पाकिस्तान रेल्वे दुर्घटना : रेल्वे अपघातांची संख्या वाढू लागलीय का?

  • रिअॅलिटी चेक टीम
  • बीबीसी न्यूज
रेल्वे अपघात

फोटो स्रोत, Getty Images

पाकिस्तानमध्ये रेल्वे दुर्घटनेत सुमारे 70 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. यानंतर पाकिस्तान सरकारच्या रेल्वे सुरक्षितेबाबतच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

दावा - पाकिस्तानच्या विद्यमान रेल्वे मंत्र्यांनी सर्वाधिक रेल्वे अपघातांचा विक्रम केल्याचं विरोधी पक्षनेते बिलावल भुट्टो झरदारी यांनी म्हटलं आहे.

वस्तुस्थिती - उपलब्ध माहितीनुसार, त्यांचा हा दावा चुकीचा असल्याचं स्पष्ट होतं. यावर्षी जीवितहानी जास्त संख्येने झालेले दोन सर्वात मोठे रेल्वे अपघात घडले. मागच्या पाच वर्षांच्या तुलनेत गेल्या वर्षी दुर्घटनांची संख्या खूप कमी होती.

रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शेख रशीद अहमद यांनी ऑगस्ट 2018 ला रेल्वेमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता. तेव्हापासून जून 2019 पर्यंत 74 अपघात घडले आहेत.

नुकताच झालेला अपघात ही मागच्या दशकातला सर्वात भीषण दुर्घटना आहे. मागच्या काही काळात अनेक जीवघेणे रेल्वे अपघात घडले. त्यामध्ये जुलैमध्ये झालेल्या रेल्वे अपघाताचाही समावेश आहे. या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला होता.

पूर्वीचे अपघात

अपूर्ण आकडेवारीसह सध्याच्या वर्षाची मागच्या काही वर्षांसोबत तुलना करणं अवघड आहे. पण मागच्या एका वर्षात घडलेले 74 रेल्वे अपघात ही सामान्य बाब होती, असं म्हणू शकत नाही.

पाकिस्तान रेल्वे मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2012 ते 2017 पर्यंत 757 रेल्वे अपघात घडले आहेत. म्हणजेच दरवर्षी 125 अपघात.

यामध्ये बहुतांश अपघात हे रेल्वे रुळावरून खाली घसरणे किंवा रेल्वे क्रॉसिंगवर दुसऱ्या वाहनांना धडक दिल्यामुळे झाले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

या अनुषंगाने 2015 हे वर्ष अत्यंत वाईट ठरलं. यावर्षी लहान-मोठ्या अशा एकूण 175 दुर्घटना घडल्या. यामध्ये 75 अपघात रेल्वे रुळांवरून घसरल्यामुळे तर 75 अपघात रेल्वे क्रॉसिंगवर घडले.

स्थानिक माध्यमांच्या मते, मागच्या सहा वर्षांत रेल्वे अपघातात 150 जणांचा मृत्यू झाला.

पण आणखी एक आकडेवारी पाकिस्तान रेल्वे मंत्रालयाने संसदेत मांडली. 2013 ते 2016 पर्यंत घडलेल्या 338 रेल्वे अपघातांमध्ये 118 जणांचा मृत्यू झाला.

रेल्वे अपघात का होतात ?

या अपघातामागे स्वयंपाकासाठी वापरलं जाणारं गॅस सिलेंडर हे मुख्य कारण असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. यामुळेच आग इतर डब्ब्यांमध्ये पसरत गेली. जाते. परिणामी, अनेक जणांना नाईलाजाने चालत्या रेल्वेतून उडी मारावी लागली.

पण इतर काही माध्यमांनी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं बातमीमध्ये सांगितलं आहे. अपघातातून वाचलेल्या प्रवाशांनीही शॉर्ट सर्किटमुळेच आग लागल्याची माहिती दिली.

ही रेल्वे कराचीहून रावळपिंडीला जात होती. हा रेल्वेमार्ग पाकिस्तानमधला सगळ्यात जुना आणि लोकप्रिय रेल्वेमार्ग म्हणून ओळखला जातो. पाकिस्तानमध्ये मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीयांसाठी प्रवासाचं उत्तम साधन रेल्वेच आहे.

यामुळेच साधारणपणे रेल्वेडब्ब्यांमध्ये गर्दी असते. रेल्वेंची स्थितीसुद्धा बिकट आहे.

विमानतळांच्या तुलनेत रेल्वे स्थानकांवर सुरक्षेच्या सुविधा कमी प्रमाणात उपलब्ध असतात. यामुळेच लोक स्वयंपाकाचा गॅस किंवा ज्वलनशील द्रव पदार्थ रेल्वेत घेऊन जाऊ शकतात, असं बीबीसी उर्दूचे प्रतिनिधी आबिद हुसेन यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images

पुरेशा देखभालीचा अभाव, सिग्नल यंत्रणेतील त्रुटी आणि जुने इंजिन ही पाकिस्तानमधल्या रेल्वे अपघातांमागचं खरं कारण असल्याचं अधिकारी वर्ग सांगतो.

त्यामुळेच अपघातांत बळी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. रेल्वेत प्रमाणापेक्षा जास्त लोक प्रवास करत असतात. 2007 मध्ये मेहराबपूरजवळ झालेल्या एका रेल्वे अपघातात 56 जण दगावले होते. तसंच 120 जण जखमी झाले होते.

2005 मध्ये सिंध प्रांतात तीन रेल्वे एकमेकांना धडकल्यामुळे 130 जणांचा मृत्यू झाला होता. हा पाकिस्तानचा सर्वात भीषण अपघात मानला जातो.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)