सुधीर मुनगंटीवार : इतर पर्यायांची भाषा करणं सेनेची घोडचूक ठरू शकते

संजय राऊत- सुधीर मुनगंटीवार Image copyright Getty Images

आम्हाला इतर पर्याय खुले आहेत असं म्हणणं ही सेनेची घोडचूक ठरू शकते, असं वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.

शिवसेना आणि भाजपमध्ये सत्ता स्थापनेचं गाडं हे 50-50 फॉर्म्युल्यावर अडलं आहे. सरकार स्थापन करण्यात आपली भूमिका महत्त्वाची राहणार हे लक्षात घेऊन शिवसेना आमच्यासमोर इतरही पर्याय आहेत, असं म्हणत भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. तर सेनेच्या दबावतंत्राला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे भाजपच्या नेतृत्वाखालीच सरकार येणार असा विश्वास व्यक्त केला.

याच मुद्द्यावर सुधीर मुनगंटीवार यांनीही भाष्य केलं आहे.

"शिवसेनेचं वक्तव्य हे विनाशकाले विपरित बुद्धी आहे, असं मुनगंटीवार यांनी म्हटलं. जसे त्यांना इतर पर्याय खुले आहेत, तसे आम्हालाही आहेत. पण 'रघुकुल रीत सदा चली आयी' असं म्हणत आपण महायुती केली असेल तर महायुतीसोबतच राहणं अपेक्षित आहे," असं मुनगंटीवार यांनी म्हटलं.

मुनगंटीवारांनी म्हटलं, "शिवसेनेच्या समर्थनासाठी जसे काही जण पुढे येत आहेत, तसंच भाजपच्या समर्थनासाठीही येत आहेत. प्रश्न कोणाला किती समर्थन आहे, हा नाही तर जनतेनं महायुतीला कौल दिलेला असताना पर्यायाची भाषा करणं ही घोडचूक ठरू शकते."

'या बैठकीची माहिती आम्हाला नाही'

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेमुळे सरकार स्थापनेसंदर्भात आज होणारी भाजप-शिवसेनेची बैठक आम्ही रद्द केली आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी अशी कोणती बैठक होणार होती, याची आम्हाला जराही कल्पना नव्हती, असं म्हटलं.

भाजपचा विधिमंडळातील नेता निवडण्यासंदर्भातील बैठक बुधवारी (30 ऑक्टोबर) होत आहे. यासाठी दिल्लीहून केंद्रीय नेते येतील, असंही चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.

विधीमंडळ नेता निवडीसाठी होणाऱ्या बैठकीसाठी दिल्लीहून केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना उपस्थित राहणार आहेत, असं ट्वीट भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलं.

देवेंद्र फडणवीसांनी नेमकं काय म्हटलं?

भाजपच्या नेतृत्वातच सरकार स्थापन होईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत निवडक पत्रकरांशी बोलताना त्यांनी ही गोष्ट स्पष्ट केली आहे.

"त्यांना (शिवसेनेला) ५ वर्षं मुख्यमंत्रीपद मिळावं असं वाटू शकतं. पण वाटणं आणि होणं यात फरक आहे. १९९५ चा फॉर्म्युला होईल की नाही याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. कोणती खाती द्यायची हे चर्चेला बसल्यावर कळेल," असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Image copyright Getty Images

उध्दव ठाकरेंचं आणि माझं निकालानंतर फोनवर बोलणं झालं आहे. आम्ही एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

"सामनामध्ये ज्या पध्दतीने लिहिलं जातं त्यावर आम्ही खूश नाही. आमची नाराजी आहेच. कॉंग्रेस-राष्ट्रवादी जे म्हणत नाही ते सामनामध्ये शिवसेना म्हणते. वृत्तपत्र म्हणून ते भूमिका घेतात, पण लोकांमध्ये चुकीचा मेसेज जातो. इतक्या ताकदीने कॉंग्रेस - राष्ट्रवादीवर पण लिहून दाखवा," असं आव्हान फडणवीसांना शिवसनेला दिलं आहे.

दरम्यान, उद्या (30 ऑक्टोबर) होणाऱ्या भाजपच्या विधीमंडळ नेता निवडीसाठीच्या बैठकीला अमित शहा येणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

सेनेचे 45 आमदार भाजपच्या संपर्कात?

दरम्यान, शिवसेनेचे निवडून आलेले 45 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं खासदार संजय काकडे यांनी म्हटलं आहे.

ज्याप्रमाणे राष्ट्रवादीत अजित पवार, जयंत पाटील आणि छगन भुजबळ या नेत्यांना मानणारे गट आहेत, तसंच शिवसेनेतदेखील गट आहेत. याच गटांचे नेते काहीही करून आम्हाला सत्तेत घ्या ही मागणी करत असल्याचं संजय काकडेंनी म्हटलं.

संजय काकडेंनी म्हटलं, "1995 साली भाजपाचे 63 आणि सेनेचे 78 आमदार निवडून आले होते. तेव्हा चार वर्षे शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि भाजपचे गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते. तोच फॉर्म्युला आता लागू होईल. शिवसेनेचे 63 आमदार निवडून आले आहेत आणि भाजपचे अपक्षसहित 125 आमदार आहेत. आता शिवसेना एक दोन मंत्रीपदं वाढवून घेण्याची शक्यता आहे. शिवसेनेची तशी मागणी आहे. हा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील विषय आहे."

