शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण, पाठिंब्यासाठी NDAतून बाहेर पडण्याची राष्ट्रवादीची अट

उद्धव ठाकरे, फडणवीस Image copyright Getty Images

भाजपने सत्ता स्थापन करण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंब्यासाठी शिवसेनेपुढे NDAतून बाहेर पडण्याची अट घातली आहे.

त्यानंतर कोश्यारी यांनी दुसरा सर्वांत मोठा पक्ष शिवसेनेला राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रित केलं आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी ते सत्ता स्थापन करण्यास इच्छुक आणि समर्थ आहेत का, याबाबत कळवावे, असं राज्यपालांनी एका निवेदनात म्हटलं आहे.

रविवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांची भेट घेऊन शिवसेना बरोबर येत नसल्यामुळे आत्ता आम्ही सत्ता स्थापन करू शकत नाही, असं सांगितलं.

मुंबईत झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, "आता शिवसेनेला जर राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्तास्थापन करायचं असेल तर ते करू शकतात, त्यांना शुभेच्छा."

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून 17 दिवस झाले असून सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही.

Image copyright Handout
प्रतिमा मथळा राज्यपालांची भेट घेऊन देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी सरकार बनवण्याची असमर्थता दर्शविली.

त्यानंतर काही वेळाने पत्रकारांशी बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी "आज दुपारी उद्धव ठाकरे यांनी एक गोष्ट स्पष्ट केली - येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल," असं पुन्हा एकदा स्पष्ट केलं.

"भाजप एवढ्या दिवसांपासून म्हणत होतं की मुख्यमंत्री भाजपचाच होईल. आम्ही त्याचं स्वागतही केलं. मग आता ते माघार घेत असतील तर सरकार कोण बनवणार? त्यांना त्यांचा अडीच वर्षांचा शब्द पाळायचा नसेल तर त्यांचा मुख्यमंत्री कसा होणार?" असंही राऊत यावेळी म्हणाले.

आता सर्व नजरा मातोश्रीवर असतील. जर त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जावं लागेल.

मात्र शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा हवा असेल तर त्यांनी आधी NDAमधून बाहेर पडावं, अशी अट राष्ट्रवादीने घातली आहे.

"शिवसेना सत्ता स्थापन करण्यासाठी प्रस्ताव घेवून आल्यास राष्ट्रवादी नक्की विचार करेल मात्र त्याअगोदर एनडीएमधून बाहेर पडावे आणि युती तोडत असल्याची घोषणा करावी, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.

"सरकारमध्ये सहभागी होण्याअगोदर शिवसेनेला समर्थन देण्याअगोदर सरकारचे कोणते कार्यक्रम असतील आणि कोणत्याप्रकारे सरकार बनेल आणि कोणत्या मुद्दयावर सरकार बनवली जाईल या गोष्टींवर चर्चा केल्याशिवाय निर्णय होवू शकत नाही," असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं.

शिवसेनेची टीका आणि काँग्रेसमध्ये संभ्रम

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी रविवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना पुन्हा भाजपवर टीका केली. "आम्ही कुणालाही फोडू शकतो, आम्ही कुणालाही विकत घेऊ शकतो, किंबहुना बहुमत विकत घेता येऊ शकतं, हे चित्र गेल्या काही वर्षांत देशात आणि राज्यात निर्माण झालं होतं. हा भ्रमाचा भोपळा आता फुटला आहे. त्यामुळे सगळे प्रयत्न करून झाल्यावर आता हे (भाजप) शांत झाले आहेत," असं ते म्हणाले.

राऊत यांनी भाजपवर टीका करत सत्ता स्थापन करून दाखवण्याचं आव्हान दिलं. "सर्वांत मोठा पक्ष असल्यामुळे राज्यपालांनी भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. त्यांनी अतिशय योग्य पाऊल उचललं आहे. भाजपकडे बहुमत असल्याशिवाय त्यांनी इतक्या आत्मविश्वासाने त्यांचा मुख्यमंत्री होईल, हे वक्तव्य कसं केलं?"

ते पुढे म्हणाले, "जो सर्वांत मोठा पक्ष असतो, तो स्वतःच जाऊन सत्तेचा दावा करतो. पण भाजप इतके दिवस का थांबलं हा प्रश्न पडला आहे. राज्यपालांनी दिलेल्या संधीचा भाजपने लाभ घ्यावा. पंधरा दिवस दावा न केल्यामुळेच राज्यपाल सक्रिय झाले आहेत. राज्य अस्थिर बनू नये यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपकडे बहुमत नाही, असं मला वाटत नाही. भाजपकडे बहुमत नसतं तर भाजपचाच मुख्यमंत्री होईल, असं ते म्हणाले नसते. याबाबत त्यांना आत्मविश्वास आहे, त्यामुळे त्यांच्याकडे बहुमत आहे, असं आम्हाला वाटतं."

