डेटिंगच्या नावाखाली तरुणींनी घातला लाखो रुपयांचा गंडा

ऑनलाइन डेटिंग Image copyright Getty Images

25 वर्षांची निवेदिता (नाव बदलले आहे) इंग्रजीत पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून बेरोजगार होती.

या परिस्थितीत तिच्या मैत्रिणीने तिला महिना 20 हजार रुपये पगाराच्या नोकरीची ऑफर दिली तेव्हा तिचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसला नाही.

मैत्रिणीनं तिला सांगितलं, की त्यांना कोलकात्यामधल्या अलीपूर भागातल्या एका कॉल सेंटरमध्ये काम करायचं आहे. निवेदितानं दोन दिवसांतच काम सुरू केलं.

अर्थात, कामाचं स्वरूप कळाल्यावर निवेदिताला मोठा धक्का बसला. मात्र, आता तिच्यापुढे नोकरी करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं तिला जाणवलं.

निवेदिताने कामाविषयी कुटुंबीयांनाही सांगितलं नव्हतं. ऐन दिवाळीच्या तोंडावर विशाखापट्टणम पोलिसांनी कोलकाता क्राईम ब्रँच अधिकाऱ्यांच्या पथकाच्या मदतीनं या कॉल सेंटरवर छापा टाकला.

निवेदिता आणि तिच्या इतर 22 महिला सहकाऱ्यांसोबत एकूण 26 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली.

या कारवाईनंतरच निवेदिताचे कुटुंबीय आणि तिच्या शेजारच्यांना ती कोणतं काम करायची ते कळलं.

निवेदिताचा गुन्हा

तरुणांना मुलींसोबत डेंटिंगचं गाजर दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप निवेदिता आणि तिच्या अन्य महिला सहकाऱ्यांवर करण्यात आला.

महाविद्यालयीन मुलींसोबतच मॉडेल आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींसोबत डेटिंगचं गाजर दाखवलं जायचं.

डेटिंगच्या मोबदल्यात तरुणांकडून भलीमोठी रक्कम उकळली जायची. अनेक प्रकरणांमध्ये ही रक्कम लाखोंच्या घरात आहे.

फ्रॉड डेटिंग साईट

या कारवाईत सहभागी असलेल्या कोलकाता सायबर क्राईम विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बीबीसी हिंदीचे सहकारी पीएम तिवारी यांना सांगितलं, "कॉल सेंटर चालवणारे फ्रॉड वेबसाईटवर अनेक महिलांचे बनावट प्रोफाईल अपलोड करायचे. या वेबसाईटवरून तरुणांना सदस्यत्वाची ऑफर दिली जायची."

विशाखापट्टणमच्या सायबर क्राईमचे सर्कल इन्स्पेक्टर गोपीनाथ यांनी बीबीसी तेलुगुचे प्रतिनिधी विजय गजम यांना सांगितलं, की या डेटिंग अॅपवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी 1 हजार रुपये फी आकारली जायची.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं, "रजिस्ट्रेशन केल्यानंतर युजरला लगेचच कॉल सेंटरमधल्या मुलीचा फोन जायचा आणि 4 लाख रुपये भरल्यानंतरच तुम्हाला तुमच्या पसंतीच्या मुलीबरोबर डेटिंगवर जाता येईल, अशी माहिती दिली जायची. युजरला हवे तेव्हा 4 लाख रुपये परत केले जातील, असं आश्वासनही दिलं जायचं."

इतकंच नाही तर तरुणांना सिल्व्हर, गोल्डन आणि प्लॅटिनम कार्ड अशा ऑफर्सही दिल्या जायच्या. या कार्डांची किंमत 2 ते 10 लाख रुपयांच्या दरम्यान असायची.

प्लॅटिनम कार्ड धारकांना मुलीबरोबर डेटिंग, बाहेर फिरणं, चित्रपट पाहणं आणि सेक्सचीही ऑफर मिळायची.

निश्चित रक्कम जमा केल्यानंतर तरुणांना मुलीचा कॉल यायचा. ही मुलगी फोनवरून बोलायची. मात्र, काही काळानंतर कॉल येणं बंद व्हायचं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वेबसाईटवर अपलोड केलेले सर्व प्रोफाईल खोटे होते. पैसे भरल्यानंतर वारंवार फोन करूनही पसंतीच्या मुलीबरोबर डेटिंगवर जाता न आल्यावर आपण फसवलं गेल्याचं तरुणांच्या लक्षात यायचं.

