भाऊबीज : पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंसह 5 भावाबहिणींच्या जोड्या ज्यांनी बदललं महाराष्ट्राचं राजकारण

  • हर्षल आकुडे
  • बीबीसी मराठी
राहुल गांधी प्रियंका गांधी

फोटो स्रोत, Getty Images

आज भाऊबीज. दिवाळीच्या सलग तीन ते चार दिवस येणाऱ्या शुभ मुहूर्तांमध्ये भाऊ आणि बहिणींसाठी या दिवसाचं महत्त्व आहे.

राखी पौर्णिमेच्या दिवशी बहीण भावाच्या घरी जाऊन राखी बांधते तर भाऊबीजेच्या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी जातो. तिथं बहीण भावाला ओवाळते, भाऊ बहिणीला ओवाळणी देतो. विविध प्रकारचे गिफ्ट देतो. वर्षभरातील कटू-गोड आठवणी विसरून बहीण आणि भावांचं नातं वृद्धींगत करण्यासाठी हा सण साजरा केला जातो.

या निमित्ताने विशेषतः शेवटच्या काही दिवसांत इथं झालेलं भावनिक राजकारण उभ्या महाराष्ट्राने पाहिलं. या पार्श्वभूमीवर भाऊबीजेच्य दिवशी राजकारणातील भाऊ-बहीण आणि त्यांचं राजकारण कसं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीने केला.

राजकारणात सक्रिय असलेल्या प्रमुख भावाबहिणींवर एक नजर टाकूया.

1. राहुल गांधी-प्रियांका गांधी

देशाचं राजकारण गेली अनेक वर्षं गांधी कुटुंबाभोवती केंद्रीत राहिलेलं आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे दोघंही राजकारणात सक्रिय आहेत.

2004 मध्ये राहुल यांनी पहिल्यांदा अमेठीमधून निवडणूक लढवली आणि लोकसभेत गेले. तर प्रियांका गांधी या वर्षाच्या सुरूवातीलाच काँग्रेसच्या सरचिटणीस बनल्या.

नुकत्याच झालेल्या बिहारच्या निवडणुकांमध्ये राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी फारसं लक्ष न घातल्यामुळे आमचा पराभव झाल्याचा आरोप आरजेडीचे नेते शिवानंद तिवारी यांनी केल आहे.

निवडणुकांच्या काळात राहुल गांधी हे शिमल्यामध्ये प्रियंका गांधींच्या पिकनिक करत होते असा आरोप तिवारी यांनी केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

या दोघांमधलं नातं नेमकं कसं आहे हे मीडियात किंवा सोशल मीडियावर वारंवार समोर आलं आहे.

राहुल यांनी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान एका फेसबुक लईव्हमध्ये दोघांमधल्या प्रेमळ नात्याची माहिती दिली होती.

नवी दिल्लीतील ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सुनील चावके सांगतात, "प्रियांका गांधींना राजकारणात आणण्यासाठी काँग्रेसमधल्या एका गटाने नेहमीच आग्रह धरला आहे. प्रियांका राजकारणात येण्यापूर्वी त्यांचं आणि राहुल यांचं नातं एका सर्वसामान्य भाऊ-बहिणीप्रमाणे होतं. पण कुणीही राजकारणात आल्यानंतर राजकीय महत्त्वाकांक्षा वाढतात, मग ते भाऊ-भाऊ असो की भाऊ-बहीण.

"काही वेळा नातं कितीही घट्ट असलं तरीसुद्धा त्यांच्यामध्ये राजकीय कुरघोडी सुरू होतात. अनेकदा नात्यात कटुता आलेली असली तरी राजकारण आणि वैयक्तिक जीवन यांच्यातील फरक समजून त्यांना सार्वजनिक जीवनात वावरावं लागतं. अशा प्रकारचं राजकारण देशात-विदेशात सगळ्याच ठिकाणी पाहायला मिळतं," असं चावके सांगतात.

