चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार राज्यपालांना भेटणार, उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदारांची बैठक

भेटी

सत्ता स्थापनेच्या मुद्द्यावरून राज्यात भेटीगाठी आणि वक्तव्यांचं सत्र सुरू आहे.

मोठा पक्ष म्हणून भाजपनं सत्ता स्थापन करावी, उद्धव ठाकरेंना भाजपकडून कुठलाही प्रस्ताव आलेला नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय.

शिवसेनेनं उद्या त्यांच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. उद्या सकाळी 11 वाजता मातोश्रीवर ही बैठक बोलावण्यात आली आहे.

उद्या भाजप नेते राज्यपालांना भेटून 145 आमदारांची यादी देणार असतील तर चांगलं आहे आम्ही त्याचं स्वागतच करू, असं राऊत म्हणालेत.

काँग्रेसच्या तरुण आमदारांचं मनोगत मी वाहिन्यांवर ऐकलं आहे, त्याच्या नेतृत्वानं निर्णय घ्यावा, असंही राऊत यांनी म्हटलंय.

"सुधीर मुनगंटीवार यांची गोड बातमी म्हणजे भाजपच सांगेल की शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल," असं सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

भाजप नेते राज्यपालांना भेटणार

मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यावेळी भाजपचे राज्यातले प्रमुख नेते उपस्थित होते.

यावेळी भाजप प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटींवार उद्या राज्यपालांच्या भेटीला जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच 31 डिसेंबरपर्यंत भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड होईल, असं सुधीर मुनगंटीवर यांनी सांगितलं आहे.

"सरकार महायुतीचच होईल तसंच जी काही नाराजी आहे ती दूर होईल, अंधेरा छटेगा, महायुतीचं सरकार येईल," असंही मुनगंटीवार यांनी यावेळी म्हटलंय.

भाजपचा मुख्यमंत्री नको - दलवाई

कुठल्याही स्थितीत राज्यात भाजपचं सरकार येऊ नये, भाजपचा मुख्यमंत्री होऊ नये यासाठी शरद पवार आणि सोनिया गांधींनी प्रयत्न करावेत असं, काँग्रेस खासदार हुसेन दलवाई यांनी म्हटलंय.

दलवाई यांनी सामनाच्या कार्यालयात जाऊन संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

"आम्ही भाजपचा मुख्यमंत्री होऊ नये म्हणतो म्हणजे याचा अर्थ बराच आहे, भाजप पेक्षा शिवसेना ठिक आहे," असं सूचक वक्तव्य हुसेन दलवाई यांनी केलं आहे.

भाजप-शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक

भाजप आणि शिवसेनेच्या मंत्र्यांची मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. यावेळी शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा झाल्याचं दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी म्हटलंय.

पण या बैठकीनंतर पुन्हा एकदा 'गोड बातमी लवकरत येईल' असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. तसंच शरद पवारांच्या वक्तव्याचं स्वागत करत असल्याचं त्यांनी म्हटलंय.

जनादेश शिनसेना-भाजपला मिळाला आहे, असं शरद पवार यांनी म्हटलंय.

योग्यवेळी महाराष्ट्रात सरकार स्थापन होईल, महाराष्ट्र पुरोगामी आहे, इथं वेगवेगळ्या पक्षाते नेते एकमेकांना भेटत असतात, असं संजय राऊत यांनी पवारांच्या घेतलेल्या भेटीवर मुनगंटीवर म्हणालेत.

'वाघ कुठलाही असो कुणाचाही असो संरक्षण-संवर्धन होणारच', असं सूचक वक्तव्य सुद्धा त्यांनी यावेळी केलं आहे.

अहमद पटेल यांनी नितीन गडकी यांची नवी दिल्लीत भेट घेतली त्यावर "गुजरातमधले रस्ते चांगले व्हावे यासाठी अहमद पटेल हे गडकरींना भेटले," असं स्पष्टीकरण मुनगंटीवारांनी दिलं आहे.

