोडी नरम वाटत होती. त्यामुळं आता बास अशी विनंती केल्यावर थांबल्या.

नानम्मल आजींचं सगळं आयुष्य नाकासमोर चालण्यात गेलं होतं. कधी वेगळा विचार नाही की शिस्तीमध्ये भंग नाही. आपण आपल्या आयुष्यात स्वीकारलेल्या गोष्टी नित्य नेमानं करत राहणं, कुरबूरी, तक्रारी न करणं हे त्यांचं धोरण असावं. इतकं करून चेहरा हसतमुख ठेवायचा हे त्यांनी जन्मभर पाळलं होतं. कदाचित तेच त्यांच्या दीर्घायुष्याचं रहस्य असावं.

भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये योगासनांचं वारं पुन्हा एकदा आल्यावर नानम्मल आजी सगळीकडे प्रसिद्ध झाल्या. या वयात योगासनं करतात, शिकवतात ही कौतुकाची गोष्टी टीव्ही, यूट्यूबवरून जगभरात गेली होती. तामिळनाडूसह इतर राज्यांमध्ये त्यांचे कार्यक्रम अगदी आताआतापर्यंत होत होते. नारीशक्तीसारखे अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले होते. पण त्यांच्या साधेपणात-वागण्यात काहीच बदल झालेला नव्हता.

योगासनं, सूर्यनमस्कार ही काही वेगळी, नव्यानं मुद्दाम करण्याची गोष्ट नाही, ते दररोजच्या जगण्यातला भाग आहेत. असं त्या म्हणायच्या. चांगल्या आरोग्याला तुम्ही प्राधान्य दिलंत तर सगळे प्रश्न सुटतील आणि तुमची पिढी सुखी होईल.

नानम्मल आजींचा निरोप घेऊन बाहेर पडल्यावर त्यांच्या या सातत्याचं, व्रतस्थ आयुष्याचं कौतुक वाटलंच पुन्हा त्यांच्यासारखं सर्वांना जगता आलं पाहिजे असंही वाटलं. त्यांच्या मार्गावर जगण्यासाठी माझ्या पिढीमध्ये शक्ती यावी अशी मनोमन प्रार्थना केली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)