विधानसभा निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी अजित पवारांची निवड

अजित पवार Image copyright Getty Images

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी अजित पवारांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.

जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे आणि अन्य नेत्यांनी अजित पवारांच्या नावाला अनुमोदन दिलं.

विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांशी बोलताना अजित पवारांनी म्हटलं, की अनेक सहकारी पक्ष सोडून गेले. हे सर्व जण आमच्यासोबत असते तर आमचं सरकार स्थापन झालं असतं. पण राजकारणात जर-तरला स्थान नसतं. आता आम्ही सभागृहात शेती, बेरोजगारीसारख्या प्रश्नांवर आक्रमकपणे भूमिका मांडू.

"1 लाख 65 हजार मताधिक्यानं निवडून आलो यावर अजूनही विश्वास नाही. सर्वांची डिपॉझिट बारामतीकरांनी जप्त केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो," या शब्दात अजित पवारांनी विजयाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी सत्ताधारी पक्षाला यंदा दिवाळी गोड गेली नाही, असं म्हणत अजित पवारांनी भाजप-सेनेला टोला लगावला.

सोबत राहण्यातच शिवसेना-भाजपचं हित : संजय राऊत

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या विधिमंडळ नेता निवडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली.

शिवसेना महत्त्वाची खाती घेऊन तडजोड करणार का, या प्रश्नावर उत्तर देताना संजय राऊत यांनी म्हटलं, की आम्ही खातेवही घेऊन बसलेलो नाही. युतीसंदर्भात जे ठरलंय ते होऊ द्या एवढीच आमची अपेक्षा आहे.

Image copyright ट्विटर

विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेसोबत सरकार बनवणार अशा विश्वास व्यक्त केला. याबद्दल बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं, "देवेंद्र फडणवीसांची भूमिका स्वागतार्ह आहे. शिवसेना आणि भाजपनं सोबत राहण्यातच एकमेकांचं आणि महाराष्ट्राचं हित आहे. फक्त जे ठरलंय ते होऊ द्या."

सरकार स्थापनेबाबत घाई करून चालणार नाही. थंड डोक्यानं महाराष्ट्राच्या जनतेचा विचार करून शिवसेना पक्षप्रमुख निर्णय घेतील आणि तो पुढे घेऊन जायला आम्ही समर्थ आहोत, असंही राऊत यांनी यावेळी म्हटलं.

भाजपमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब

दरम्यान आज दुपारी भाजपनं विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड केली.

विधिमंडळ नेतेपदासाठी चंद्रकांत पाटलांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडला . या प्रस्तावाला सुधीर मुनगंटीवारांनी अनुमोदन दिलं.

Image copyright Getty Images

मुनगंटीवारांसह संजय कुटे, हरीभाऊ बागडे, राधाकृष्ण विखे-पाटील, शिवेंद्रराजे भोसले, आशिष शेलार, गणेश नाईक, सुरेश खाडे, देवयानी फरांदे, गणेश नाईक, मंगलप्रभात लोढा यांनीही या प्रस्तावाला अनुमोदन केलं.

विधिमंडळ नेतेपदी निवड केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांचे आभार मानले.

'माझ्यासारख्या लहानशा कार्यकर्त्याला 2 वेळा जबाबदारी दिल्याबद्दल नरेंद्र मोदींचे विशेष आभार मानतो,' असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना म्हटलं. त्यांच्याबरोबरच फडणवीस यांनी जे.पी.नड्डा आणि अमित शहांचेसुद्धा आभार मानले.

शिवसेनेच्या साथीमुळेच महायुतीला प्रचंड मोठं यश प्राप्त झाल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचेही आभार मानले.

"100 पेक्षा जास्त जागा मिळल्यानं हा मोठा विजय आहे. महायुतीला लोकांनी जनादेश दिला आहे. सरकार महायुतीचं येईल, अफवांवर विश्वास ठेवू नका. चर्चा झाल्याशिवाय मजा येत नाही. लवकरच सरकार स्थापन होईल," असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

नेता निवडीचा आनंद-पंकजा मुंडे

नेता निवड झाली याचा आनंद झाला आहे. 2014 मध्येही देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ नेतेपदी निवड झाली होती. आता दुसऱ्यांदा ते निवडले गेले आहेत. हा एक इतिहास आहे आणि मी त्याबद्दल देवेंद्रजींचं अभिनंदन करते, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

2014 साली देवेंद्र फडणवीसांची गटनेता म्हणून निवड करताना माझा हात वर होता. यावेळेस मी निवडून आले नाही, पण कोअर कमिटीची सदस्य म्हणून मी उपस्थित आहे, असंही पंकजांनी सांगितलं.

