कयार वादळ : अवकाळी पावसाने महाराष्ट्राला झोडपलं, खरीप पिकांचं मोठं नुकसान

मका Image copyright DEEPAK KHAIRNAR
प्रतिमा मथळा नाशिकमध्ये मक्याला कोंब फुटले आहेत.

आधीच लांबलेला पाऊस त्यानंतर कयार वादळामुळे पुन्हा झालेला पाऊस यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतांमधलं उभं पिक अडवं झालं आहे. नुकसान पाहून नाशिक जिल्ह्यातील 60 वर्षांच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.

अवकाळी पावसामुळे भात, मका, नाचणी, वरई आणि कांदा या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे. तसंच विविध राजकीय पक्षांनीही सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे.

शिवसेनेच्या नेत्यांनी यासंदर्भात राज्यपालंना भेटून मदतीची विनंती केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ - शेतकरी कर्जमाफीचं काय झालं?

तर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतांचे तत्काळ पंचनामे करून मदत देण्याबाबतचे निर्देश राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी ट्वीट करून सांगितलं आहे.

नाशिकमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यातील 50 टक्के पिकांचं नुकसान झालं आहे. मालेगाव तालुक्यातील कोठरे शिवारातील वायगाव गावातील केदा मोठाभाऊ देवरे या ६० वर्षांच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्यांची पावणे-तीन एकर शेती होती. बँक ऑफ महाराष्ट्रकडून त्यांनी साडेतीन लाखांचं कर्ज घेतलं होतं. तर घरातील काही सोनं तारण ठेवलं आहे. याबाबत पोलीस अधिक माहिती घेत आहेत.

आत्महत्येचा दुसरा प्रयत्न

केदा यांनी यापूर्वीही डाळिंब पिकाला फळ न लागल्याने आणि दुष्काळामुळे कांदा पीक न आल्याने तीन महिन्यापूर्वी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस त्यांना उशिराच्या खरीप हंगामातील कांदा पिकाकडून मोठी अपेक्षा होती, पण दोन दिवसातील कांद्याच्या नुकसानीनं त्यांच्या सर्व आशा धुळीस मिळाल्या, अशी माहिती स्थानिक पत्रकार दीपक सूर्यवंशी यांनी दिली.

आता कर्ज कसं फेडायचं?

नाशिकमधीलच बागलाण तालुक्यातील बिजोटे गावातील आबासाहेब जाधव यांच्या शेतातील मका काढलेला होता, पण त्यानंतर आलेल्या अवकाळी पावसाने शेतातील मक्याला अंकुर फुटले आहेत. त्यांची एक एकर शेती आहे.

Image copyright DEEPAK KHAIRNAR
प्रतिमा मथळा अवकाळी पावसामुळे शेतांमध्ये असं पाणी साचलेलं आहे.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "रब्बी हंगामात दुष्काळामुळे पीक करपलं तर यावेळेस उशिरा का होईना, आलेल्या पावसानं थोडा दिलासा दिला होता, मका विकून आधीचे कर्जाचे हफ्ते देऊ शकू ही आशा होती, दिवाळी तर नाही पण दिवाळी नंतर दोन पैसे घरात येतील ही अपेक्षा मातीमोल झाली, आता कर्ज कसं फेडावं हा प्रश्न मात्र सतावतोय."

कांदा, द्राक्ष, बाजरीचंही नुकसान

नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने गेल्या 2 दिवसात मोठं नुकसान केलं आहे. सरकारने 33% नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे सुद्धा पंचनामे सुरू केले आहेत.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जिल्हयात 7 लाख 40 हजार हेक्टरवर लागवड झाली होती. त्यापैकी गुरुवारी सकाळपर्यंत प्राप्त प्राथमिक नुकसान अहवालानुसार 3 लाख 26 हजार 924 हेक्टर शेतीचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालं आहे.

नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिलेल्या महितीनुसार सर्वांत जास्त मका पिकाचं नुकसान झालं आहे. 2.26 लाख हेक्टर पैकी 60% मक्याचे नुकसान झालंय, तर 50 हजार हेक्टर कांदा पिकाचं 40 % नुकसान झालं आहे.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांचे प्रश्न खरंच संपतील का?

1लाख 10 हजार हेक्टर पेरा असलेल्या बाजरीचं 60% नुकसान झालं आहे. सर्वांत मोठा आर्थिक फटका द्राक्ष फळबागांना बसला असून 60 हजार एकर द्राक्षबागांपैकी 40% बागांचे नुकसान झालंय.