तर "आजची बैठक ही ओल्या दुष्काळासंबधी होती. ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालय त्यांना २५ हजार हेक्टरी मदत मिळाली पाहीजे ही भूमिका उध्दव ठाकरेंची आहे. ती आम्ही बैठकीत मांडली. मुख्यमंत्री या मदतीसंदर्भात सकारात्मक आहेत," असं शिवसेना नेते रामदास कदम यांनी सांगितलं.

"सत्तास्थापनेचा कोणताही संदेश मातोश्रीवर घेऊन जाण्याचा प्रश्न नाही. आजचा विषय हा दुष्काळाचा होता. सत्तास्थापनेचा निर्णय उध्दव ठाकरेंचा आहे," असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

कुठलाही निर्णय काँग्रेसला बरोबर घेऊनच : शरद पवार

लोकांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोधात बसण्याचा कौल दिला आहे. भाजप आणि शिवसेनेने लवकरात लवकर एकत्र येऊन सरकार स्थापन करावं, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

त्याचवेळी कुठलाही निर्णय काँग्रेसला बरोबर घेऊनच करू असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठी आणि तर्क-वितर्कांचं सत्र सुरू आहे. बुधवारी सकाळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर भेट घेतली. अवघ्या दहा मिनिटांत ही भेट आटोपली. तेव्हा "संजय राऊत हे कोणताही प्रस्ताव घेऊन आले नव्हते. ते नेहमी मला भेटत असतात, तसेच भेटायला आले होते," असं ते म्हणाले.

भाजप-शिवसेनेनं सत्ता स्थापनेचा दावा केला नाही तर राष्ट्रवादीची भूमिका काय असेल, या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार यांनी म्हटलं, की "आम्हाला काही भूमिका नाही. आमच्याकडे आकडेच नाहीत. आकडे असते तर आम्हीच सरकार स्थापन केलं असतं, वाट पाहिलीच नसती."

शरद पवार मुख्यमंत्री बनणार का, या प्रश्नाचं उत्तर शरद पवारांनी नकारार्थी दिलं. चार वेळा मुख्यमंत्री बनल्यानंतर आता मला याची आवश्यकता वाटत नाही, असं त्यांनी म्हटलं.

शरद पवार यांनी मुंबईत घेतलेल्या या पत्रकार परिषदेतली काही ठळक मुद्दे -

  • राज्याच्या परिस्थितीबद्दल बोलण्यासारखं अद्याप काही नाही. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला महाराष्ट्राच्या जनतेनं कौल दिला आहे. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर एकत्र येऊन सरकार स्थापन करावं. राज्यात घटनात्मक पेच निर्माण होऊ देऊ नये. 
  • काँग्रेस-राष्ट्रवादीला लोकांनी विरोधात बसण्याचा कौल दिला आहे. ती जबाबदारी आम्हाला समर्थपणे पार पाडण्याची संधी भाजप-शिवसेनेनं सरकार स्थापन करून द्यावी एवढीच माझी अपेक्षा आहे.
  • संजय राऊत हे कोणताही प्रस्ताव घेऊन आले नव्हते. ते नेहमी मला भेटत असतात, तसेच भेटायला आले होते.
  • 2014 साली भाजपनं सरकार स्थापनेचा दावा केला होता. आता कोणी सरकार स्थापनेचा दावाच केला नाही. पाठिंबा कोणाला देणार?
  • अतिवृष्टीनं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची जी अवस्था झाली आहे का, याची पाहणी मी केली. शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, त्यांना कर्जमाफी मिळावी अशी विनंती मी केंद्र सरकारला करणार आहे.
  • शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी विमा उतरवला आहे. विमा कंपन्या पूर्णपणे आपली जबाबदारी उचलताना दिसत नाहीयेत. तातडीनं या सर्व विमा कंपन्यांची बैठक बोलावून त्यांना मार्गदर्शक तत्त्वं देण्याची गरज.
  • अयोध्येचा निकाल लागल्यानंतर समाजाच्या कोणत्याही घटकानं हा निकाल आपल्याविरोधात आहे, अशी भूमिका घेऊ नये.

पण या भेटीमुळे शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस असं सत्ता समीकरण पहायला मिळणार का, हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी ही 'सदिच्छा भेट' असल्याचं सांगितलं.