लवकरच भाजप-शिवसेना मिळून सत्ता स्थापन करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिवसेनेची तातडीची बैठक

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांची गुरूवारी (31 ऑक्टोबर) तातडीची बोलावली आहे. शिवसेना भवनात उद्या दुपारी १२ वाजता ही होणार बैठक होणार आहे. या बैठकीमुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा कोकण दौराही पुढे ढकलण्यात आला आहे.

भाजपच्या विधिमंडळ नेता निवडीच्या बैठकीसाठी सर्व भाजप आमदार भगवे फेटे घालून विधान भवनात आले होते.

भाजपची भाषा बदलली?

दरम्यान, फॉर्म्युला प्रेम आणि विश्वासाचा असतो, प्रेमानं शिवसेना आणि भाजपमध्ये चर्चा होईल. चहाच्या गोडव्यासह ही चर्चा संपेल आणि सरकार स्थापन होईल, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं.

शिवसेना-भाजप एकत्र आल्याशिवाय अपक्षांच्या मदतीनं कुणीही सत्ता स्थापन करू शकत नाही, असंही त्यांनी म्हटलं.

महत्त्वाचं म्हणजे आम्हाला इतर पर्याय खुले आहेत असं म्हणणं ही सेनेची घोडचूक ठरू शकते, असं वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं होतं.

शिवसेनेचं वक्तव्य हे विनाशकाले विपरित बुद्धी आहे, असंही मुनगंटीवार यांनी म्हटलं होतं.

भाजप हायकमांड शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा करणार - महाजन

भाजपचे हायकमांड शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा करतील, सरकार शिवसेना भाजप युतीचच स्थापन होईल, असं भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

सत्ता स्थापनेसाठी भाजप आज कुठलाही दावा करणार नाही, असंही महाजन यांनी स्पष्ट केलं आहे.

महायुतीत दोनचार पक्ष आहेत, वेगळ लागू शकतो. खाते वाटपावरून चर्चा होत आहे, थोडा वेळ लागतोय, पण सरकार युतीचच येणार असं त्यांनी म्हटलं.

शिवसेनेनं लवकरात लवकर निर्णय घ्यावा - आठवले

शिवसेनेनं भाजपबरोबर सत्तेत सहभागी होण्यासाठी लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं रामदास आठवले यांनी म्हटलंय. शिवसनेनेचं काँग्रेसनं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं सत्ता स्थापन करण्याचं स्वप्न पूर्ण होणार नाही असंही त्यांनी म्हटलंय.

शरद पवारांना नरेंद्र मोदींचा फोन आलेला नाही - मलिक

शरद पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कुठलाही फोन आलेला नाही, या अफवा आहेत. त्यावर विश्वास ठेवू नका, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलंय.

भाजप अफवा पसरवून राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

लोकांनी आम्हाला विरोधात बसण्यासाठी कौल दिला आहे. जर हे सरकार पडत असले तर आम्ही प्रयत्न करू, असंही त्यांनी सांगितलं आहे.

पक्षांच्या बैठकांना सुरुवात

मुंबईत आज भाजपच्या विधीमंडळ नेता निवडीसाठी बैठक होणार आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना उपस्थित रहाणार आहेत

तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची मुंबईतल्या कार्यालयात बैठक होणार आहे. शरद पवार यावेळी उपस्थित असणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा विधीमंडळ नेता आणि विरोधीपक्ष नेता कोण असेल यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

तर आज दुपारी ४.०० वाजता दादरमधल्या टिळक भवनमध्ये काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे.

शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास विचार करू - पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास हायकमांडशी चर्चा करू, असं राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

"सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास हायकमांडसमोर ठेवून, आघाडीतल्या मित्रपक्षांसोबत चर्चा करू. मात्र शिवसेनेकडून अद्याप कुठलाच प्रस्ताव आला नाहीय," असं पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत.

सोनिया-पवार चर्चा

शिवसेना-भाजप युतीला बहुमत मिळालं असूनही महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यास विलंब होत आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची फोनवरून चर्चा झाली. या चर्चेमुळं राजकीय वर्तुळातही तर्कवितर्कांना उधाण आलंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)