नुकसान झालेल्या द्राक्षांपैकी बहुतांश द्राक्ष ही नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये निर्यात होणारी होती. नाशिक जिल्ह्यात 1407 गावांमध्ये 3 लाख 83 हजार 19 शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालंय.

सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांची मागणी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसामुळे आणि वादळामुळे पिकांचे नुकसान झालं आहे. यामध्ये भात आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावातले शेतकरी मिलिंद पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले.

Image copyright MILIND PATIL
प्रतिमा मथळा पावसामुळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेले पिकांचे नुकसान.

ते म्हणाले, "सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात, केळी बरोबरच इतर पिकांचंही नुकसान झालं आहे. ऑक्टोबर महिन्यात हवेत बदल झाल्यामुळे यंदा आंबा लांबण्याची शक्यता आहे. 100 टक्के नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रतिगुंठा 600 रुपये भरपाई आणि सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे. भातपिकाची नुकसानभरपाई 15 नोव्हेंबरपर्यंत न मिळाल्यास आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे."

कोल्हापुरात सोयाबिन आणि भाताचं नुकसान

कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने सोयाबिन आणि भात पिकांचं नुकसान झालं आहे. सुरुवातीच्या अंदाजानुसार 15 ते 16 हेक्टर वरील क्षेत्र बाधित झालं असण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.

Image copyright SWATI PATIL
प्रतिमा मथळा कोल्हापूर जिल्ह्यातील भात पिकामध्ये दोन फूट पाणी साठलेलं आहे.

महसूल, कृषी आणि जिल्हा परिषदेच्या विभागाकडून शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार हे पंचनामा करण्याचं काम सुरू झालं आहे.

निश्चित आकडेवारी येण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी लागू शकतो. त्यानंतर नुकसानीची आकडेवारी देण्यात येईल, असंही वाकुरे यांनी सांगितले.

तर सांगलीत देखील पंचनाम्यांना सुरुवात होईल असा अंदाज आहे.

कापणीला आलेल्या पिकाचं नुकसान

अमरावती विभागातसुद्धा गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने शेतीचं नुकसान झालं आहे. 20 टक्क्यांच्या आसपास शेतमालाचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पावसाच्या लहरीपणामुळे काही शेतकऱ्यांनी उशिरा सोयाबिन आणि कापसाची पेरणी केली होती. त्यामुळे ऐन कापणीवर पीक आलं असताना परतीच्या पावसाने हजेरी लावली.

पावसामुळे कापसाच्या पिकांची पत खराब झालीय.

"नुकसानग्रस्त शेतीचं सर्वेक्षण सुरू आहे. 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या भागात संयुक्त सर्वेक्षण करण्यात येत आहे. कापणी केलेल्या, जमा करून ठेवलेल्या आणि कापणीला आलेल्या पिकांचं सर्वेक्षण सुरू आहे," असं विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.

सोयाबिनला फुटले कोंब

बुलडाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगावमधले तरुण शेतकरी प्रदीप सरोदे यांचं अवकाळी पावसामुळे अडीच एकरातील सोयाबीनचं नुकसान झालं आहे.

Image copyright SHRIKANT BANGALE
प्रतिमा मथळा सोयाबिनच्या पावसामुळे खराब झालेल्या शेंगा.

ते म्हणाले, "मी अडीच एकरात सोयाबिन पेरलं होतं. यातलं दीड एकर शेतातील सोयाबिन सोंगली होती (कापणी केलेली) आणि तिला कापडाखाली झाकून ठेवलं होतं. पण, गेल्या 20 दिवसापासून जोराचा पाऊस असल्याने पूर्ण सोयाबिनमध्ये पाणी गेलं आणि आता सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटले आहेत. सोयाबिन खराब झाली आहे."

उरलेल्या एक एकरातील सोयाबिन पूर्ण पाण्याखाली गेल्याचं ते सांगतात. "सोयाबिनची पेरणी, खत, औषध फवारणी आणि कापणी मिळून 10 ते 12 हजार रुपये खर्च आला. आता सगळी सोयाबिन हातातून गेली आहे. लावलेला खर्चही आता भरून निघत नाही," असं ते पुढे सांगतात.

प्रशासनानं लवकरात लवकर सोयाबिनचा पंचनामा करावा आणि नुकसान भरपाई द्यावी, अशी त्यांची अपेक्षा आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)