अयोध्या खटल्याचा निकाल सर्वांनी मान्य करावा : शरद पवार #पाचमोठ्याबातम्या

शरद पवार Image copyright Getty Images

आजच्या विविध दैनिकांतील आणि वेबसाईटवरील प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी या आहेत आजच्या पाच मोठ्या बातम्या :

1. अयोध्या खटल्याचा निकाल सर्वांनी मान्य करावा: शरद पवार

अयोध्येतील राम जन्मभूमी वादावर सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल, तो सर्वांनी मान्य करावा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत ते बोलत होते. ही बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे.

अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीन खटल्याचा अंतिम निकाल 9 नोव्हेंबर रोजी लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार बोलत होते. या खटल्यावरील निकालानंतर देशात कोणतीही परिस्थिती उद्भवू शकते.

काही समाजकंटक सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करतील. अशा परिस्थितीत सर्व नवनियुक्त आमदारांनी आपापल्या मतदारसंघात शांतता, कायदा-सुव्यवस्था आणि संयम राखण्यासाठी प्रयत्नशील रहावे. या निकालाचा फायदा घेऊन असामाजिक तत्त्वे समाजात अशांतता निर्माण करणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असं आवाहन शरद पवार यांनी यावेळी केले.

2. पहलू खान आणि त्याच्या मुलांवरील गुन्हे, आरोपपत्र रद्द

पहलू खान आणि त्यांच्या मुलांविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याचे आदेश राजस्थान हायकोर्टाने दिले आहेत. ही बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.

पहलू खान आणि त्यांच्या मुलांवर गुरांची अवैध वाहतूक केल्याचा आरोप आरोपपत्रात ठेवण्यात आला होता. घटना घडली तेव्हा गाडी चालवत असलेल्या चालकावरील गुन्हाही मागे घेण्यात यावा, असे हायकोर्टाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. शिवाय या चारही जणांविरुद्ध दाखल करण्यात आलेलं आरोपपत्रही रद्द करण्याचे आदेश राजस्थान हायकोर्टाने दिले आहेत.

राजस्थानातील अलवरमध्ये 5 एप्रिल 2017 मध्ये कथित गोरक्षकांच्या जमावाने पहलू खान यांना बेदम मारहाण केली होती. गोतस्करीच्या संशयावरून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. हल्ल्यानंतर दोन दिवसांनी पहलू यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

3. 2050 सालापर्यंत मुंबई शहर अरबी समुद्रात लुप्त होणार

समुद्राची पातळी वाढत असल्याने 2050 पर्यंत जगातील काही महत्त्वाची शहरं समुद्राच्या पोटात जाण्याची शक्यता आहे. त्यात मुंबईचाही समावेश आहे. न्यू जर्सीतील क्लायमेट सेंटर या संस्थेनं एक शोधनिबंध सादर केलाय. ज्यात ही धक्कादायक गोष्टी समोर आली आहे. ही बातमी ABP माझाने दिली आहे.

जवळपास समुद्राच्या काठावर वसलेल्या शहरांमध्ये राहणाऱ्या 15 कोटी लोकांना याचा फटका बसण्याची चिन्हं आहेत.

Image copyright Getty Images

सर्वाधिक जास्त धोका असलेल्या देशांमध्ये व्हिएतनामचं नाव सर्वात वर आहे. इथलं आर्थिक केंद्र मानले जाणारे शहर हो शी मिन्ह पूर्णपणे समुद्रात बुडालेले असेल. भारताची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या मुंबई शहराला देखील याचा मोठा धोका असून 2050 सालापर्यंत हे शहर देशाच्या नकाशावरून जवळपास पुसलं जाईल, असा दावा या संशोधनात करण्यात आला आहे.

त्यामुळे समुद्राच्या वाढत्या जलस्तराचा फटका ज्या देशांना बसणार आहे त्या देशांनी आत्तापासूनच या धोक्यातून सावरण्यासाठी प्रयत्न सुरु करायला हवेत, असंही या संशोधन अहवालात म्हटलं आहे. इराण, चीन आणि पाकिस्तानला देखील याचा फटका बसणार आहे.

4. कांदा पुन्हा साठीपार

कांद्याची दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातबंदी करूनसुद्धा राज्यात कांद्याच्या दरांनी साठी पार केली आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

आवक कमी असल्याने कांद्याच्या दरात आठवडाभरात घाऊक आणि किरकोळ बाजारात किलोमागे १० रुपयांची वाढ झाली असून रोजच्या आहारातील इतरही भाज्या 60 ते 80 रुपयांच्या घरात असल्याने सामान्य माणसाचे आर्थिक गणित कोलमडलं आहे.

सप्टेंबर महिन्यात राज्यभरात झालेल्या पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्य़ांत पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पुणे आणि नाशिक जिल्ह्यांत कांदा साठवण चाळींमध्ये पाणी शिरल्याने कांद्याचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झालं आहे.

Image copyright Getty Images

कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी नुकतेच देशांर्तगत बाजारपेठेत कांद्याचे भाव कमी होतील, असं मत व्यक्त केलं होतं; परंतु कृषिमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतरही कांद्याच्या दरात घट होण्याची काही चिन्हं दिसत नाहीत.

5. आंबेनळी घाटात एसटी बस कोसळली

पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात एसटी बस एका दरीत कोसळून झालेल्या अपघातात 27 प्रवासी जखमी झाले आहेत. ही बातमी सकाळने दिली आहे.

जखमींवर पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, सात जखमींना महाड येथे हलवण्यात आलं आहे.

गेल्या वर्षीही या घाटात बस कोसळून 30 जणांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)