चंद्रकांत पाटलांकडून कोथरूडमधल्या महिलांना साडी नको, मनसे करणार तक्रार

  • हलिमा कुरेशी
  • बीबीसी मराठीसाठी
उर्मिला कानगुडे
फोटो कॅप्शन,

उर्मिला कानगुडे

कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील यांनी निवडून आल्यानंतर, वस्तीतल्या घरकाम करणाऱ्या मोलकरिण महिलांना भाऊबीज म्हणून एक लाख साडी वाटप करायचं ठरवलं आहे.

यावरून पुण्यात अनेक चर्चा होतायत. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या घरकाम करणाऱ्या महिलांनी मात्र आम्हाला साडी नको वस्तीतल्या समस्या सोडवा हीच भाऊबीजेची भेट ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.

तर मनसेनं मात्र त्यांच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचं म्हटलंय.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्वांत जास्त चर्चेत असलेल्या चंद्रकांत पाटील यांना पुण्याच्या कोथरूडमध्ये बाहेरचा उमेदवार म्हणून विरोध झाला होता. हेच लक्षात घेऊन चंद्रकांत पाटलांनी निवडून आल्यानंतर जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली.

आम्ही याविषयी आमदार चंद्रकांत पाटलांशी बोललो. यावेळेस नरेंद्र मोदींनी गरिबांसोबत दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केल्याने वस्तीत राहणाऱ्या घरकाम करणाऱ्या महिलांना भाऊबीज म्हणून साडी वाटप करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

"घरकाम करणाऱ्या महिलांपर्यंत साडी पोहोचवण्याचं काम नगरसेवकांना दिलं जाणार आहे. यापूर्वी देखील शालेय विद्यार्थ्यांना, तसंच मराठवाड्यात शेतकऱ्यांना रेनकोट वाटप केलं आहे. आम्ही आवाहन करतोय ज्या कोणाची इच्छा असेल त्यांनी साड्या आम्हाला प्रायोजक म्हणून द्याव्यात. नगरसेवकांचा वस्तीमध्ये संवाद असतो म्हणून त्यांच्यामार्फत आम्ही साड्या पोहोचवणार," असं पाटील यांनी सांगितलं.

एक लाख टारगेट आहे की त्यापेक्षा जास्त यावर त्यांनी "प्रायोजक म्हणून पुढे येणाऱ्यांकडून या साड्या घेणार असून किमान दोन ते तीन हजार साड्या संकलित होतील," अशी आशा व्यक्त केली.

साडी वाटपाचं नियोजन पाहणाऱ्या राजेश पांडे यांनी एक लाख असं टारगेट नाही. जशी मदत मिळेल तस वाटप करणार असल्याचं सांगितलं. कोथरुड मतदारसंघातील एरंडवणे भागातील वस्त्यांमधील घरकाम करणाऱ्या महिलांशी याबाबत आम्ही बोललो.

फोटो कॅप्शन,

प्रतिमा पासलकर

'साडी नको, समस्या सोडवा'

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

प्रतिमा पासलकर यांनी चंद्रकांत पाटलांनी मोलकरीण या घटकाची दखल घेतली याचा आनंद व्यक्त करतानाच वस्तीतील प्रश्न मार्गी लावून खरी भेट द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

उर्मिला कानगुडे या गेली तीस वर्षं घरकाम करतात. "वस्तीत शौचालय नाही, गटार तुंबल्याने घरात पाणी शिरतं तसंच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नीट नाही, साडी देण्यापेक्षा ही काम करून द्या," अशी मागणी केली.

चंद्रकांत पाटलांच्या साडीवाटपा संदर्भात मात्र नगरसेवकांचा तितकासा उत्साह नसल्याचं चित्र आहे. मात्र वस्तीत सरसकट साडी वाटप करा अस चंद्रकांत पाटलांनी सांगितलं आहे.

नगरसेवक दिपक पोटे यांनी अजून आपल्यापर्यंत साडी वाटपासंदर्भात काहीच निरोप आला नसून, आपल्याला निरोप दिला तर सांगितल्याप्रमाणे वाटप करू अस म्हंटलय.

पुण्यात सध्या एकदाच पाणीपुरवठा केला जातोय. धरणं शंभर टक्के भरलेली असल्याने दोन वेळा पाणीपुरवठा केला जावा अशी मागणी पुणेकर करत आहेत.

सजग नागरिक मंचाच्या विवेल वेलणकरांनी चंद्रकांत पाटील यांच्या साडीवाटपा संदर्भात नाराजी व्यक्त केली. लोकप्रतिनिधी म्हणून पालकमंत्री म्हणून पुणेकरांना दोन वेळा पिण्याचं पाणी, कचरा समस्येवर तोडगा तसचं रस्त्यांचे प्रश्न या संदर्भात काम करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय.

फोटो स्रोत, Getty Images

दिवाळीत अनेक लोकप्रतिनिधी फराळ, भेटवस्तू यांचं वाटप करत असतात.

"निवडणुकीपूर्वी भेटवस्तू देणं गैर ठरतं निवडणुकीनंतर वस्तीतील गरीब महिलांना भाऊबीज म्हणून साडी भेट देणं हृदयस्पर्शी आहे," असं म्हणत भाजप शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी याचं समर्थन केलं आहे.

लोकप्रतिनिधींकडून भेटवस्तू घेणं हे वेगवेगळ्या प्रकारे पाहायला मिळतं. केवळ आर्थिक दुर्बल घटकांकडून नाही तर मध्यमवर्गीय, उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये देखील भेटवस्तू स्वीकारल्या जातात.

'लोकही दोषी'

लोकमत या वृत्तपत्राचे पुणे आवृत्तीचे सहसंपादक सुकृत करंदीकर यांनी चंद्रकांत पाटील यांचं निवडणुकीनंतर साडी वाटप करणं चुकीचं ठरत नाही असं म्हटंलंय.

पण त्याचवेळी "मतदार अशा भेटवस्तू स्वीकारण्यापेक्षा आपल्या वस्तीतील, मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात आग्रही आहेत का, हेही महत्वाचं ठरतं. अशा भेटवस्तू स्वीकारणारे मतदार देखील लोकप्रतिनधींइतकेच दोषी ठरतात," असं करंदीकर सांगता.

मनसे तक्रार करणार

चंद्रकांत पाटलांना निवडणुकीत टक्कर दिलेले मनसेचे उमेदवार किशोर शिंदे मात्र चंद्रकांत पाटलांच्या साडी वाटपाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार देणार आहेत. चंद्रकांत पाटलांनी विकासकाम करावी. साडीवाटप हे कोथरुडकरांना रुचणार नाही, असं त्यांनी म्हटलंय.

पुण्यात आंबील ओढ्यालगतच्या पूरग्रस्तांना मदतीची जास्त गरज असताना साडी वाटप करून मतदारांना आमिष दाखवलं जातंय. त्यामुळे याविरोधात रीतसर तक्रार करणार असल्याचं किशोर शिंदे बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)