विधानसभा निकाल : कोल्हापूरमध्ये भाजपला का जिंकता आली नाही एकही जागा?

  • स्वाती पाटील
  • बीबीसी प्रतिनिधी, कोल्हापूर
चंद्रकांत पाटील

फोटो स्रोत, FACEBOOK

कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल सर्वच पक्षांसाठी वेगळा संदेश देऊन गेले. गेल्या निवडणुकीत शून्य जागा मिळवलेल्या कॉग्रेसच्या यावेळी मात्र चार जागा निवडून आल्या तर दोन जागांवर असलेल्या भाजपला एकही जागा जिंकता आली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसनं दोन जागा टिकवल्या मात्र सहा जागांवर मजबूत असलेली शिवसेना कशीबशी एका जागेवर निवडून आली. जनसुराज्य शक्ती पक्षाने एका जागेवर खातं उघडलं. तर अपक्ष उमेदवारांना कोल्हापूरकर जनतेने चांगली साथ दिली.

एकीकडे शिवसेनेच्या विद्यमान आमदारांना लोकांनी घरी बसवले त्याचवेळी कॉग्रेसच्या चार उमेदवारांना नव्याने संधी दिली.

कोल्हापुरातील या नव्या राजकीय समीकरणांची नेमकी कारणं काय आहेत ती शोधण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीने केला.

"या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्तेपर्यंत पोहोचण्याइतपत य़श मिळालं नसलं तरी आघाडीची ताकद या निवडणुकीत पुन्हा समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी संघटनात्मकदृष्ट्या ताकदवान आहेत. त्यांना साखर कारखाने, पंचायत राज ,सहकारी संस्था, महापालिका यांचा चांगला पाठिंबा आहे. याच संघटनात्मक ताकदीचा आघाडीला यावेळी फायदा झाला कोल्हापूर जिल्ह्यात आघाडीने चांगले उमेदवार दिले होते. त्यामुळं कोल्हापूरमध्ये आघाडीला चांगलं यश मिळालं," असं राजकीय विश्लेषक अशोक चौसाळकर यांनी सांगितलं.

पूरपरिस्थितीचा निकालावर परिणाम?

मतदारसंघनिहाय विजयाची जी कारणं आहेत त्यापैकी पूर हे एक कारण आहे, असं सकाळचे वरिष्ठ पत्रकार निवास चौगले यांना वाटतं. "पूरपरिस्थितीत झालेलं नुकसान आणि सरकारचं दुर्लक्ष याचा फटका सत्ताधाऱ्यांना बसला आहे हे नाकारता येणार नाही. मात्र त्यातही मतदारसंघानुसार वेगळं चित्र पाहायला मिळालं. उदाहरणादाखल करवीरमध्ये चंद्रदीप नरके यानी चांगलं काम केलं होतं. मात्र त्याचा त्यांना फायदा मिळू शकला नाही," असं चौगलेंनी म्हटलं.

"महापूराच्या काळात लोकांचे खूप हाल झाले. शासकीय यंत्रणा लोकांपर्यंत वेळेत पोहचू शकली नाही. हीच गोष्ट सरकारविरोधात गेली आणि युतीला जिल्ह्यात अपयश आलं," असं मत चौसाळकर यांनी व्यक्त केलं.

युतीला बंडखोरीचा फटका

या निवडणुकीत सेना-भाजप युती म्हणून लोकांच्या समोर होती. मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळं होतं.

जिल्ह्यात बंडखोरीचं चित्र कसं होतं? शिरोळमध्ये शिवसेनेच्या उल्हास पाटील यांच्या विरोधात भाजपचे बंजखोर अनिल यादव होते. चंदगडमध्ये सेनेच्या संग्राम कुपेकर यांच्या विरोधात भाजपचे बंडखोर शिवाजी पाटील होते.

हातकणंगले इथं सेनेच्या सुजित मिणचेकर यांच्या विरोधात जनसुराज्यचे अशोक माने होते. जनसुराज्य शक्ती हा युतीचा घटकपक्ष असतानाही जिल्ह्यात दोन ठिकाणी त्यांनी सेनेच्या विरोधात उमेदवार दिला होता. त्यात शाहूवाडीमध्ये सेनेच्या सत्यजीत पाटील यांच्या विरोधात विनय कोरे स्वतः उमेदवार होते तर कागलमध्ये सेनेच्या संजय घाटगे यांच्याविरोधात समरजित घाटगे अपक्ष म्हणून उभे होते.

भाजपने या जागेसाठी समरजित यांच्या नावाची जाहीर घोषणा केली होती. मात्र ऐनवेळी समरजित यांना बंडखोरी करावी लागली. या सर्व जागांवर सेनेला फटका बसला. मात्र आघाडी आणि इतर पक्षांना त्याचा फायदा झाला.

फोटो स्रोत, FACEBOOK

फोटो कॅप्शन,

समरजित घाटगे

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

याबाबत बोलताना अशोक चौसाळकर यांनी म्हटलं, "कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बंडखोर उमेदवार युतीच्या समोर उभे राहिले. या लढाईत ताकदीने मोठ्या असलेल्या उमेदवारांनी एकमेकांची मते खाल्ली. या बंडखोरीमुळं मतांची फाटाफूट झाली. त्याचा फायदा मात्र आघाडीला झाला."