Image copyright Twitter

लवकरात लवकर युतीचं सरकार स्थापन होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होतील, असा विश्वास संजय काकडेंनी व्यक्त केला.

या आधी सकाळी मुंबईत पत्रकारांशी बोलताना शिवसेनेसमोर इतर पर्याय असले तरी ते स्वीकारण्याचं पाप करणार नसल्याचं संजय राऊतांनी म्हटलं.

"आमची युती आहे आणि युतीच्या धर्माचे पालन आम्ही करत आहोत. जर कोणी युतीधर्माचे पालन करणार नसेल त्याबाबत मला काही म्हणायचे नाही. याला उत्तर जनताच देईल. आमच्याकडे इतर पर्यायही आहेत, पण ते पर्याय स्वीकारण्याचे पाप मी करू इच्छित नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय." असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय.

तर शनिवारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटलं होतं, की शिवसेनेला अडीच वर्षं मुख्यमंत्रिपद देण्यात यावं आणि भाजपनं त्याबाबत लेखी आश्वासन द्यावं. त्या पार्श्वभूमीवर राऊतांचं 'पाप करणार नसल्याचं' वक्तव्य तडजोडीचा संकेत देणारं असल्याचं मानलं जातंय.

उपमुख्यमंत्रिपद आणि महत्वाच्या खात्यांवर सेना राजी होईल?

'फ्री प्रेस जर्नल' या दैनिकाचे राजकीय संपादक प्रमोद चुंचूवार यांचं म्हणणं आहे की, सेनेनं वाटाघाटीचा संकेत दिला आहे. "इतर पर्याय स्वीकारण्याचे पाप आम्ही करू इच्छित नाही हे सांगून शिवसेनेनं भाजपला वाटाघाटीचा एक संकेत दिला आहे. आम्हाला फार ताणायचे नाही, तुम्हीही फार ताणू नका असं सांगण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. बुधवारी मुंबईत होणाऱ्या भाजप आमदारांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं दिलेला हा संदेश महत्त्वाचा आहे. आम्हाला पाप करायचं नाही पण करावं लागले तर तुमच्यामुळे करावं लागेल असाही राऊतांच्या या वक्तव्याचा अर्थ आहे."

अधिकाधिक गोष्टी पदरात पाडून घेण्यासाठी सेना प्रयत्न करत असल्याचं चुंचूवार यांचं म्हणणं आहे. "शिवसेना शुद्ध दबावाचं राजकारण खेळत आहे. अर्थात त्यांच्या जागेवर ते बरोबरच आहेत. गेली पाच वर्षं भाजपनं त्यांना जी वागणूक दिली, शिवसेनेची गरज नसल्यासारखं दाखवलं, त्याची वसुली करताना शिवसेना दिसतेय. जास्तीत जास्त पदरात पाडून घेणं ही सगळी रणनिती आहे. उपमुख्यमंत्रिपद आणि महसूल किंवा नगरविकास सारखी खाती घेऊन शिवसेना सत्तेत सामील होईल. फार ताणण्याचं धारिष्ट्य शिवसेनेत नाही."

Image copyright chandrakant patil / facebook

शिवसेनेच्या या काहीशा बदललेल्या भूमिकेला भाजपच्या ताठर भूमिकेची पार्श्वभूमी दिसत आहे. भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना म्हटलंय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होणार.

"उद्धव ठाकरेंकडे पर्याय काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापनेचा आहे, पण ते कधीच याचा विचार करणार नाहीत. उद्धव ठाकरे खूप व्यावहारिक आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काय आहे, हे उद्धव ठाकरेंना माहीत आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे तत्वत:ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचं मान्य करणार नाहीत आणि व्यावहारिक रिस्कही ते घेणार नाहीत," असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.

तुझं माझं जमेना अन् तुझ्यावाचून करमेना?

वरिष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांचं म्हणणं आहे की शिवसेनेत सत्तेतील सहभागाबाबत दोन मतप्रवाह आहेत, "सत्तावाटपाचा जो 50-50 चा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीत ठरलेला आहे तो अंमलात आणण्यासाठी शिवसेना आग्रही आहे. पण भाजप हा फॉर्म्युला मान्य करण्यास तयार दिसत नाहीये. उपमुख्यमंत्रिपद आणि आणखी काही महत्त्वाची खाती देण्यास भाजप तयार असल्याचं दिसत आहे. शिवसेनेत दोन प्रकारचे मतप्रवाह आहेत. आत्ता नाही तर कधी नाही अशी शिवसेनेची टॅगलाईन होती आणि त्याच आधारावर 'मातोश्री'वरील मतप्रवाह आहे की आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचेच. पण दुसरा ज्येष्ठ नेत्यांचा जो मतप्रवाह आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की आदित्य ठाकरेंनी अनुभव घेऊन मगच मुख्यमंत्री व्हावं. यामध्ये कोणता मतप्रवाह वजनदार ठरेल त्यावरच आगामी घडामोडी अवलंबून आहेत."

"शिवसेनेचा इतिहास बघितल्यास सेना नेहमीच 'तुझं माझं जमेला अन् तुझ्यावाचून करमेना' या पद्धतीने भाजपसोबत जात आलीय हे आपण पाहिलं आहे. हेही या घडामोडींमध्ये महत्त्वाचं आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)