2. अजित पवार-सुप्रिया सुळे

शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे चुलत बहिण-भाऊ आहेत. अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीनंतर दोघांमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याच्या चर्चा होत्या. पण, त्यानंतर गेल्या वर्षभरात सुप्रिया सुळे यांनी वेगवेगळ्या वेळेला अजित पवार यांच्याबरोबरचे फोटो ट्विटरवर टाकत सर्व काही पूर्वीसारखंच असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

अजित पवार यांनी याआधी आमचे संबंध अतिशय सलोख्याचे आहेत असं म्हटलं आहे. इतकचं नाही तर सुप्रिया सुळे या राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या तर मला आनंदच होईल असंही अजित पवार यांनी बीबीसीच्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं.

3. धनंजय मुंडे-पंकजा मुंडे

बीडमधील मुंडे भाऊ-बहिणीमधल्या निवडणुकीने महाराष्ट्रात मोठी चर्चा घडवून आणली. बीडच्या स्थानिक निवडणुका या दोघांच्याच अवतीभोवती होताना दिसतात.

गोपीनाथ मुंडे हयात असतानाच त्यांचे पुतणे धनंजय मुंडे राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले होते. तेव्हा बीडमधला गोपीनाथ मुंडेंचा वारसदार म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे अनेक जण पाहत होते. मुंडे महाराष्ट्र पातळीवर राजकारण करत होते तर धनंजय मुंडे परळी आणि बीड जिल्ह्याचं राजकारण पाहत होते.

2009 साली गोपीनाथ मुंडे बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली. धनंजय मुंडेंची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली. पण इथूनच सुप्त संघर्षाला सुरुवात झाली होती.

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन,

लोकमतच्या एका कार्यक्रमात दोघं एका व्यासपीठावर होते.

जानेवारी 2012 मध्ये धनंजय मुंडेंनी बंड करत परळीच्या नगराध्यक्षपदी आपला उमेदवार निवडून आणला. तसंच परळी कृषी उत्पन्न बाजार समितीही आपल्या गटाच्या ताब्यात घेऊन गोपीनाथ मुंडेंना धक्का दिला.

नंतर धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 2013 मध्ये त्यांनी विधान परिषदेची निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये धनंजय मुंडे विजयी झाले. मुंडेंच्या निधनानंतर धनंजय विरुद्ध पंकजा असा संघर्ष सुरू झाला. तो आजतागायत सुरू आहे.

2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळीमधून पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत झाली. त्यामध्ये पंकजा यांनी बाजी मारली. यंदाही म्हणजे 2019 च्या निवडणुकीतही पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असाच परळीतून सामना रंगला. ज्यात धनंजय मुंडे जिंकले.

ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे सांगतात, "गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत राजकारणाचे धडे घेत धनंजय मुंडे मोठे झाले होते. त्यांच्यातील आक्रमकता आणि संघर्ष करण्याची क्षमता त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याकडून शिकून घेतली. गोपीनाथ मुंडेंचे वारसदार म्हणून त्यांचं नाव समोर येणं स्वाभाविक होतं.

पण त्यांनी 2009 ला पंकजांना तिकीट दिलं. इकडे धनंजय मुंडे आणि त्यांचे वडील पंडितअण्णा मुंडे यांच्या महत्त्वाकांक्षा वाढलेल्या होत्या. सत्ता आणि पैसा यांच्यासारख्या कारणांमुळे दोन्ही कुटुंबामध्ये वितुष्ट आलं. यंदाच्या निवडणुकीतही हेच चित्र पाहायला मिळालं."

4. बाळासाहेब थोरात-दुर्गा तांबे

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि त्यांची बहीण दुर्गा तांबे ही सुद्धा महाराष्ट्रातील राजकारणातील महत्त्वाची भावा-बहिणींची जोडी.

सध्या बाळासाहेब थोरात संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. तर त्यांच्या बहीण दुर्गा तांबे या संगमनेर शहराच्या नगराध्यक्ष आहेत.

