विधानसभा निकाल: या पाच ठिकाणी नोटामुळे बिघडलं उमेदवारांचं गणित

  • हर्षल आकुडे
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
मतदान

फोटो स्रोत, Getty Images

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. मुख्यमंत्री कोण होणार आणि सत्तास्थापन कशा पद्धतीने होणार याबाबत खलबतं सुरू आहेत. पण यंदाच्या निकालातून रंजक आकडेवारी समोर येत आहे.

महाराष्ट्रात एकूण पाच जागा अशा आहेत जिथे नोटाने उमेदवारांचा घात केला आहे. राज्यातील विधानसभेच्या 288 जागांपैकी दोन ठिकाणच्या मतदारसंघात नोटाने दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली आहेत. पाच ठिकाणी 10 हजारांच्या वर, 13 ठिकाणी पाच हजारांच्या वर तर जवळपास 30 ठिकाणी नोटाने सुमारे 4 हजार मतं घेतली आहेत. राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत NOTA म्हणजेच 'नन ऑफ द अबोव्ह' म्हणजेच 'वरीलपैकी कुणीही नाही' या पर्यायाला मोठ्या प्रमाणात मतदान दिसून आलं.

2013 मध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा नोटा हा पर्याय वापरण्यात आला होता. त्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत नोटा हा पर्याय ईव्हीएम मशिनमध्ये सर्वांत शेवटी देण्यात येतो. गेल्या काही वर्षांपासून नोटाला मिळणाऱ्या मतांची टक्केवारी वाढल्याचं स्पष्ट झालं आहे.

चुरशीची लढाई झालेल्या महाराष्ट्रातील पाच मतदारसंघात नोटामुळे निकाल पलटल्याचं पाहायला मिळालं आहे. मुंबईतील चांदिवली, ठाण्यातील भिवंडी पूर्व, पुण्यातील दौंड, अहमदगरमधलं कोपरगाव तर गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगावमध्ये नोटाने उमेदवारांना घाम फोडल्याचं दिसून आलेलं आहे. याठिकाणी विजयी उमेदवाराच्या मताधिक्यापेक्षा नोटाला मिळालेलं मतदान जास्त आहे.

आता नोटाला मिळणारी मतं ही पराभूत उमेदवाराच्याच खात्यात जातील किंवा नाही हा एक प्रश्न असला तरी नोटाला मिळालेल्या मतांची ही आकडेवारी अतिशय रंजक आहे.

या पाच मतदारसंघात उमेदवारांना मिळालेल्या मतांवर एक नजर टाकूया..

1.चांदिवली

मुंबईतील चांदिवली विधानसभा मतदारसंघ हा मुंबईच्या उत्तर-मध्य मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. या ठिकाणी शिवसेनेकडून दिलीप लांडे तर काँग्रेसकडून नसीम मोहम्मद आरिफ खान यांनी उमेदवारी दाखल केली होती.

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन,

दिलीप लांडे

दिलीप लांडे यांना 85 हजार 879 तर तर नसीम खान यांना 85 हजार 470 इतकी मतं मिळाली. इथं फक्त 409 मतांनी दिलीप लांडे निवडून आले. पण या मतदारसंघात नोटाला मिळालेली मते 3 हजार 360 मतं मिळाली आहेत. या मतांपैकी निम्मी मतं जरी फिरली असती तर याठिकाणचं चित्र वेगळं राहिलं असतं.

2.अर्जुनी मोरगाव

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव मतदारसंघ भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. इथंसुद्धा अत्यंत चुरशीची लढाई पाहायला मिळाली. इथं माजी सामाजिक न्याय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजकुमार बडोले यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनोहर चंद्रिकापुरे यांचं आव्हान होतं.

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन,

मनोहर चंद्रिकापुरे

यामध्ये चंद्रिकापुरे यांनी बडोले यांना पराभूत केलं. चंद्रिकापुरेंना 72 हजार 400 तर बडोलेंना 71 हजार 682 मतं मिळाली. चंद्रिकापुरे 718 मतांनी विजयी झाले असले तरी इथं नोटा पर्यायाला 2045 जणांनी मतदान केलं हे विशेष.

3.कोपरगाव

अहमदनगरमधील कोपरगाव मतदारसंघात नोटामुळे निकालावर परिणाम झाला. इथं विजयी उमेदवाराच्या मताधिक्यापेक्षा दुप्पट मतं नोटाला मिळाली.

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन,

आशुतोष काळे

शिर्डी लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या कोपरगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशुतोष काळे यांना 87 हजार 566 तर भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांना 86 हजार 744 मतं मिळाली. दोघांच्या मतांमध्ये फक्त 822 मतांचं अंतर होतं आणि नोटाला मतं मिळाली 1622.

4.भिवंडी पूर्व

ठाण्यातील भिवंडी पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे रुपेश म्हात्रे विरुद्ध समाजवादी पक्षाचे रईस शेख अशी लढाई रंगली.

यात रईस शेख यांनी बाजी मारली. शेख यांना 45 हजार 537 तर म्हात्रे यांना 44 हजार 223 मतं मिळाली. एकूण 1314 मतांनी शेख विजयी झाले. पण याठिकाणी 1358 मतदारांनी दोन्ही उमेदवारांना नाकारून नोटा हा पर्याय निवडलेला होता.

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन,

रईस शेख

5.दौंड

पुणे जिल्ह्यातील दौंड मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष होतं. इथं भाजपचे राहुल कुल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश थोरात यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळाली.

