विधानसभा निवडणूक : ओवेसींच्या एमआयएमने उत्तर महाराष्ट्रात दोन जागा कशा मिळवल्या?

असदुद्दीन ओवेसी

फोटो स्रोत, Twitter/@aimim_national

असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाचे महाराष्ट्रात पुन्हा एकदा दोन आमदार निवडून आले. आधीचे मतदारसंघ राखण्यात एमआयएमला अपयश आलं असलं, तरी मालेगाव मध्य आणि धुळे शहराची जागा जिंकत एमआयएमनं उत्तर महाराष्ट्रात प्रवेश केला आहे.

2014 मध्ये औरंगाबाद मध्य आणि मुंबईतील भायखळा या दोन मतदारसंघातून एमआयएमचे आमदार निवडून आले होते. मात्र, यंदाच्या म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमनं या दोन्ही जागा गमावल्या आहेत.

मात्र, एमआयएमची आमदारसंख्या दोनच राहिली आहे. कारण धुळे शहर आणि मालेगाव मध्य या दोन जागा जिंकण्यात एमआयएमला यश मिळालं आहे.

धुळे शहर मतदारसंघातून फारूक शाह तर मालेगाव मध्य मतदारसंघातून मुफ्ती मोहम्मद इस्माईल जिंकले आहेत.

यंदा उत्तर महाराष्ट्रात कोण किती जागा जिंकलं?

औरंगाबाद मध्य आणि मुंबईतील भायखळा या दोन मतदारसंघातून 2014 साली एमआयएमचे आमदार जिंकले होते. ही दोन्ही ठिकाणं मुस्लीमबहुल लोकसंख्या असलेली आहेत.

मात्र, यंदा जिंकलेल्या मालेगाव मध्य वगळल्यास धुळे शहरात निर्णायक मुस्लिम मतं नाहीत. त्यामुळे धुळे शहरात एमआयएमनं कशी बाजी मारली आणि कोणती समीकरणं कामी आली, याचा आढावा बीबीसी मराठीनं घेतला आहे.

धुळे शहरात एमआयएमचा विजय कसा झाला?

धुळे महापालिका निवडणुकीपासूनच भाजपचे विद्यमान आमदार अनिल गोटे पक्षावर नाराज होते. त्यामुळं ते धुळे शहरातून अपक्ष लढले. काँग्रेस-राष्ट्रवादीनं इथं उमेदवार न देता अनिल गोटेंना पाठिंबा दिला होता.

आघाडीनं गोटेंना पाठिंबा दिल्यानं राष्ट्रवादीचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे नाराज झाले आणि अपक्ष म्हणून रिंगणात उतरले. त्यात शिवसेनेनंही हिलाल लाला माळींच्या रूपानं उमेदवार दिला होता.

धुळे शहर मतदारसंघात मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळं एमआयएमनंही या मतदारसंघात लक्ष देत फारूक शाह यांना रिंगणात उतरवलं होतं.

फोटो स्रोत, Facebook

फोटो कॅप्शन,

फारूक शाह

धुळे शहर मतदारसंघाचा गेल्या दोन दशकांचा इतिहास पाहता हा मतदारसंघ 1999 सालापासून आलटून-पालटून अनिल गोटे आणि राजवर्धन कमदबांडे यांच्याकडेच राहिला आहे. 1995 आणि 2004 अशा दोनवेळा राजवर्धन कदमबांडे तर 1999, 2009 आणि 2014 अशा तीनवेळा अनिल गोटे इथून विजयी झाले आहेत.

गेली दोन दशकं आलटून-पालटून धुळे शहराचं विधानसभेत प्रतिनिधित्व करणाऱ्या अनिल गोटे आणि राजवर्धन कदमबांडे यांना बाजूला सारत इथल्या जनतेनं एमआयएमचे फारूक शाह यांना निवडलंय.

उत्तर महाराष्ट्रातील वरिष्ठ पत्रकार मिलिंद सजगुरे सांगतात, "धुळे शहर मतदारसंघात सुमारे 90 हजार मतदार मुस्लीम, तर एक लाख 80 हजार मतदार इतर आहेत. एक लाख 80 हजार मतदार गोटे, कदमबांडे आणि माळींमध्ये विभागली गेली आणि 90 हजार मतं एकगठ्ठा फारूक शाहांना मिळाली, असं एकूण चित्र आहे."

फोटो स्रोत, Facebook

फोटो कॅप्शन,

फारूक शाह

"ओवेसींनीही धुळे शहरात विशेष लक्ष दिलं होतं. हैदराबादहून 10-12 नेते धुळ्यात तळ ठोकून होते. भाजप आपल्यासोबत नाही आणि काँग्रेसही नाही, हे इथल्या मुस्लीम मतदारांना पटवून देण्यात एमआयएम यशस्वी झाली," असंही मिलिंद सजगुरे सांगतात.