"राज्यातील अस्थिर परिस्थितीबाबत शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली. राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावं, अशी इच्छा शरद पवार यांनी व्यक्त केली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधात बसण्याचा जनादेश आहे, या भूमिकेवर पवार ठाम आहेत," असंही राऊत यांनी सांगितलं.

मात्र शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जाणार की भाजपसोबत, या मुद्द्यावर राऊत यांनी मौन बाळगलं.

राजकीय भेटीगाठी

काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांनीही शरद पवार यांची भेट घेतली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे हे मुंबईत असून तेदेखील शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दिल्लीतही एक महत्त्वाची भेट घडून आली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. अर्थात, या भेटीत आपण महाराष्ट्रातला 'म'देखील उच्चारला नसल्याचं अहमद पटेल यांनी स्पष्ट केलं. ही भेट रस्ते आणि शेतीच्या प्रश्नांसंदर्भात होती, असं पटेल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

या भेटीविषयी पत्रकार परिषदेत पवारांना विचारलं असता, "मी यावर काय बोलू. ते तर त्यांना जाऊन विचारा," असं ते म्हणाले.

Image copyright Getty Images

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येणार का, या प्रश्नावर बीबीसी मराठीशी बोलताना महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहायक संपादक विजय चोरमारे यांनी म्हटलं होतं, की शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

"असं एक समीकरण आकाराला येऊ शकतं याचा अंदाज निवडणुकीच्या आधीपासून होता. शिवसेनेशिवाय राज्यात कोणाचीच सत्ता स्थापन होऊ शकत नाही. मग शिवसेना-भाजप जर एकत्र येऊ शकत नसतील तर शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन काँग्रेस बाहेरून पाठिंबा देऊ शकते. काँग्रेसची द्विधा मनस्थिती असली तरी शरद पवार काँग्रेस नेतृत्वाला पटवून देऊ शकतात," असं चोरमारे यांनी सांगितलं.

काँग्रेससमोर मात्र अडचण?

दैनिक लोकमतचे वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान यांचं मात्र म्हणणं आहे की काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याची अजिबात शक्यता नाही.

"शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असं समीकरण राज्यात आकारास येऊ शकतं असं मला वाटत नाही. राष्ट्रवादी आणि शिवसेना वेळप्रसंगी एकत्र येऊ शकतात. अर्थात त्यात सुद्धा काही घटक दुरावण्याची राष्ट्रवादीसाठी रिस्क असणारच. तरी महाराष्ट्राच्या अभिमानाचा मुद्दा, दिल्लीपुढे झुकणार नाही ही जी लाईन आहे, त्या भूमिकेवर हे दोन्ही पक्ष एकमेकांशी मैत्री करू शकतात. पण काँग्रेसला शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारला बाहेरून पाठिंबा देणं सुद्धा अडचणीचं ठरू शकतं," असं प्रधान सांगतात.

Image copyright Getty Images

मात्र शिवसेनेला पाठिंबा देणं राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसला अडचणीचं ठरू शकतं असं विश्लेषण संदीप प्रधान यांनी केलं.

"15 नोव्हेंबरनंतर अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अपेक्षित आहे. जर राममंदिराच्या अनुकूल असा निकाल लागला तर सत्ताधारी शिवसेना जल्लोष करतीये आणि त्याच वेळी काँग्रेस कदाचित हा निकाल स्वीकारताना वेगळी भूमिका घेत आहे, असं चित्र निर्माण होईल, तेव्हा देशभरात काँग्रेस काय उत्तर देणार? महाराष्ट्रात शिवसेनेला कुठल्या गोष्टीसाठी पाठिंबा दिला हे सांगणार?"

"पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांमध्ये ज्या ठिकाणी आगामी काळात निवडणुका होणार आहेत तिथे काँग्रेसला याची किंमत मोजावी लागू शकते. अगोदरच तोळामासा झालेली काँग्रेस, शिवसेनेसारख्या 1992-93 च्या दंगलीचा इतिहास मागे असलेल्या पक्षाला जर पाठिंबा देईल तर त्यांना त्याची देशभर उत्तरं द्यावी लागतील."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)