Section 144: अयोध्या निकालासाठी मुंबईसह देशात लागू केलेला जमावबंदीचा कायदा नेमका काय?

बाई

अयोध्या निकालानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून देशभरात ठिकठिकाणी कलम 144 लागू करण्यात आलं आहे.

एखाद्या परिसरातली शांतता भंग होऊ नये, यासाठी 4 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्याला मज्जाव घातला जातो. त्यालाच जमावबंदी म्हणतात.

बाबरी मशीद-राम जन्मभूमी या जमीन वादाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर अयोध्या, दिल्ली, मुंबईसह देशभरात अनेक ठिकाणी दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी कलम 144 लागू करण्यात आलं आहे. यालाच जमावबंदीचा आदेश किंवा कर्फ्यू असंही म्हणतात.

पण जमावबंदीचा हा कायदा नेमका आहे?

काय आहे कलम 144?

  • कलम 144 हे CrPC म्हणजेच The Code of Criminal Procedure (CrPC) मधील कलम आहे. यालाच मराठीत फौजदारी दंडसंहिता म्हणतात. एखाद्या परिसरात जमाव एकत्र येऊन तिथली शांतता भंग करून दंगल माजवण्याची शक्यता असते, अशा ठिकाणी हे कलम लागू करतात. सोप्या शब्दात सांगायचं तर जमावाने एकत्र येत कायदा हातात घेऊन हिंसाचार घडवू नये, यासाठी हे कलम लावलं जातं.
  • या कलमाला जमावबंदी किंवा संचारबंदी किंवा कर्फ्यू असंही म्हणतात.
  • जमावबंदी लागू असताना चार किंवा त्याहून जास्त लोकांनी एकत्र येण्यावर बंदी असते. कलम 144 लागू असलेल्या परिसरात हत्यारांची ने-आण करण्यावरही बंदी असते.
  • जिल्हाधिकारी, जिल्हा न्याय दंडाधिकारी किंवा इतर कार्यकारी दंडाधिकारी नोटिफिकेशन जारी करून जमावबंदीचे आदेश देऊ शकतात.
प्रतिमा मथळा जमावबंदी लागू झाल्यावर चार किंवा त्यापेक्षा जास्त माणसं एकत्र जमू शकत नाहीत.
  • वर उल्लेख केलेले अधिकारी एखाद्या विशिष्ट परिसरातील कुठल्याही व्यक्तीला किंवा तिथल्या लोकांना किंवा त्या भागाला भेट देणाऱ्या लोकांना नोटीस बजावून एखादी कृती करण्यापासून रोखू शकतात. अर्थात अशी नोटीस बजावण्यासाठी काही नियम आणि अटी आहेत.
  • कलम 144 चं उल्लंघन करणाऱ्या किंवा पालन न करणाऱ्याला पोलीस अटक करू शकते. कलम 107 किंवा कलम 151 अंतर्गत ही अटक करता येते. कलम 144 अंतर्गत वर्षभराच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. मात्र, हा जामीनपात्र गुन्हा असल्याने अटक झाल्यावर जामीन मिळू शकतो.
  • या कलमांतर्गत कोणत्याही परिसरात 2 महिन्यांसाठी जमावबंदीचे आदेश दिले जाऊ शकतात. सध्या अयोध्येतही दोन महिन्यांसाठी कलम 144 लागू करण्यात आले आहे. दोन महिन्यांनंतर नव्याने जमावबंदीचे आदेश देता येतात. मात्र नागरिकांच्या जिवाला धोका आहे किंवा दंगलीची शक्यता असल्यास सरकार 6 महिन्यांसाठीदेखील जमावबंदीचे आदेश देऊ शकते.

सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठासमोर सलग 40 दिवस झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने 16 ऑक्टोबर रोजी निकाल राखून ठेवला होता. तेव्हापासून अयोध्येत दोन महिन्यांसाठी कलम 144 लागू करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशातील शाळा, कॉलेज, प्रशिक्षण केंद्र शनिवारपासून सोमवारपर्यंत बंद राहणार आहेत.

मुंबई आणि उपनगरांमध्येही आज सकाळी 11 वाजेपासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे शहरभरात पोलीस बंदोबस्त वाढला आहे.

प्रतिमा मथळा जमावबंदी लागू झाल्यानंतर लोकांच्या एकत्र येण्यावर निर्बंध असतात

विशेष म्हणजे, मुंबईत गेल्या पाच महिन्यात पाच वेळा जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

जुलै

जुलै महिन्यात कर्नाटकात सत्ता स्थापनेचा तिढा निर्माण झाला होता. त्यावेळी काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे बंडखोर आमदार मुंबईतल्या पवई भागातल्या हॉटेल रेनायसन्समध्ये थांबले होते. काँग्रेसचे नेते आणि कर्नाटकचे मंत्री डी. शिवकुमार यांनीही त्याच हॉटेलमध्ये बुकिंग केलं. मात्र, त्यानंतर त्यांचं बुकिंग रद्द करण्यात आलं होतं. त्यावेळी पवई परिसरात जमावबंदीचे आदेश देण्यात आले होते.

ऑगस्ट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ऑगस्ट महिन्यात EDने (अंमलबजावणी संचलनालय) तब्बल साडे आठ तास चौकशी केली होती. त्यावेळीसुद्धा मुंबईतल्या काही भागांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला होता.

सप्टेंबर

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी आपण स्वतः EDपुढे हजर राहणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केल्यावर शहरातल्या काही भागात संचारबंदी लागू करण्यात आली होती.

प्रतिमा मथळा खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदी लागू करण्यात येते.

ऑक्टोबर

ऑक्टोबरमध्ये आरेमधल्या मेट्रो कारशेडसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर कारशेडच्या ठिकाणी अनेक पर्यावरणप्रेमी जमू लागले होते. त्यावेळीदेखील मुंबईतल्या या परिसरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते.

नोव्हेंबर

आणि आता नोव्हेंबरमध्ये बाबरी मशीद-राम जन्मभूमी खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर असामाजिक तत्त्वांकडून कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, यासाठी संपूर्ण मुंबई आणि उपनगरांमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)