दरम्यान, धुळे महापालिकेत एमआयएमचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळं एमआयएमच्या विजयाला पार्श्वभूमी होतीच.

"मुस्लीम समाजाचा एकोपा इथं आधीपासूनच होता, त्यामुळेच इथं एमआयएमनं उमेदवार दिला आणि निवडूनही आला," असंही सजगुरे सांगतात.

उत्तर महाराष्ट्रातली दुसरी जागा एमआयएमनं मालेगाव मध्यमध्ये पटकावलीये. मालेगाव मध्य मतदारसंघ गेली अनेक वर्षे काँग्रेसकडे होता आणि त्याआधीही जनता पार्टीकडे होता.

मालेगाव मध्य मतदारसंघात एमआयएमची एन्ट्री

मालेगाव मध्य मतदारसंघाची महाराष्ट्राला असलेली ओळख समाजवादी नेते निहाल अहमद यांचा मतदारसंघ अशी आहे.

1960 पासून 1999 पर्यंत निहाल अहमद मालेगावातून विधानसभेत जात होते. मालेगाव महापालिकेचे पहिले महापौर म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.

1999 आणि 2004 साली मालेगाव मध्य मतदारसंघातून काँग्रेस विजयी झाले. 2009 साली मुफ्ती मोहम्मद इस्माईल हे विजयी झाले. तेच आता एमआयएमच्या तिकिटावर 2019 च्या विधानसभेत निवडून गेले आहेत.

कलम 370 च्या मुद्द्यावर राष्ट्रवादीनं भूमिका न घेतल्याचं कारण देत मुफ्त मोहम्मद इस्माईल यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत एमआयएममध्ये प्रवेश केला आणि जिंकूनही आले.

फोटो स्रोत, Facebook

फोटो कॅप्शन,

मुफ्ती मोहम्मद इस्माईल

धर्मगुरू म्हणून ते मालेगावात परिचित आहेत. त्यामुळं या निवडणुकीत त्यांना याचा निश्चितच फायदा झाल्याचं दिसून येतंय.

वरिष्ठ पत्रकार जहुर खान सांगतात, "निहाल अहमद यांच्या जनता दल सेक्युलर पक्षानं यंदा एमआयएमला समर्थन दिलं होतं. शिवाय मालेगावात एमआयएमचे सात नगरसेवक आणि मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांचे 20 हून अधिक समर्थक नगरसेवक आहेत. त्यामुळं एमआयएमला फायदा झाला."

2014 साली विजयी झालेले काँग्रेसचे आमदार असिफ शेख यांचे वडील मालेगावचे विद्यमान महापौर आहेत. हेच असिफ शेख यंदा एमआयएमच्या मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्याविरोधात रिंगणात होते.

महापालिकेच्या कामाविरोधातला संतापही लोकांनी विधानसभेच्या मतदानातून व्यक्त केल्याचं वरिष्ठ पत्रकार जहुर खान सांगतात.

उत्तर महाराष्ट्रात वाढीसाठी एमआयएमला किती संधी आहे?

उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुस्लीमबहुल भाग आहेत. त्यामुळं एमआयएमला उत्तर महाराष्ट्रात पक्ष विस्तारासाठी संधी आहे का, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.

"धुळे आणि मालेगावात एमआयएमचे आमदार विजयी झाले. मात्र, उत्तर महाराष्ट्रात मुस्लीम मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र एकगठ्ठा नसून, ते विखुरलेले आहेत," असं मिलिंद सजगुरे सांगतात.

फोटो स्रोत, Twitter/@aimim_national

तसेच, सजगुरे म्हणतात, "नाशिक मध्य मतदारसंघात जवळपास 60 हजार मुस्लीम मतदार आहेत. तिथे नगरसेवक येतात. त्यामुळे आगामी काळात इथेही मालेगाव मध्य किंवा धुळे शहराचं प्रतिबिंब उमटल्यास आश्चर्य वाटू नये."

तर वरिष्ठ पत्रकार जहुर खान सांगतात, "असदुद्दीन ओवेसी यांची मुस्लीम तरूणांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. उत्तर महाराष्ट्रात एमआयएमला चांगली संधी आहे. कारण मुस्लीम फॅक्टर चालतोय."

मात्र, "मुस्लीम फॅक्टरवर पहिल्यांदा सत्ता मिळेल, पण काम न केल्यास मुस्लीम समाज खाली खेचायलाही कमी करणार नाही. औरंगाबादमध्ये तुम्ही पाहिले असाल," असंही जहुर खान म्हणतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)