विराट कोहली : वाढदिवसाला स्वतःलाच लिहिलं भावूक पत्र

विराट कोहली Image copyright Getty Images

एकदा भारत-इंग्लंड मॅचदरम्यान विकेटकीपिंग करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीनं भर मैदानात विराट कोहलीला 'चिकू' अशी हाक मारली आणि मैदानावरच्या या 'अँग्री यंग मॅन'चं मैदानाबाहेरचं टोपणनाव जगजाहीर झालं.

आज ( 5 नोव्हेंबरला) 31वा वाढदिवस साजरा करणाऱ्या याच विराट कोहलीने पुन्हा एकदा मागे वळून या चिकूकडे पाहिलं आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यानं 15 वर्षांच्या या चिकूला एक पत्र लिहिलंय...

आतापर्यंतचा आपला प्रवास आणि त्या दरम्यान उमजलेल्या आयुष्याबद्दलच्या काही कानगोष्टी विराटने 15 वर्षांपूर्वीच्या लहान विराटला सांगितल्या आहेत. विराटने आज सकाळी हे पत्र ट्वीट केलंय.

विराट लिहितो, "हाय चिकू, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुला तुझ्या भविष्याबद्दल अनेक प्रश्न पडले असतील. माफ कर, पण त्यातल्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मी देणार नाहीये. कारण पुढे काय घडणार आहे, हे माहीत नसल्यास ते सरप्राईज अधिक छान होतं आणि प्रत्येक आव्हान एक थ्रिल देतं. आज तुला कदाचित हे समजणार नाही. पण ध्येयापेक्षा त्या ध्येयाकडे नेणारा प्रवास अधिक सुंदर असतो."

Image copyright Twitter

समोर आलेल्या संधी घ्यायला तयार रहा, असा सल्लाही विराटने या पत्रात दिलेला आहे. पण हे सांगतानाच विराट पुढे लिहितो, "तुझ्याकडे जे आहे, ते कायमच तुझ्यासोबत राहील असं गृहीत धरू नकोस. काहीही झालं तरी त्यातून पुन्हा उभा राहशील असं स्वतःलाच वचन दे. आणि पहिल्या प्रयत्नांत जर ते जमलं नाही, तर पुन्हा प्रयत्न कर. भविष्यात तुझ्यावर अनेक जण प्रेम करतील. अनेक जण तुझा दुस्वासही करतील. त्यातले काही लोक तर तुला ओळखतही नसतील. पण त्यांची पर्वा करू नकोस. स्वतःवर विश्वास ठेव."

डिसेंबर 2006 मध्ये विराट फक्त 18 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचं - प्रेम कोहली यांचं निधन झालं. विराट तेव्हा दिल्लीतल्या फिरोजशहा कोटला मैदानावर दिल्लीकडून कर्नाटकविरुद्ध रणजी सामना खेळत होता. मॅचच्या दुसऱ्या दिवशी विराट नाबाद 40 धावांवर खेळत होता. रात्री विराटला वडिलांच्या निधनाची बातमी समजली. पण तरीही टीमसाठी विराट मैदानात उतरला आणि त्याने 90 धावांची खेळी केली आणि आपल्या संघाचा पराभव टाळला. त्यानंतरच तो वडिलांच्या अंत्यसंस्कारांसाठी गेला.

आज स्वतःलाच लिहिलेल्या या पत्रात विराटने लहान चिकूला कुटुंबाचं महत्त्व सांगत नात्यांचा आदर करण्याची आठवण करून दिलीये.

Image copyright Twitter

विराट लिहितो, "बाबांनी आज शूज गिफ्ट दिले नाहीत याचं तुला वाईट वाटत असेल. पण आज सकाळी त्यांनी तुला जी मिठी मारली किंवा तुझ्या उंचीबद्दल जे विनोद केले, त्या क्षणांच्या तुलनेत शूज काहीच नाहीत. या क्षणांचा आनंद घे. तुला बाबा कधी कधी अतिशय कठोर वाटत असतील. पण त्यांना तुझं हितच हवंय. कधीकधी आपले पालक आपल्याला समजून घेत नाहीत, असंही तुला वाटत असेल. पण एकच लक्षात ठेव - फक्त तुझं कुटुंबच तुझ्यावर निर्व्याज प्रेम करेल. त्यांच्यावर प्रेम कर. त्यांचा आदर कर आणि शक्य तितका वेळ त्यांच्यासोबत घालव. बाबांना सांग ते तुला किती आवडतात ते. आज सांग, उद्या सांग. पुन्हा पुन्हा सांग."

या रणजी सामन्यानंतर विराटने मागे वळून पाहिलंच नाही. क्रिकेटमध्ये त्याची घोडदौड सुरू झाली. 19 वर्षांखालील भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन असताना त्यानं 2008 मध्ये देशाला अंडर 19 चा वर्ल्ड कप जिंकून दिला. आज तो भारताचा कसोटी क्रिकेटसाठीचा सर्वोत्कृष्ट कर्णधार आहे. एक खेळाडू म्हणून त्याच्या नावावर अनेक विक्रम जमा आहेत.

पण हे सगळं करण्यासाठी करावी लागलेली मेहनत आणि काही आवडत्या गोष्टींचा सोडावा लागलेला मोहदेखील विराटच्या या पत्रात दिसतो.

कारण 15 वर्षांच्या चिकूला विराटने न विसरता सांगितलंय, "मित्रा, त्या पराठ्यांचा मनमुराद आनंद घे. कारण येत्या काही वर्षांत हाच पदार्थ तुझ्यासाठी दुर्मिळ होणार आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)