कुणी पैसे परत मागितले तर 5 लाख रुपये आणखी भरा. यातले 10,000 रुपये कापून उर्वरित संपूर्ण रक्कम परत केली जाईल, असं सांगितलं जायचं. अशाप्रकारे काही लोकांकडून लाखो रुपये उकळण्यात आले होते.

पोलिसांच्या सांगण्यानुसार अशा घटना सहसा लवकर उजेडात येत नाहीत. कारण लाखो रुपयांची फसवणूक झाल्यानंतरही समाजातली प्रतिष्ठा डागाळेल, या भीतीमुळे अनेकजण तक्रार नोंदवायला पुढे येत नाहीत आणि म्हणूनच अशा कॉल सेंटरचा धंदा राजरोसपणे सुरू असतो.

पोलिसांना माहिती कशी मिळाली?

या प्रकरणाची तक्रार एका तरुणाने विशाखापट्टणम पोलिसांकडे केली. या तरुणाला ऑनलाईन फ्रॉडमध्ये 18 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी 6 महिने या प्रकरणाचा तपास केला आणि त्यानंतर या कॉल सेंटरचं लोकेशन शोधून काढलं. शिवाय आयपी अॅड्रेस, व्हॉट्सअॅप डेटा आणि फोन कॉल्सचीही माहिती घेण्यात आली. ही वेबसाईट 'Go Daddy'च्या डोमेनवर रजिस्टर होती.

प्रतिमा मथळा कोलकात्यातील अलीपूरमध्ये पोलिसांनी छापा टाकला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या मुलींपैकी अनेकींनी महाविद्यालयीन शिक्षणही पूर्ण केलेलं नव्हतं.

विशाखापट्टणम पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाचे इन्स्पेक्टर रवी कुमार यांनी पत्रकारांना सांगितलं, "अशा फ्रॉड डेटिंग वेबसाईटचा धंदा देशभरात सुरू आहे. बहुतांश प्रकरणांमध्ये या वेबसाईट कॉल सेंटरच्या माध्यमातून चालवल्या जातात."

राजरोसपणे कसा सुरू असतो कंपन्यांचा कारभार?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या बनावट कंपन्या आपला पत्ता सतत बदलत असतात. त्यामुळे पोलिसांना त्यांचं लोकेशन शोधून काढणं कठीण होऊन बसतं. शिवाय ट्रॅक होऊ नये, यासाठी बेसिक मोबाईलचा वापर केला जातो.

पोलिस आपल्यापर्यंत पोहचू शकतात, असा संशय येताच कंपन्या आपलं सिमकार्ड नष्ट करून नवीन नंबर सुरू करतात.

एकाच कंपनीच्या अनेक शाखा असतात. पोलिसांनी गो डॅडीच्या डोमेनवर चालवल्या जाणाऱ्या 6 वेबसाईट्स बंद केल्या आहेत.

याशिवाय पोलिसांनी 40 बेसिक मोबाईल फोन, 15 स्मार्ट फोन आणि 3 लॅपटॉपही जप्त केले आहेत.

देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ही वेबसाईट सुरू आहे. यात प्रामुख्यानं महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि केरळचा समावेश असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

कोलकाता पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाचं म्हणणं आहे, की गेल्या काही वर्षात कोलकाता अशा बनावट वेबसाईटचं प्रमुख केंद्र बनलं आहे.

गेल्या वर्षी अशाच एका प्रकरणात 5 लोकांना अटक करण्यात आली होती. याशिवाय गेल्या महिनाभरात अमेरिका आणि इंग्लंडच्या अनेकांना कोट्यवधींचा गंडा घालण्याच्या आरोपाखाली कमीत कमी 3 कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या दीड डझन लोकांना अटक करण्यात आली आहे.

फसवल्या गेलेल्या तरुणांशी व्हॉट्सअॅप कॉलवरून बोलणं व्हायचं. तपास पथकाला कॉल सेंटर संचालकांच्या दोन डझनहून जास्त बँक खात्यांचीही माहिती मिळाली आहे. या बँक खात्यांचीही चौकशी सुरू आहे.

कोलकाता पोलिसांचं मुख्यालय असलेल्या लाल बाजारमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं, "या नेटवर्कचं जाळं देशभरात पसरलं आहे. यातून हजारो लोकांना कोट्यवधींचा गंडा घालण्यात आल्याचा अंदाज आहे. प्रकरणाची चौकशी सुरू आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)