उद्धव ठाकरे व्यावहारिक, ते आघाडीसोबत जाणार नाहीत - चंद्रकांत पाटील #5मोठ्याबातम्या

चंद्रकांत पाटील

फोटो स्रोत, CHANDRAKANT PATIL/FACEBOOK

आजच्या विविध दैनिकांतील आणि वेबसाईटवरील प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी या आहेत आजच्या पाच मोठ्या बातम्या :

उद्धव ठाकरे व्यावहारिक, ते आघाडीसोबत जाणार नाहीत - चंद्रकांत पाटील

शिवसेना सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीची मदत घेईल का, या प्रश्नावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपलं मत मांडलं. ते म्हणाले, "उद्धव ठाकरेंकडे पर्याय काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापनेचा आहे ना, पण ते कधीच याचा विचार करणार नाहीत." झी चोवीस तासनं ही बातमी दिलीय.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, "उद्धव ठाकरे खूप व्यावहारिक आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काय आहे, हे उद्धव ठाकरेंना माहीत आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे तत्वत:ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचं मान्य करणार नाहीत आणि व्यावहारिक रिस्कही ते घेणार नाहीत."

"बाळासाहेब ठाकरे असतानाही शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष झाले, पण कधीही काँग्रेसला मदत व्हावी, असं पाऊल त्यांनी उचललं नाही. बाळासाहेबांचा परखडपणा उद्धव ठाकरेंमध्ये आहे, तेच प्रेम उद्धव ठाकरेंमध्ये आहे. त्यामुळं बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसशी संघर्ष केला, तो उद्धव ठाकरे सोडणार नाहीत. काँग्रेसमुक्त महाराष्ट्र आणि काँग्रेसमुक्त देश हा भाजपचा विचार शिवसेनेचाही आहे," असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

2) शिवसेना बार्गेनिंग पॉवरमध्ये, जास्तीत जास्त मागण्या पूर्ण होतील - आठवले

शिवसेना सध्या बार्गेनिंग पॉवरमध्ये असल्यानं त्यांच्या जास्तीत जास्त मागण्या पूर्ण होतील, असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेच्या सगळ्याच मागण्या मान्य करणार नाहीत, पण काही मागण्या पूर्ण होऊ शकतील, असं आठवले म्हणालेत.

फोटो स्रोत, TWITTER

शिवसेनेच्या योग्य त्या मागण्या भाजपनं मान्य करून महायुतीची सत्ता लवकरात लवकर स्थापन करावी आणि सत्तेत रिपाइंला वाटा मिळावा, अशी मागणीही यावेळी आठवलेंनी केली.

दरम्यान, अरविंद सावंतांना केंद्रात आणखी चांगलं खातं बदलून मिळण्याची शक्यताही आठवलेंनी वर्तवलीय.

3) आदित्यजी, संधी पुन्हा दार ठोठावेल याची खात्री नाही - सत्यजित तांबे

मुख्यमंत्रिपदासाठी सेनेच्या आग्रहाची राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा असतानाच, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना उद्देशून फेसबुक पोस्ट लिहिलीय. ही फेसबुक पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल झालीय.

फोटो स्रोत, Facebook

मुख्यमंत्रिपदाच्या संधीबाबत सत्यजित तांबे यांनी आदित्य यांना उद्देशून म्हटलंय, "राजकारणात आलेली वेळ परत येत नाही. संधीही पुन्हा दरवाजा ठोठावेलंच याची खात्री नाही. म्हणून एक मित्र म्हणून एवढाच सल्ला आहे, जे मिळवायचे आहे ते आत्ताच मिळवा, कुणावरही विसंबून राहू नका. लहान म्हणून थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबू नका, एवढीच विनंती."

हे सांगत असताना सत्यजित तांबे यांनी 2007 साली झालेल्या अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अनुभवही कथन केला. त्यावेळी आपलं अध्यक्षपद कसं हुकलं, हे सांगताना सत्यजित तांबे यांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाबाबत सल्ला दिलाय. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिलीय.

4) इकबाल मिर्ची कनेक्शन - शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना ईडीचे समन्स

अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना समन्स बजावलं आहे. इकबाल मिर्चीच्या मालमत्तांचा व्यवहार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या रणजीतसिंग बिंद्रा यांच्याशी राज कुंद्रा यांचं कनेक्शन असल्याच्या संशयावरून ईडीनं हे पाऊल उचललंय. इकॉनॉमिक टाईम्सनं ही बातमी दिलीय.

फोटो स्रोत, Getty Images

राज कुंद्रा यांना 4 नोव्हेंबर रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर हजर राहावं लागणार आहे. ईडीच्या मुंबई कार्यालयातच राज कुंद्रांची चौकशी केली जाईल.

इकबाल मिर्चीच्या 225 कोटींच्या बेहिशेबी संपत्तीचा सौदा केल्याप्रकरणी रणजीतसिंग बिंद्राला अटक करण्यात आलीय.

5) मुंबईकरांची 15 वर्षांत पहिल्यांदाच दिवाळी कमी ध्वनीप्रदूषणाची

गेल्या पंधरा वर्षांत यंदा पहिल्यांदाच मुंबईकरांची दिवाळी कमी ध्वनीप्रदूषणाची राहिलीय आहे. आवाज फाऊंडेशनच्या सर्वेक्षणातून ही सकारात्मक बाब समोर आलीय. टाईम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिलीय.

फोटो स्रोत, Getty Images

गेल्या काही वर्षांपासून दिवाळीतील ध्वनी प्रदूषणाविरोधात मुंबईत मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरू आहे. त्याला यंदा चांगलं यश मिळालं आहे, असं आवाजच्या सुमैरा अब्दुलाली यांनी सांगितलं.

यंदा दिवळीत ध्वनी प्रदूषणाची 112.3 डेसिंबल इतकी नोंद झाली असून, रात्री 10 वाजेपर्यंतच फटाके फोडण्याची परवानगी असल्यानं त्यावर परिणाम झाल्याचं आढळलंय. 2017 च्या दिवाळीत फटाक्यांच्या आवाजाची 117.8 डेसिबल इतकी नोंद करण्यात आली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)