मनोहरलाल खट्टर यांनी स्वीकारली हरियाणाच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रं

हरियाणा, निवडणुका, भाजप, जेजेपी Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मनोहरलाल खट्टर

अटीतटीच्या निवडणूक निकालानंतरच्या नाट्यमय घडामोडींनंतर भाजप नेते मनोहरलाल खट्टर यांनी दुसऱ्यांदा हरियाणाच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रं स्वीकारली. रविवारी झालेल्या कार्यक्रमात मनोहरलाल खट्टर यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. उपमुख्यमंत्री म्हणून जेजेपी पक्षाच्या दुष्यंत चौटाला यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

या दोन नेत्यांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही मंत्र्यांनी शपथ घेतलेली नाही.

राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांनी दोन्ही नेत्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

2014 मध्ये मनोहरलाल खट्टर हरियाणाचे मुख्यमंत्री झाले होते. त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला.

काही दिवसांपूर्वी झालेल्या हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. त्यानंतर भाजप आणि जेजेपी पक्षांनी एकत्र येत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

शपथविधी ग्रहणाचा कार्यक्रम चंदिगढमध्ये आयोजित करण्यात आला होता.

Image copyright CHAUTALA FAMILY
प्रतिमा मथळा दुष्यंत चौटाला

शपथविधी कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री जयंत चौटाला यांचे वडील अजय चौटाला उपस्थित होते. अजय चौटाला हे शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. मुलाच्या शपथविधीसाठी ते तुरुंगातून फरलोच्या माध्यमातून बाहेर पडत कार्यक्रमाला पोहोचले.

शनिवारी भाजप आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून मनोहरलाल खट्टर यांचं नाव सर्वसंमतीने ठरवण्यात आलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा दुष्यंत चौटाला आणि मनोहरलाल खट्टर

यानंतर मनोहरलाल खट्टर, दुष्यंत चौटाला आणि केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांची राजभवनात भेट घेतली आणि सत्ता स्थापनेचा दावा सादर केला.

शपथविधी कार्यक्रमाला भाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक केंद्रीय नेते उपस्थित होते. याव्यतिरिक्त शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल आणि प्रकाश सिंह बादल हेही उपस्थित होते.

मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री आणि भाजपचे कार्यकारी अध्यक्ष अमित शहा शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.

हरियाणात झालेल्या निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने तिढा निर्माण झाला होता. मात्र जेमतेम वर्षभरापूर्वी स्थापन झालेल्या जेजेपी पक्षाने या निवडणुकीत 10 जागा जिंकल्या होत्या. त्यांनी भाजपला साथ दिल्याने सत्तास्थापनेचा मार्ग सुकर झाला.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)