हॉकी : राणी रामपाल आणि भारतीय महिला हॉकी संघाच्या संघर्षाची कहाणी

हॉकी, खेळ, महिला Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा राणी रामपाल

अमेरिकेला नमवत भारतीय महिला हॉकी संघाने सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याचा मान मिळवला. पराभवाच्या गर्तेतून त्यांनी स्वत:ला कसं बाहेर काढलं?

"घाबरू नका, बिनधास्त बोला." हे शब्द होते भारतीय हॉकी महिला संघाची कर्णधार राणी रामपालचे.

2017 मध्ये भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सेजोर्ड मारिजन यांनी स्वीकारली. सेजोर्ड आणि खेळाडू यांच्या दरम्यानच्या एका मीटिंगमध्ये राणीने बाकी खेळाडूंना उद्देशून हे उद्गार काढले होते. आपल्या विचारण्याला मुली प्रतिसाद का देत नाहीत, हे तोपर्यंत सेजोर्ड यांना लक्षात आलं नव्हतं.

मनातलं ओठावर येऊ न देणाऱ्या या मुलींनी काही दिवसांपूर्वी भूवनेश्वर इथल्या कलिंगा स्टेडियममध्ये अमेरिकेला नमवत पुढच्या वर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला.

2016 रिओ ऑलिम्पिकनंतर सलग दुसऱ्या ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याचा मान या संघाने मिळवलाय. या आधी थेट 1980 मध्ये भारतीय महिला हॉकी संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला होता, म्हणजे हा क्षण पुन्हा उजाडायला लागली होती तब्बल 36 वर्षं.

विजयानंतरचा विजय

चार वर्षांपूर्वी झालेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने एकही सामना जिंकला नाही. त्यांना शेवटच्या स्थानावर समाधान मानावे लागले. मात्र गेल्या चार वर्षांत संघाच्या कामगिरीत आमूलाग्र बदल झालाय.

2017 मध्ये या संघाने आशियाई चषकावर नाव कोरलं. गेल्या वर्षी आशियाई चषकात याच संघाने वर्ल्ड कपच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. इन्चॉन इथं झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला संघानं सुवर्णपदक पटकावलं.

भारतीय महिला हॉकी संघाने सातत्याने अडथळ्यांना पार करत नवनवी शिखरं सर करण्याचा सपाटा लावला आहे. दोन दिवसांपूर्वी भूवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर झालेल्या मुकाबलल्यात भारतीय संघाने एकजुटीने खेळ करत ऑलिम्पिक क्वालिफायरमध्ये अमेरिकेला नमवत टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याचा मान मिळवला.

Image copyright Hockey india
प्रतिमा मथळा भारतीय महिला हॉकी संघ

सलामीच्या लढतीत भारतीय संघाने अमेरिकेवर 5-1 असा विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात अमेरिकेने 4-0 अशी आघाडी मिळवली. सामना संपण्यासाठी 12 मिनिटं राहिलेली असताना सरासरी 5-5 अशी होती. त्यावेळी राणी रामपालने 48व्या मिनिटाला गोल करत कोंडी फोडली आणि भारताला विजय मिळवून दिला. या विजयासोबतच महिला हॉकी संघाने टोकियो तिकीटवारी पक्की केली.

दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ पिछाडीवर होता, मात्र सरासरीच्या बळावर भारतीय संघाने सामना 6-5 असा जिंकला. शेवटच्या क्षणापर्यंत भारतीय संघाने जिद्द सोडली नाही हे महत्त्वाचं.

प्रशिक्षक सेजोर्ड आणि आणि कर्णधार राणी रामपाल यांच्या प्रयत्नांसोबतच खेळाडूंचा आत्मविश्वास आणि एकमेकांमधील संवाद या विजयाचं वैशिष्ट्य ठरलं. दोन वर्षांपूर्वी जो संघ आत्मविश्वासाच्या अभावासाठी आणि विस्कळीत भासत असे तोच आता मजबूत झाला आहे.

राणीने या बदलासंदर्भात सांगितलं की, "मुद्दा आत्मविश्वासाचा होता. हा बदल एक दोन दिवसात झालेला नाही. अनेक वर्षांच्या परिश्रमाचं फळ आहे. आम्ही सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला आहे. आम्हाला पुढे मोठी मजल मारायची आहे. आता समोर कितीही मोठा संघ उभा ठाकला तरी त्यांना हरवू शकतो असा विश्वास आहे. आम्हाला आमच्या कौशल्यांवर विश्वास आहे."

