नरेंद्र मोदींच्या विमानाला हवाई हद्दीतून जाऊ देण्यास पाकिस्तानचा नकार : #5मोठ्याबातम्या

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

आजच्या विविध दैनिकांतील आणि वेबसाईटवरील प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी या आहेत आजच्या पाच मोठ्या बातम्या :

1) पाकिस्तानचा नरेंद्र मोदींसाठी हवाई हद्द देण्यास नकार

पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हवाईमार्ग नाकारला आहे. मोदींच्या सौदी अरेबिया दौऱ्यासाठी भारतानं पाकिस्तानकडे हवाई हद्द वापरण्याची परवानगी मागितली होती. मात्र, पाकिस्ताननं नकार दिला आहे. टाईम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिलीय.

भारताकडून जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचं उल्लंघन होत असल्याचं कारण देत पाकिस्ताननं ही परवानगी नाकारलीय. परराष्ट्र मंत्र्यांनी हे कारण दिल्याचं पाकिस्तानी रेडिओनं सांगितलं.

काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 भारतानं रद्द केल्यानंतर पाकिस्ताननं भारतीय विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे.

याआधी न्यूयॉर्कमध्ये आयोजित संयुक्त राष्ट्रांच्या महासभेसाठी जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विशेष विमानाला पाकिस्ताननं हवाई हद्दीचा वापर करण्यास मनाई केली होती.

2) काश्मीरमध्ये उद्योगांचं 10 हजार कोटींचं नुकसान

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 रद्द केल्यानंतर गेल्या तीन महिन्यात तेथील उद्योगांना मोठा फटका बसलाय. आतापर्यंत जवळपास 10 हजार कोटींचं नुकसान झालंय. काश्मीर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या संस्थेनं ही आकडेवारी दिलीय. इंडिया टुडेनं ही बातमी दिलीय.

5 ऑगस्ट 2019 रोजी भारत सरकारने कलम 370 रद्द केलं. त्या घटनेला 80 हून अधिक दिवस होत आहेत. या काळात काश्मीरमधील बाजारपेठा, वाहतूक बंद होती.

फोटो स्रोत, Getty Images

अलीकडच्या काही दिवसांत व्यवसायिक जगात थोड्या हालचाली सुरू झाल्या होत्या. पण उद्योग-व्यवसायांची स्थिती अजूनही वाईटच आहे, असं काश्मीर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष शेख आशिक यांनी सांगितलं.

व्यवसायांना फटका बसण्यासाठी इंटरनेट सेवा बंद असणं हे मोठं कारण असल्याचंही शेख आशिक यांनी म्हटलं.

3) सोनं विकलं नाही - आरबीआयचं स्पष्टीकरण

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (आरबीआय) आपल्याकडील सुवर्णसाठा विक्रीस काढल्याचे वृत्त माध्यमांमधून पसरलं होतं. हे वृत्त आरबीआयनं फेटाळलं असून, सोन्याची विक्री किंवा कोणताही व्यापार केलेला नाही, असं स्पष्टीकरण आरबीआयनं दिलंय. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिलीय.

तीन दशकांनंतर पहिल्यांदाच आरबीआयनं सोन्याची विक्री केली असून, जालान समितीच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर यंदा ऑगस्टपासून सोन्याच्या व्यापारात सक्रिय झाल्याचं वृत्त माध्यमांमध्ये पसरलं होतं.

फोटो स्रोत, Twitter

त्यानंतर आरबीआयनं ट्वीट करून सांगितलं की, "आरबीआय सोन्याची विक्री किंवा व्यापार करत असल्याचं वृत्त काही माध्यमांनी प्रसारित केलंय. पण आरबीआयकडून सोन्याची विक्री किंवा व्यापार केला जात नाही."

4) मंडिलक प्रवृत्तीचा शिवसेनेनं विचार करावा - चंद्रकांत पाटील

कोल्हापुरात भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही, याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय मंडलिक यांच्यावर निशाणा साधला. "सोयीचं राजकारण करणारी मंडलिक ही एक प्रवृत्ती आहे. त्याचा शिवसेनेने आता विचार करायला हवा," असं चंद्रकांत पाटील म्हणाले. सकाळनं ही बातमी दिलीय.

फोटो स्रोत, CHANDRAKANT PATIL/FACEBOOK

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी कोल्हापुरातील भाजपच्या पराभवाचं विश्लेषण केलं.

"शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी सोयीस्कर भूमिका घेतली आहे. कागल नगरपालिकेत त्यांनी मुश्रिफांसोबत सत्ता स्थापन केलीय. अशा पाडापाडीचं राजकारण करणाऱ्यांच्या जीवावर शिवसेना चालवणार का?" असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.

5) डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण - आरोपींना मुंबईबाहेर जाण्यास परवानगी

मुंबईतील डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी आरोपी असलेल्या तीन महिला डॉक्टरांना दिवाळीसाठी मुंबईबाहेर जाण्याची परवानगी उच्च न्यायालयाने दिलीय. मात्र, प्रवासाबाबत सर्व माहिती गुन्हे अन्वेषण विभागाला द्यावी लागणार आहे. मुंबई हायकोर्टानं हे आदेश दिलेत. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

फोटो स्रोत, FACEBOOK/PAYAL TADVI

डॉ. पायल तडवी यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप तिन्ही महिला डॉक्टरांवर आहे. या तिन्ही महिला डॉक्टर पायल यांच्या वरिष्ठ सहकारी होत्या.

डॉ. पायल तडवी यांच्यावर जातिवाचक टिप्पणी आणि मानसिक छळ केल्याचा आरोप तिन्ही महिला डॉक्टरांवर आहे.

या आत्महत्येप्रकरणी आरोपी महिला डॉक्टर जामिनावर बाहेर आहेत. मात्र, खटला सुरू असेपर्यंत शहर सोडून बाहेर जाता येणार नाही, असं कोर्टानं बजावलं होतं. त्यानंतर गावी जाण्यासाठी या महिला डॉक्टरांनी अर्ज केला होता. त्यानंतर कोर्टानं मुंबईबाहेर जाण्याची परवानगी दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)