कुल यांना एकूण 1 लाख 3 हजार 664 तर थोरात यांना 1 लाख 2 918 मतं मिळाली. अखेर कुल यांनी 746 मतांनी विजय मिळवला पण इथं 917 मतदार असेही होते ज्यांना दोन्ही उमेदवार नको होते.

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन,

राहुल कुल

दोन ठिकाणी नोटा दुसऱ्या क्रमांकावर

राज्यात अनपेक्षित निकाल लागला. अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती झाल्या. फेरीनिहाय मतदानाची आकडेवारी समोर येताना उमेदवारांची आघाडी कमी-जास्त होताना दिसली. पण विरोधी पक्षाने तुल्यबळ उमेदवार न दिल्यामुळे दोन ठिकाणी नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.

विशेष म्हणजे निवडणुकीपूर्वी एकतर्फी विजयाचा दावा करून समोर लढण्यासाठी उमेदवार नसल्याचं सांगणाऱ्या शिवसेना-भाजपला याठिकाणी योग्य उमेदवार मिळाला नाही. विरोधी उमेदवार पसंत न आल्यामुळे किंवा योग्य प्रकारे प्रचार न केल्यामुळे याठिकाणी विरोधकांना आव्हान उभं करता आलं नाही.

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन,

धीरज देशमुख

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे कनिष्ठ सुपुत्र धीरज देशमुख काँग्रेसकडून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. लातूर ग्रामीण मतदारसंघातून त्यांच्यासमोर शिवसेनेने सचिन देशमुख यांना तिकीट दिलं होतं. पण सचिन देशमुखांचा धीरज देशमुख यांच्यासमोर टिकाव लागला नाही.

धीरज यांना 1 लाख 35 हजार 6 तर सचिन यांना 13 हजार 524 मतं मिळाली. इथं दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नोटाला तब्बल 27 हजार 500 मतं मिळालेली आहेत. त्यामुळे इथं धीरज यांनी 1 लाख 7 हजार 506 मतांनी नोटाचा पराभव केला, असं म्हटलं तरी योग्य राहील.

लातूरच्या दैनिक सकाळचे वरीष्ठ वार्ताहर हरी तुगांवकर सांगतात, "धीरज देशमुख यांच्याविरुद्ध उभे असलेले सचिन देशमुख संपूर्ण प्रचारादरम्यान गायब असल्याचं दिसून आलं. लातूर ग्रामीणच्या जागेवर मुळात भाजपचा दावा होता. भाजपच्या रमेश कराडांनी इथून तिकीटाची मागणी केली होती. पण ही जागा ऐनवेळी शिवसेनेला सोडण्यात आली."

"सचिन देशमुख यांच्यासारखा अपरिचित चेहरा शिवसेनेने दिला. धीरज यांचा जोरदार प्रचार सुरू असताना त्यांनी एकही प्रचारसभा घेतली नाही. ते कोण आहेत, काय करतात, कसे दिसतात हेसुद्धा लोकांना माहीत नव्हतं. त्यांना फक्त मूळ शिवसैनिकांनीच मतदान केलं तर भाजपची सगळी मतं नोटा या पर्यायाला गेली असण्याची शक्यता आहे," तुगांवकर सांगतात.

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन,

विश्वजित कदम

सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव मतदारसंघातही असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. इथं काँग्रेसकडून विश्वजीत कदम तर शिवसेनेकडून संजय विभुते रिंगणात होते.

इथं कदम यांनी नोटाला 1 लाख 50 हजार 866 मतांनी पराभूत केलं. कदम यांना 1 लाख 71 हजार 497 तर विभुते यांना 8 हजार 976 मतं मिळाली. पलूस-कडेगावमध्ये नोटाला मिळालेली मतं आहेत 20 हजार 631.

प्रमुख नेत्यांविरुद्ध नोटाचा वापर

राज्यातील प्रमुख नेत्यांविरुद्धही काही प्रमाणात नोटा पर्यायाचा वापर झाल्याचं आकडेवारीत समोर आलं आहे.

भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण-मध्य मतदारसंघात 3064, चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुडमध्ये 4028 तर शिवसेनेच्या आदित्य ठाकरेंच्या वरळीत तब्बल 6035, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या बारामतीत 1579, तर कांग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघात 1692 मतदारांनी नोटा या पर्यायाचा वापर केला आहे.

नोटाचा पर्याय का स्वीकारला जातो?

राजकीय विश्लेषक प्रकाश पवार सांगतात, "सर्वच उमेदवार लोकांच्या पसंतीचे असतात, असं नाही. कधी कधी पक्ष पसंत असला तरी उमेदवार पसंतीचा नसतो त्यामुळे इतरांना मत देण्यापेक्षा नोटा पर्याय निवडला जातो. याचा अर्थ उभा असलेला कोणताही उमेदवार त्यांना नको आहे. या माध्यमातून आपला असंतोष ते व्यक्त करत आहेत. पण भारतीय लोकशाहीमध्ये आपल्याला उपलब्ध असलेल्या उमेदवारांची निवड करायची असते हे मतदारांनी लक्षात घेतलं पाहिजे.

"त्यामुळे असंतोष व्यक्त करण्यासाठी नोटा पर्याय दाबणं इतकं प्रभावी ठरत नाही. निवडणुकीत उपलब्ध नसलेल्या उमेदवारांना आपण मत देऊ शकत नाही. त्यामुळे निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांपैकी योग्यता असलेल्या बाबी तपासून त्या उमेदवाराला मत दिलं पाहिजे," असं पवार सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)