बदलाची सुरुवात कशी झाली?

फेब्रुवारी 2017मध्ये संघाची स्थिती कशी होती हे समजून घेणं आवश्यक आहे. सेजोर्ड यांना संघाचं नेमकं काय बिनसलं आहे ते कळेना. मुलींकडे क्षमता आहे हे त्यांनी जाणलं होतं. शिस्तही होती. मेहनत करण्यासाठी त्या तयार होत्या हेही त्यांना समजलं. मात्र स्वत:चे विचार मांडण्याची वेळ आल्यावर या मुली मागे फिरत असत.

अडचण केवळ भाषेची नव्हती. मुद्दा संकोचाचा होता. आपल्याकडून चूक होऊ नये असं त्यांना वाटायचं. सामाजिक आणि सांस्कृतिक संस्कार यामुळेही त्यांना बोलताना दडपण येत असे.

त्यांच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे- प्रशिक्षकांचा आदेश ऐका आणि मैदानावर त्याची अंमलबजावणी करा. कोणताही प्रश्न या मुली विचारत नसत. कोणताही मुद्दा मांडत नसत.

सेजोर्ड यांच्यासाठी हे एक मोठं आव्हान होतं. त्यांनी कर्णधार राणीशी यासंदर्भात चर्चा केली. 24 वर्षांच्या राणीकडे आत्मविश्वास होता. वयाच्या 14व्या वर्षापासून ती भारताचं प्रतिनिधित्व करते आहे. आधुनिक हॉकी खेळाच्या गरजा तिला पक्क्या ठाऊक आहेत.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा हॉकी

सेजोर्ड आणि राणी यांनी एकत्र बसून संघासाठी कृती आराखडा आखला. संघातील सर्व खेळाडूंना बोलणं अनिवार्य करण्यात आलं. मानसशास्त्राचं सत्र आयोजित करण्यात आलं. संघभावना वाढीस लागावी यासाठी काही अॅक्टिव्हिटी योजण्यात आल्या.

संघाचं एकत्रित जेवण होऊ लागलं. नृत्य आणि कोरियोग्राफी यांचंही सत्र झालं. एकमेकींना समजून घेता यावं, आत्मविश्वास वाढावा, खुलेपणाने विचार मांडता यावेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले.

"सर्वांना एकत्र आणणं महत्त्वाचं होतं. कोरियाग्राफी आणि नृत्य आता संघासाठी फावल्या वेळातला उद्योग झाला आहे. प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफला बॉलीवूड गाण्यांवर नाचायला लावतो. खेळाडू स्वत:ही नाचतात. नृत्याने अवघडलेपण दूर झालं. दबून वावरणाऱ्या मुली खुलेपणाने बोलू लागल्या. आता याच मुली भारतीय तिरंग्याचं समर्थपणे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज आहेत," असं राणीने सांगितलं.

भारतीय हॉकी टीममधील महिलांना कधी पुरुषांइतकी प्रसिद्धी मिळत नाही. किंवा त्यांना त्या प्रमाणात एक्सपोजर देखील मिळत नाही. वर्ल्ड कप किंवा ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत खेळायचं म्हटलं तर तिथं एक्सपोजर आवश्यक असतं.

खेळाडूंसमोरची आव्हानं

राणीसमोर जी आव्हानं होती त्याबाबत सांगताना तिनं म्हटलं की, "जिंकणं ही आमची सवय व्हावी. नियमित सराव, एकाग्र मन आणि आत्मविश्वास या जोरावर तुम्हाला हे साध्य करावं लागतं. मोठ्या स्पर्धेत खेळून आणि जिंकून आमचा आत्मविश्वास वाढला आहे. आम्ही 2018 ला वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमध्ये पोहोचलो होतो. सेमी फायनलच्या आम्ही अगदी जवळ होतो."

भारताने 2017 मध्ये जपानमध्ये आयोजित एशिया कपमध्ये विजेतेपद मिळवलं होतं. या विजयानंतर 2018 ला लंडनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपच्या स्पर्धेत त्यांचं स्थानही पक्कं झालं होतं.

या टीममध्ये गोलकीपर सविता पुनियासारखी प्रतिभावान खेळाडू आहे. या व्यतिरिक्त ड्रॅग फ्लिकर गुरजीत कौर, नवनीत कौर, वंदना कटारिया आणि लालरिमसियामी या सारखे स्टार खेळाडूही टीममध्ये आहेत.

