उद्धव ठाकरे यांनी परळीमध्ये गोपीनाथ गडाला भेट दिली कारण...

उद्धव ठाकरे Image copyright Twitter

राज्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर असणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परळी वैजनाथ इथल्या गोपीनाथ गडाला भेट दिली. त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी रांगोळी साकारण्यात आली होती. यामध्ये शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण आणि भाजपचं निवडणूक चिन्ह कमळ यांची प्रतिकृती रांगोळीतून रेखाटण्यात आली होती.

राज्यात सत्ता स्थापनेवरून शिवसेना आणि भाजप यांच्यातील संबंध ताणलेले असताना उद्धव ठाकरे यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाला भेट देणं आणि ही रांगोळी यांची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

"ठाकरे यांचे मुंडे परिवाराशी संबंध चांगले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडेंच्या समाधीस्थळाला भेट देणं यात राजकीय मुद्दा नाही. सत्ता स्थापनेवरून संबंध ताणले गेले असले तरी गोपीनाथ गडाला भेट देण्यात राजकीय अर्थ नाही," असं राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांना वाटतं.

तर ज्येष्ठ पत्रकार सुजाता आनंदन यांना ही उद्धव यांची गोपीनाथ गडाला भेट हा राजशिष्टाचार आहे. त्याला काही राजकीय संदर्भ नाही, असं वाटतं.

मग सत्ता स्थापनेचं काय?

उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत, शेतकरी हवालदिल आहे अशा स्थितीत सत्ता स्थापनेसाठी पुढाकार का घेतला जात नाही, यावर देशपांडे सांगतात,

Image copyright Twitter

"डेडलाईन फिक्स करण्यासाठी भाजप नेत्यांची बैठक झाली. आम्ही आमच्या बाजूने सकारात्मक आहोत अशी त्यांची नेहमीच भूमिका होती. शिवसेनेने युती तोडली असं भाजपचं म्हणणं असतं. त्यामुळे आम्ही आता सरकार स्थापन करणार आहोत असा भाजपचा निर्णय झाला आहे. आता सरकारला पाठिंबा द्यायचा का विश्वासदर्शक ठरावात या सरकारचा पराभव करायचा याचा निर्णय शिवसेनेला घ्यायचा आहे.

भाजपने बॉल शिवसेनेच्या कोर्टात ढकलला आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर विश्वासदर्शक ठरावापर्यंत दोन्ही पक्षांना चर्चेसाठी कालावधी मिळेल. अधांतरी परिस्थिती फार काळ सुरू ठेवता येणार नाही म्हणून डेडलाईन भाजपने ठरवली."

तर सुजाता आनंदन यांच्यामते उद्धव ठाकरे सध्या विन विन स्थितीत आहेत.

त्या सागंतात, "उद्धव ठाकरे यांच्यासाठी विन-विन परिस्थिती आहे. ते राज्य सरकारमध्ये महत्त्वाची खाती पदरात पाडून घेऊ शकतात. कदाचित त्यांच्या पक्षाला मुख्यमंत्रिपद मिळू शकतं. त्यांनी सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा दिला नाही आणि सरकार पडलं तरी त्यांची प्रतिमा उंचावणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे लक्ष एकवटलं आहे. शिवसेनेने राम मंदिर आणि हिंदुत्व मुद्दे घेऊन चूक केली. कारण मराठी माणूस आणि महाराष्ट्र हा त्यांचा युएसपी आहे. त्याकडे त्यांनी लक्ष देण्याऐवजी भाजपच्या मुद्यांना हात घातला आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)