अयोध्या निकाल: सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय हिंदू श्रद्धांना प्राधान्य देणारा

निकाल अयोध्येचा

'रामजन्मभूमी - बाबरी मशीद : ए हिस्टॉरियन्स रिपोर्ट टू द नेशन' नावाचा अहवाल लिहिणाऱ्या पथकामध्ये प्राध्यापक डी. एन. झा देखील होते. हा अहवाल सरकारला देण्यात आला आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालातही याचा उल्लेख आहे.

४ स्वतंत्र इतिहासकारांच्या या टीमने हा अहवाल तयार केला. यामध्ये प्रा. सूरज भान, अथार अली, आर. एस. शर्मा आणि डी. एन. झा होते. बाबरी मशिदीच्या खाली आढळलेले अवशेष एका हिंदू मंदिराचे आहेत हा दावा या पथकाने ऐतिहासिक आणि पुरातत्त्व पुराव्यांचा अभ्यास करून फेटाळून लावला होता.

सुप्रीम कोर्टाच्या निकालावर त्यांची प्रतिक्रिया :

आजच्या या निकालाकडे तुम्ही कसं पाहता?

हा निकाल हिंदू श्रद्धांना प्राधान्य देणारा आणि अपूर्ण अशा पुरातत्त्वशास्त्रावर आधारित आहेत. थोडक्यात सांगायचं तर हे अतिशय निराशाजनक आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा अयोध्या

'रामजन्मभूमी - बाबरी मशीद : ए हिस्टॉरियन्स रिपोर्ट टू नेशन' या तुमच्या शोध अहवालात काय निष्कर्ष काढण्यात आला होता?

बाबरी मशीद पाडण्यात येण्याआधी १९९२मध्ये आम्ही हा अहवाल सरकारला सादर केला होता. तेव्हा उपलब्ध असणाऱ्या सगळ्या पुराव्यांचा आम्ही अभ्यास केला होता. सखोल तपासणी केल्यानंतर आम्ही हा निष्कर्ष काढला होता की त्या मशीदीखाली राम मंदिर नाही.

ASI ने आणखीन काय करायला हवं होतं, असं तुम्हाला वाटतं?

अयोध्या प्रकरणातली पुरातत्त्व खात्याची भूमिका नेहमीच संशयास्पद राहिली आहे. मशीद पाडण्यात येण्याआधी आम्ही अयोध्येतल्या पुरातन गोष्टी पाहण्यासाठी 'पुराना किला' ला गेलो होतो. पण पुरातत्त्व खात्याने आम्हाला महत्त्वाचे पुरावे असणारी 'चौथे ट्रेंच' ही यांची त्या परिसराबद्दलची वही पाहू दिली नाही.

हा पुरावे दाबण्यासारखा प्रकार होता. बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर पुरातत्त्व खात्याच्या अधिपत्याखाली पूर्वहेतूनं खोदकाम काम करण्यात आलं. मंदिराच्या दाव्याला विरोध करणारे पुरावे यामध्ये दाबून टाकण्यात आले. एखाद्या ठिकाणी खोदकाम करताना पुरातत्त्व खात्याने वैज्ञानिक धोरणं पाळणं गरजेचं असतं.

या निकालाचा भारताच्या दृष्टीने अर्थ काय?

हा निकाल बहुसंख्यतावादाला बळ देणारा असून हे देशाच्या दृष्टीने चांगलं असू शकत नाही.

(प्राध्यापक डी. एन. झा हे एक विख्यात इतिहासतज्ज्ञ आहेत. प्राचीन आणि मध्ययुगीन भारताविषयी त्यांचा गाढा अभ्यास आहे. दिल्ली विद्यापीठात ते इतिहासाचे प्राध्यापक होते आणि ते 'इंडियन काऊन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च'चे सदस्य आहेत. त्यांनी व्यक्त केलेली मतं ही त्यांची वैयक्तिक मतं आहेत. )

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)