महिला तहसीलदाराला पेटवून दिलं: नेमकं त्या कार्यालयात काय घडलं?

విజయారెడ్డి Image copyright UGC
प्रतिमा मथळा విజయారెడ్డి

पेट घेतलेली एक व्यक्ती मंडल रेव्हेन्यू ऑफिसच्या (MRO) दारातच कोसळली. मदतीसाठी याचना करणारा तो देह काही क्षणातच जमिनीवर निपचित पडला. आगीची तीव्रता इतकी होती, की अगदी काही वेळातच त्या आर्त किंकाळ्या हवेत विरून गेल्या.

सरकारी ऑफिसमध्ये पेटलेल्या अवस्थेत मदतीसाठी हाका देणारी व्यक्ती दुसरीतिसरी कुणी नसून आपल्या MRO मॅडम आहेत, हे कळायला कर्मचाऱ्यांना काही मिनिटं लागली. कारण जे घडलं ते अचानक घडलं आणि खूपच धक्कादायक होतं.

तेलंगणाच्या रंगरेड्डी जिल्ह्यातील अब्दुल्लापूरमेट विभागाच्या तहसीलदार विजया रेड्डी या सोमवारी (4 नोव्हेंबर) त्यांच्या चेंबरमध्ये बसल्या होत्या. दुपारी दीडच्या सुमारास के. सुरेश नावाची व्यक्ती त्यांच्या चेंबरमध्ये घुसली.

त्यानं स्वतःबरोबर विजया यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिलं. आगीचा डोंब उसळताच सुरेश चेंबरबाहेर पळाला. विजया रेड्डीसुद्धा मदतीची याचना करत बाहेर धावल्या.

आग विझवण्यासाठी कर्मचारी धावपळ करत होते. त्यांच्या अंगावर ब्लँकेट टाकण्यात आलं. आग विझवली. त्या श्वास घ्यायचा प्रयत्न करत होत्या. मदतीसाठी याचना करत रडत होत्या. पण अत्यंत गंभीर स्वरूपात भाजल्यामुळे त्यांनी जागीच प्राण सोडले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे.

प्रतिमा मथळा तहसील कार्यालय

त्यांना वाचवायला धावलेले विजया यांचे कर्मचारी चंद्रिया आणि चालक गुरुनाथम या आगीत चांगलेच होरपळले. त्यांना हयातनगर येथील एका हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. उपचारादरम्यान गुरुनाथम यांचाही मृत्यू झाला.

सुरेश साठ टक्के भाजलेल्या अवस्थेत रस्त्यावर फिरत होता. पोलिसांनी घटनास्थळी तातडीनं धाव घेतली आणि सुरेशला अटक केली. त्याला सध्या उपचारांसाठी रुग्णालयात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती राचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी दिली.

सुरेशनं एकट्यानं हे कृत्य केलं की त्याला यामध्ये कुणाची साथ होती याचाही पोलीस तपास करत असल्याचं आयुक्तांनी सांगितलं. आपल्या ऑफिसमध्ये नेमकं काय घडलं ते अद्याप लोकांना उमजलेलं नाही. लोक अजूनही धक्क्यातून सावरले नाहीयेत.

कोण होत्या विजया रेड्डी?

मृत तहसीलदाराचं पूर्ण नाव पुट्टा विजया रेड्डी असं होतं. त्यांचे पती सुभाष रेड्डी हे पदवी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्य आहेत.

विजया रेड्डी मूळच्या नालगोंडा जिल्ह्यातील मुनीक्कोडू मंडलम कलवालपल्ली गावच्या होत्या. त्या पेशानं शिक्षिका होत्या. त्यांनी 2009 मध्ये गट-2 मधून सरकारी नोकरीला सुरुवात केली होती. तहसीलदार पदावर त्या गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत होत्या.

के सुरेश आहे कोण?

प्रतिमा मथळा सुरेश

सुरेश रंगरेड्डी जिल्ह्यातल्या गोरेल्ली गावचे रहिवासी आहे. गोरेल्लीचे गावकरीही या घटनेने हादरून गेले आहेत. 4 नोव्हेंबरला संध्याकाळी गावात पोलीस धडकल्यापासून इथलं वातावरण ढवळून निघालं आहे.

सुरेशचे वडील कृष्णा आणि त्यांच्या अन्य कुटुंबीयांची पोलिसांनी चौकशी केली. कृष्णा यांनी म्हटलं, की "माझ्या मुलाची मानसिक स्थिती ठीक नाही. गेल्या सहा महिन्यांपासून तो दारूच्या आहारीही गेला आहे. आमचा जमिनीचा वाद मी आणि माझा भाऊ पाहतो आहे. सुरेश MRO कार्यालयात का गेला, ते मलाही समजलेलं नाही."

गावकऱ्यांनीही सुरेशच्या या कृत्यावर संताप व्यक्त केला आहे.

"सुरेशला या कृत्यासाठी कधीही माफी मिळता कामा नये. तो अत्यंत स्वार्थीपणे वागला आहे. त्यानं त्याच्या कुटुंबीयांचासुद्धा विचार केला नाही," अशा शब्दांत एका गावकऱ्यानं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

लाच घेतल्याच्या आरोपांची चर्चा

सुरेशच्या कुटुंबीयांनी जमिनीचा वाद मिटवण्यासाठी लाच दिली असल्याची चर्चा गावात रंगली होती. जमिनीच्या वादाचे हे तपशील माहीत असल्याचा दावाही काही ज्येष्ठ गावकऱ्यांनी केला आहे. परंतु त्यांनी बोलण्यास नकार दिला.

