अयोध्याः न्यायालयात रामलल्लाचं प्रतिनिधित्व करणारा माणूस

राम Image copyright Mansi thapliyal

भारतातील सर्वांत वादग्रस्त खटल्यामध्ये त्रिलोकीनाथ पांडे यांनी भगवान रामाचं प्रतिनिधित्व केलं होतं.

रामाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी अनेक दशकं ते कोर्टरूममध्ये येत राहिले.

कोर्टाच्या कागदपत्रांमध्ये त्रिलोकीनाथ पांडे यांचं वर्णन 'रामलल्लाचे मित्र' असा करण्यात आला आहे. अयोध्येतल्या मंदिराच्या प्रकरणामध्ये स्वतः हिंदू देवता रामच याचिकाकर्ते होते.

देवाचं प्रतिनिधित्व करणं हे अत्यंत महान काम होतं. कोट्यवधी हिंदूंमधून माझी निवड झाल्यामुळे मला आनंद झाला आणि अभिमान वाटला, अशा भावना 75 वर्षांच्या पांडे यांनी बीबीसीकडे व्यक्त केली.

अनेक शतकं भारतात देवाला 'न्यायालयीन व्यक्ती' म्हणून वागवलं गेलं आहे. कारण अनेक भक्त देवाच्या नावानं देवस्थानाला जमीन अर्पण करतात. देवाच्या ताब्यातल्या या संपत्तीसंदर्भातील व्यवस्था साधारणतः भक्त किंवा त्या देवस्थानाचे व्यवस्थापक पाहातात. अशा व्यक्तींना कायदेशीर कागदपत्रांमध्ये 'देवाचे मित्र' म्हणून संबोधलं जातं.

पण देवाचं सर्वाधिक हित कशात आहे हे ते कसं ठरवतात? आणि त्या व्यक्तीला देवाचं सर्वांत जास्त हित कशात आहे याची इतकी खात्री कशी असू शकते?

Image copyright Mansi thapliyal
प्रतिमा मथळा त्रिलोकीनाथ पांडे

अनेक मुद्द्यांची कायद्यानुसार व्याख्या तयार नाही. त्यामुळे अशा मुद्द्यांच्या त्या-त्या खटल्याच्यावेळेस विचार केला जातो. जोपर्यंत दुसरी एखादी व्यक्ती स्वतःला देवाचा 'बेस्ट फ्रेंड' म्हणून समोर येत नाही तोपर्यंत कोणताही वादाचा मुद्दा नसतो. थोडक्यात देवाचे सर्वाधिकार त्या मित्राकडे दिले जातात, असं वकील सांगतात.

1992 साली अयोध्येतली बाबरी मशीद पाडली गेली. त्यामुळे भारतातल्या विविध भागांमध्ये दंगली उसळल्या. रामलल्लाचा जेथे जन्म झाला त्याच जागेवर ही मशीद बांधली गेली अशी अनेक हिंदुंची श्रद्धा आहे. शनिवारी सर्वोच्च न्यायालयानं हे मान्य केलं आणि मुस्लिमांना मशिदीसाठी वेगळा भूखंड देण्यात येईल असा निकाल जाहीर केला.

रामाच्या औदार्य आणि दानशूरवृत्तीला कोट्यवधी हिंदू भजतात. त्या रामातर्फे पांडे यांनी बाजू मांडली.

रामातर्फे केलेल्या याचिकेला अनेक हिंदू संघटनांनी पाठिंबा दिला होता. या याचिकेत अनेक बारकाव्यांचा समावेश केला गेला होता आणि भारतातील आघाडीच्या वकिलांनी त्यावर कोर्टात बाजू मांडली होती. उपासना, देवत्व, अवतार, आत्मा असे अनेक मुद्दे वकिलांनी मांडलेल्या बाजूमध्ये आले होते.