त्यांचे पती सुधीर तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेचे आमदार आहेत. दुर्गा आणि सुधीर यांचे पुत्र सत्यजित तांबे हे युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहतात.

फोटो स्रोत, facebook@durgaTambe

संगमनेरच्या राजकारणावर थोरात-तांबे यांचीच संपूर्ण पकड असल्याचं स्थानिक पत्रकार अशोक तुपे सांगतात. ते सांगतात, शहरातील राजकारण दुर्गा तांबे आणि सुधीर तांबे पाहतात. तर महाराष्ट्राच्या राजकारणाची जबाबदारी बाळासाहेब यांनी घेतली आहे.

5. अवधूत तटकरे-आदिती तटकरे

रायगडच्या राजकारणामध्ये तटकरे कुटुंबात राजकारणातले भाऊ-बहीण पाहायला मिळतात. तटकरे कुटुंबीयांमध्ये अनील तटकरे आणि सुनील तटकरे असे दोन बंधू. अनिल हे मोठे तर सुनील हे लहान भाऊ आहेत.

सुनील तटकरे यांच्यानंतर त्यांचे मोठे भाऊ अनिल तटकरे राजकारणात आले. अनिल तटकरे यांचे सुपुत्र अवधूत तटकरेही राजकारणात आले आणि राष्ट्रवादीकडून ते श्रीवर्धन मतदारसंघाचे आमदारही झाले. नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन,

आदिती तटकरे आणि अवधूत तटकरे

सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे हे विधान परिषदेत आणि मुलगी आदिती तटकरे या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या. त्या यंदाच्या निवडणुकीत विधानसभेत निवडून आल्या आहेत. त्यांच्याविरुद्ध अवधून तटकरे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार होती. पण स्थानिक कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे इथं शिवसेनेने दुसरा उमेदवार दिला होता.

ज्या श्रीवर्धनमधून अवधूत तटकरे आधी आमदार होते त्याच श्रीवर्धनमधून आता अदिती तटकरे आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.

अनिल तटकरे यांचे दुसरे पुत्र संदीप तटकरे यांनी 2016 साली रोहा नगरपालिकेची निवडणूक शिवसेनेच्या तिकिटावर लढवली होती आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पर्यायानं सुनील तटकरेंनाच आव्हान दिलं होतं.

त्यावेळी राष्ट्रवादीचे आमदार असूनही अवधूत तटकरे यांनी लहान भावाचा म्हणजे शिवसेना उमेदावर संदीप तटकरेंच्या प्रचाराचा नारळ फोडला होता.

तटकरे कुटुंबातील वादाची इथूनच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. सध्या अनिल तटकरेंचं कुटुंब शिवसेनेत तर सुनील तटकरेंचं कुटुंब राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे.

6. जयंत पाटील - मिनाक्षी पाटील

याच प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणात शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि त्यांच्या बहीण मिनाक्षी पाटील हे सुद्धा आहेत. जयंत पाटील शेतकरी कामगार पक्षाचे आमदार होते. यावर्षीच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. शेतकरी नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या बहीण मिनाक्षी यांनी अनेक वर्षं अलीबाग मतदारसंघात आमदार म्हणून काम पाहिलेलं आहे.

या व्यतिरिक्त बिहारमध्ये मिसा भारती, तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव ही लालू प्रसाद यादव यांची तिन्ही मुलं राजकारणात आहेत.

तामिळनाडूत करुणानिधी यांच्या द्रमुक पक्षाचे एम.के. स्टॅलिन आणि कनिमोळी हे भाऊ-बहीण राजकारणात सक्रिय आहेत. कनिमोळी यांनी युपीए सरकारच्या काळात केंद्रात मंत्री म्हणून काम पाहिलं होतं. तर एम. के. स्टॅलिन तामिळनाडूच्या विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत. करुणानिधी यांच्या मृत्यूनंतर द्रमुक पक्षाची धुरा स्टॅलिन यांच्या हाती आली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)