प्रतिमा मथळा गुरुनाथन

गोरेल्ली गावचे सरपंच मल्लेश यांनी बीबीसी तेलुगुशी संवाद साधला. त्यांनी म्हटलं, "सुरेशचं कुटुंब अनेक वर्षांपासून या जमिनीचा वाद सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या माहितीप्रमाणे जमीन त्यांची आहे. पण त्यांच्याबाजून निकाल लागला नाही. त्यामुळे सुरेश निराश झाला असावा. पण मला कोर्टात काय झालं ते नेमकं माहीत नाहीये."

पोलिसांनी सुरेशवर भारतीय दंड विधानाच्या कलम 302 (खून) आणि 307 (एखाद्या व्यक्तीचा मृत्यू ओढवावा, असं कृत्य करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

विजया रेड्डी यांच्यावर हैदराबाद येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

तीन दिवसांचा बहिष्कार

तेलंगणा महसूल कर्मचारी संघटनेनं या घटनेचा निषेध कऱण्यासाठी तीन दिवस कामावर बहिष्कार घातला आहे.

TRSAचे अध्यक्ष रवींदर रेड्डी वांगा बीबीसी तेलुगुशी बोलताना म्हटलं, "सरकारी कार्यालयात अशा प्रकारचा हल्ला होणं अतिशय दुर्दैवी आहे. कलम 144 लागू करण्याचे अधिकार असलेल्या दंडाधिकाऱ्यावर असा हल्ला होणं अतिशय धक्कादायक आहे. महसूल अधिकाऱ्यांना यापूर्वी अनेकदा लक्ष्य करण्यात आलेलं आहे. गेल्या दोन वर्षांत अशा प्रकारच्या 15 घटना महसूल अधिकाऱ्यांच्या बाबतीत घडल्या आहेत."

महसूल अधिकाऱ्यांवर रोष का?

घटनास्थळी जमलेल्या अनेक महसूल अधिकाऱ्यांनी बीबीसी तेलुगुशी नाव न सांगण्याच्या अटीवर संवाद साधला. त्यांनी म्हटलं की, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्याकडून सातत्यानं महसूल अधिकाऱ्यांविषयी विधानं केली जातात.

"महसूल विभागात भ्रष्टाचार बोकाळला आहे, अशी विधानं ते नेहमी करत असतात. भ्रष्टाचार नाहीच असं आमचं म्हणणं नाही. परंतु राज्याचे प्रमुख जेव्हा सार्वजनिक ठिकाणी भ्रष्टाचारी महसूल अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाईबद्दल बोलतात तेव्हा आमच्याबद्दल नकारात्मकता पसरत असते. कठोर परिश्रम करणारे अधिकारीही आहेत. लोकांमध्ये अशी वक्तव्य करून अशा घटनांना हेच लोक आमंत्रणं देतात,'' असं मत एका एमआरओंनी व्यक्त केलं.

टीआरएसएचे अध्यक्ष रवींदर रेड्डींनी म्हटलं, की मुख्यमंत्र्यांबरोबरच केंद्रीय मंत्री, आमदारसुद्धा अशाच प्रकारची वक्तव्य करत असतात. सोशल मीडियावरून पसरवत असतात. त्यामुळेच अशा घटना घडतात.

"2017 साली जमिनीचे अभिलेख सुधारणे आणि ते नव्यानं तयार करणे याबाबत घोषणा करण्यात आली. आम्ही या नोंदींसाठी दिवसरात्र काम केले आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिलेल्या वेळेआधीच आम्ही हे काम पूर्ण केलं. ज्या जमिनींचे वाद सुरू आहेत त्यांची 'ब' अशी वेगळी श्रेणी केली. सरकारबरोबर असलेल्या वादग्रस्त जमिनींचा यात समावेश आहे. त्यातल्यासुद्धा 95 टक्के वादांबाबत निकाल देण्यात आलेले आहेत. काही केसचा मात्र अनेक वर्षांत कोर्टातही निकाल लागू शकलेला नाही. ते वाद सोडवण्याचाही आम्ही जोरदार प्रयत्न करत आहोत. कामाचा ताण सहन न झाल्यानं आमच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू ओढवला होता," असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

"आमच्यावर जेव्हा भ्रष्टाचाराचा आरोप होतो, तेव्हा लोकांना वाटतं सगळेच भ्रष्टाचारी आहेत. खरं तर आमच्याकडे पुरेसे कर्मचारीबळच नाही.''

सध्या तरी कामावर तीन दिवसांचा बहिष्कार घालण्यात आला आहे, यासंदर्भात भविष्यात पुढे काय करायचे ते ठरवण्यासाठी बुधवारी (6 नोव्हेंबर) संध्याकाळी बैठक घेण्यात येणार आहे.

महसूल विभागाचा पोर्टफोलिओ मुख्यमंत्री पाहात आहेत. सीएमओंचे निवेदन सोमवारी (4 नोव्हेंबर) रात्री वाचण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला असून गुन्हेगाराविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)