रामाचा जन्म याच भूमीवर झाला होता ही धारणा लोकांमध्ये कशी तयार झाली याबद्दल त्यांनी उहापोह केला. त्याचप्रमाणे जे लोक इथं प्रार्थना करतात त्यांना देवाच्या आत्म्याचा वास इथं असल्याचं जाणवतं असंही या याचिकेत म्हटलं आहे.

आत्माच देव आहे असं एका याचिकाकर्त्यांनी म्हटलं होतं.

"ही रामाची जन्मभूमी असल्यामुळे ही जागा भगवान रामाचीच असल्याचा," दावा पांडे यांनी केला होता.

मशीद बांधण्याआधीही ही जागा रामजन्माची जागा होती अशी हिंदूंची कल्पना असल्याचा निष्कर्ष न्यायाधीशांनी निकाल देताना काढला.

1989 साली भगवान रामाला याचिकाकर्ते बनवल्यानंतर उंच धिप्पाड असे पांडे 'देवाचे तिसरे मित्र' झाले. त्यापूर्वी एक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि नंतर विद्यापीठातील प्राध्यापक देवाचे मित्र होते.

कायदेशीर मदत

पांडे यांचा जन्म उत्तर प्रदेशातील एका शेतकरी कुटुंबात झाला. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणानंतर शिक्षक झाले. परंतु नोकरी अशी त्यांनी कधी केली नाही.

शाळेत असतानाच त्यांचा रा. स्व. संघाशी संबंध आला. काही काळानंतर ते विश्व हिंदू परिषदेमध्ये काम करू लागले. ही संघटना मशीद पाडण्यात अग्रेसर होती. राजकीय अभ्यासक मंजरी काटजू यांनी विश्व हिंदू परिषदेचं वर्णन हे रा. स्व. संघाचं गोंगाट करणारं 'उग्रवादी भावंडं' असं वर्णन केलं आहे.

ही भगवान रामाची जन्मभूमी असल्याची हिंदुंची श्रद्धा असल्याचा निष्कर्ष न्यायाधीशांनी काढला आहे. विश्व हिंदू परिषदेत काम करत असताना हिंदुंना जागृत करण्यासाठी त्यांनी संपूर्ण उत्तर प्रदेशात प्रवास केला होता.

पाडें म्हणतात, "जिथं हिंदुंना जबरदस्तीने मुसलमान बनवलं जात आहे असं समजायचं तिथं जाऊन मी धर्मांतर थांबवायचो. हिंदू समाज क्षीण झाला आहे असं मला वाटायचं. त्यामुळे हिंदूभावना वाढीला लागण्यासाठी आपण बचावाची भूमिका घेण्यापेक्षा आक्रमक झालं पाहिजे असं माझं मत होतं."

Image copyright Mansi thapliyal

मशीद पाडण्याचा आरोप असणाऱ्या 49 जणांना कायदेशीर मदत देण्यासाठी पांडे सरसावले होते. या मशीद पाडण्यासंदर्भात स्वतंत्र चौकशी सुरू असणाऱ्या हिंदू साधूंनाही त्यांनी मदत केली.

सर्वोच्च न्यायालयात 40 दिवस चाललेल्या सुनावणीच्या काळात संधिवाताने त्रस्त पांडे खुर्चीमध्ये बसून असायचे. ते म्हणाले, "गेल्या दहा वर्षांमध्ये मी शेकडोवेळा न्यायालयात गेलो असेन. मी तिथं फारसं बोलायचो नाही. माझ्या वतीनं वकील बोलायचे. मी देवाचा प्रतिनिधी आहे हे विसरू नका." देवाच्या वतीनं तेच स्वाक्षरी करायचे.

अयोध्येतल्या विश्व हिंदू परिषद कॅंपसमध्ये ते एका खोलीमध्ये राहातात.

ते म्हणतात, "मी नेहमीच भगवान रामाच्या बाजूने राहिलो. त्याच्याबरोबर असलो की कशाची भीती?"

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)