आदित्य ठाकरे : सत्ता स्थापनेबाबत उद्धवजींचा शब्द शेवटचा असेल

आदित्य ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

"सरकार स्थापनेबद्दल मी आता काही बोलू शकत नाही. त्यासंदर्भात उद्धव ठाकरे सांगतील तो शेवटचा शब्द असेल," असं शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरेंसह शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना आदित्य यांनी हे वक्तव्य केलं. सरकार स्थापनेबाबतच्या इतर कोणत्याही प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली नाहीत.

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची दखल राज्यपालांनी घ्यावी आणि पावसामुळे, वादळामुळे झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न व्हावेत, यासाठी राज्यपालांना विनंती केल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.

दरम्यान, गुरुवारी (31 ऑक्टोबर) ला झालेल्या शिवसेना आमदारांच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीसाठीची मुंबईत आज बैठक झाली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.

त्यानंतर शिवसेनेच्या सर्व आमदारांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं.

शिंदे हे सेनेत महत्त्वाचे आणि ताकदीचे नेते मानले जातात. त्यांच्याकडे मावळत्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम खातं होतं.

याशिवाय सुनील प्रभु यांची विधानसभेतल्या प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे.

सुभाष देसाई हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे त्यांचेही नाव विधिमंडळ पक्षनेतेपदासाठी चर्चेत होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)