या खेळाडूंपैकी बहुतांशजण हे मध्यमवर्गीय गटातले आहेत. तसेच काही जण तर अशा आहेत, की ज्यांच्या कुटुंबाला जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा भारतीय महिला हॉकी संघाने अमेरिकेला नमवत टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याचा मान मिळवला

राणीच्या आई-वडिलांना वाटत होतं की तिने अभ्यास करावा, शिकावं आणि नोकरी करावी. हॉकीची किट घेणं तसेच बूट घेण्यासाठी देखील तिच्या कुटुंबीयांना खूप कष्ट उपसावे लागले होते. पण राणीचं कौशल्य पाहून तिला खेळू देण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

जेव्हा ती 13 वर्षांची होती तेव्हा तिने ज्युनियर इंडिया कॅंपमध्ये सहभाग घेतला होता. एकाच वर्षानंतर ती सिनियर टीममध्ये पोहोचली. भारताच्या सिनियर टीममध्ये प्रवेश मिळवणारी ती सर्वांत कमी वयाची खेळाडू ठरली. तिने आतापर्यंत भारतासाठी किमान 200 सामन्यात आंतराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केलं आहे.

राणीच्या अनुभवापेक्षा एकदम वेगळा अनुभव आहे तो गोलकीपर सविताचा. तिचे आजोबा महिंदर सिंग यांनी म्हटलं, की तू हॉकी शिक. त्यांच्या या आग्रहाला ती नकार देऊ शकली नाही. पण बसमधून हॉकी किट घेऊन हरियाणातून प्रवास करणं हे तिला खूप जिवावर येत होतं.

सविता सांगते, की माझं किट खूप जड होतं. बसमधून घेऊन जाताना मला खूप त्रास व्हायचा. मी थकून जायचे. पण हे सुरुवातीला झालं नंतर माझं या खेळावर प्रेम जडलं. ऑलिम्पिक आणि वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचा अनुभव अवर्णनीय होता.

सांघिक खेळामुळे बदल

क्वालिफायर सामन्यात गुरजीतने दर्जेदार खेळाचं प्रदर्शन केलं. तिनं ओपनिंग मॅचमध्येच दोन गोल केले. गुरजीतला पाहिलं तर ती खूप गंभीर वाटते पण तिच्या सेन्स ऑफ ह्युमरमुळे पूर्ण टीमचं वातावरण प्रफुल्लित राहतं, असं तिचे टीममेट सांगतात.

गुरजीत अमृतसर जवळच्या एका खेड्यातली आहे. तिला सरावासाठी रोज वीस किलोमीटरचा प्रवास करावा लागत असे. नंतर गुरजीतने तरनतारनच्या स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये अॅडमिशन घेतलं.

डिफेंडर गुरजीत सांगते, "मी बॉर्डरवर असलेल्या गावात राहते. तिथं खेळण्यासाठी काही सुविधा नाहीत. तिथं हॉकी कुणाला कळत नाही. मला या गोष्टीचा अभिमान वाटतो की देशासाठी प्रतिनिधित्व करणारी मी आमच्या गावातली पहिली खेळाडू आहे."

गुरजीत सांगते, की तिला सुरुवातीला ड्रॅग फ्लिकर बनावं वाटत नव्हतं. पण मी माझ्या स्किल्स वाढवल्या आणि टीममध्ये माझं स्थान पक्कं केलं. मला टीमसाठी आणखी चांगलं काही करायचं आहे.

या टीममधले खेळाडू समर्पित भावनेनं खेळतात. लालरेमसियामीच्या वडिलांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं. पण ती म्हणाली मला माझं कर्तव्य आधी पूर्ण करायचं आहे. तिच्या या कमिटमेंटचं सर्वांना विशेष कौतुक वाटलं. या गोष्टीचा तिने तिच्या खेळावर परिणाम होऊ दिला नाही आणि जपानमध्ये झालेल्या एफॉआईच स्पर्धेत भारताने विजय मिळवला.

या टीमच्या कोच मारजिने सांगतात, की आमचं स्वप्न हे ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकण्याचं आहे. सर्वांत सुंदर रंग हा सोनेरी असतो. ही पहिली पायरी आहे. हे सोपं नाही पण हे स्वप्न मोठं आहे. पण मला या मुलींच्या फायटिंग स्पिरिटचा अभिमान आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)