"सेना आणि भाजप यांच्यात वेगळं राजकारण खेळलं गेलं. बंडखोर उमेदवारांनी अधिक मतं घेतली. युतीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकाला मदत केली नाही. युतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकजुटीने प्रयत्न केले नाही. उलट भाजपचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सेनेचे उमेदवार पाडण्याची खेळी खेळली गेली. त्याचा फटका युतीला बसला," असं पुण्यनगरीचे निवासी संपादक अशोक घोरपडे यांना वाटतं.

चौगले यांनीही बंडखोरी झाली नसती तर जिल्ह्यात वेगळं चित्र असतं असं म्हटलं.

"चंद्रकात पाटील कोथरूडमध्ये गेल्याने त्यांना इथं लक्ष देता आलं नाही. शिवसेनेबाबत बऱ्याच ठिकाणी नाराजी होती. शिवसेनेच्या जागा कमी करण्याची रणनीती भाजपने आखली होती. त्यामुळं जिल्ह्यात सेना भाजपची पडझड झाली," असं चौगले यांना वाटतं.

सेना-भाजपकडे सत्ता असताना अपयश का?

"गेली पाच वर्ष राज्यात युतीची सत्ता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सेनेचे सहा आमदार होते तर भाजपचे दोन आमदार होते. पण या काळात स्वतःची संघटना, निष्ठावंत कार्यकर्त्याचं जाळं, पक्षीय पातळीवर मोठं बळ निर्माण करण्यात हे दोन्ही पक्ष अपयशी ठरले," असं चौसाळकर यांना वाटतं.

"युतीची मदार ही केवळ कॉग्रेस-राष्ट्रवादीतून आलेल्या फुटीर राजकीय नेत्यांवर राहिली आहे. जोपर्यंत कार्यकर्त्याचं मोठं बळ सेना-भाजप निर्माण करत नाही तोवर यशाची हमी देता येणार नाही. १९९५ साली देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी सत्ता गेल्यानंतर बाहेर पडलेली नेते मंडळी पुन्हा एकदा आघाडीकडे परत गेली होती. पण यावेळी मात्र पुन्हा युतीची सत्ता आल्याने तसं होणार नाही," असं चौसाळकरांनी म्हटलं.

व्यक्तिगत गटातटाच्या राजकारणाचा फटका?

"सुरूवातीला राजकीय वाटणारे वाद आता व्यक्तिगत पातळीवर सुरू आहेत. कागलमध्ये मंडलिक, मुश्रीफ, घाटगे आणि संजयबाबा असे चार गट कार्यरत आहेत. या निवडणुकीत उमेदवार नसल्याने मंडलिकांच्या गटाला महत्व निर्माण झालं होतं.

कागलमध्ये पक्षापेक्षा गटातटाच्या राजकारणाला महत्व आहे. मंडलिकांनी आपल्या सोयीची भूमिका घेतल्याचं चित्र दिसलं. चंदगडमध्ये राजेश पाटील, करवीरमध्ये पी एन पाटील यांना मंडलिक गटाने मदत केल्याचं बोलल जातं," असं चौगलेंनी म्हटलं.

फोटो कॅप्शन,

ऋतुराज पाटील आणि सतेज पाटील

"कोल्हापूरकरांचं ठरलेलं असतं. महाराष्ट्रात काय लढाई सुरू आहे. पण इथं मात्र वेगळे चित्र असतं. सतेज पाटील यांचा ताकद मंडलिक यांच्या पाठीशी होती. त्यामुळं मंडलिक निवडून आले. त्याची परतफेड म्हणून मंडलिक यांनी ऋतुराज पाटील यांच्या पाठीमागे मंडलिक गटाची ताकद दिली. त्यासाठी दोन्ही गटांनी उघड प्रचार केला होता. आमचं ठरलं या पॅटर्नने शिवसेना आणि भाजपला मोठा फटका बसला. भाजप सेनेतील भांडणाचा फायदा हा कॉग्रेस आणि राष्ट्रवादीला झाला. थोडक्यात काय तर भाजप आणि सेनेची एकजुटीने मदत झाली नाही. त्याउलट आघाडी मात्र उमेदवार निवडून आणण्यासाठी एकजुटीने लढले. त्यामुळं त्यांना चांगलं यश मिळालं. मात्र भाजप शिवसेनेत एकजूट नव्हती," असं घोरपडे यांनी म्हटलं.

"महाराष्ट्रात कॉग्रेसच्या नेत्यांनी ही निवडणूक गांभीर्याने घेतली नाही. मोजक्या जागा निवडून येतील त्याव्यतिरिक्त पराभवच पदरी येईल त्यामुळं तिथं ताकद खर्ची करायची नाही अशी मानसिकता कॉग्रेसची होती. जर प्रियांका किंवा राहुल यांनी महाराष्ट्रात एखादी सभा घेतली असती तर आज खूप वेगळ चित्र असतं. सतेज पाटील यांनी शेवटच्या क्षणी चंद्रकांत जाधव यांना उमेदवारी दिली त्यामुळं कॉग्रेसच्या विजयात त्यांचा मोठा वाटा आहे. तर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या यशाचं श्रेय हे हसन मुश्रीफ यांना जातं," असंही घोरपडे यांनी सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)