Image copyright PTI

त्यातच काँग्रेसनेही सत्तास्थापनेच्या चर्चेत उडी घेतल्याचं दिसतंय.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण द्यावं, असं काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी म्हटलं आहे. भाजप-शिवसेनेने यांनी सत्ता स्थापनेसाठी दावा केला नसल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीला ही संधी द्यावी, असं देवरा यांनी ट्वीट करून म्हटलं आहे.

मात्र देवरा यांना संजय निरुपम यांच्याकडून घरचा अहेर मिळाला आहे. "सध्याच्या परिस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापन करणं शक्य नाही. सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला बरोबर घ्यावं लागेल. पण तसा विचारही दोन्ही पक्षांनी करू नये," असं निरुपम म्हणाले आहेत.

यासंदर्भात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसची भूमिका मांडली. "अद्याप काँग्रेसचा कुठलाही निर्णय झालेला नाही. काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या ज्या बातम्या सुरू आहेत त्या चुकीच्या आहेत. आज संध्याकाळी पुन्हा काँग्रेस आमदारांची जयपूरला बैठक आहे," असं चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

"काँग्रेस विरोधी पक्षात बसण्याच्या भूमिकेत आहे, पण याबाबत अंतिम निर्णय हायकमांड घेणार आहे. त्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे," असं काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटलं आहे. 

'आम्ही डील करणारे व्यापारी नाही'

शिवसेना कुणासोबत वाटाघाटी करणार आहे, असं विचारल्यावर ते म्हणाले, "महाराष्ट्राच्या राजकारणात फाटाफूट होईल, असं मला वाटत नाही. किती अफवा पसरवली तरी काँग्रेसमधलं कुणीही फुटणार नाही. सध्या कोणत्याही पक्षातल्या कुणालाही फोडता येणार नाही."

"आमचे नेते व्यापारी नाहीत. आम्ही डील करण्यासाठी व्यापारी नाही. शिवसेनेने राजकीय व्यापार कधीच नाही. नफा-तोटा हा प्रकार आमच्या शब्दकोशात नाही," राऊत म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका न करण्याची सूचना उद्धव ठाकरे यांनी केल्याबाबत प्रश्न विचारला असता, "निवडणुकीच्या वेळी जे काय राष्ट्रवादी काँग्रेसला बोलायचं होतं ते बोललो आहोत. त्यामुळे आता पुन्हा काय बोलणार," असं ते म्हणाले.

तसंच रविवारी दुपारी साडेबारा वाजता उद्धव ठाकरे रिट्रीट हॉटेलमध्ये मुक्कामी असलेल्या आमदारांची भेट घेणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली.

राज्यपालांकडून भाजपला विचारणा

सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्तास्थापन करण्याची इच्छा आहे का आणि तशी त्यांची तयारी आहे का, अशी विचारणा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शनिवारी केली होती.

निवडणुकीपूर्वी युती केलेले भाजप आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेल्या रस्सीखेचानंतर शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा कोश्यारी यांना दिला होता. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन, भाजपने आधी सत्तास्थापनेचा दावा करावा, त्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, असं म्हटलं होतं.

'पहले मंदिर, फिर सरकार'

शनिवारी बहुचर्चित अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या 5 सदस्यीय घटनापीठाचा एकमताने निर्णय दिला, की मूळ जागा हिंदूंना राम मंदिरासाठी देण्यात यावी आणि मुस्लिमांना मशिदीसाठी पाच एकर पर्यायी जागा देण्यात यावी.

या निर्णयानंतर गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेची भूमिका मांडणारे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केलं होतं - "पहले मंदिर फिर सरकार!!! अयोध्या में मंदिर, महाराष्ट्र मे सरकार... जय श्रीराम!!!"

Image copyright Twitter

त्यामुळे आता सत्तास्थापनेसाठी भाजप आणि देवेंद्र फडणवीस हे पुढचं पाऊल टाकणार का, आणि त्यानंतर शिवसेना काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

"सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं आहे. ही प्रक्रिया आधीही सुरू होऊ शकत होती. राज्यपालांनी कुठेतरी ही खात्री करून घ्यायला हवी की भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे की नाही. घोडेबाजार सुरू होऊ नये, यासाठी राज्यपालांनी लक्ष दिलं पाहिजे," असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.

"तरीही जर भाजपची सत्तास्थापन झाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसला पटल्यावर भाजपच्या विरोधात मतदान करेल. जर शिवसेनेने त्यांच्याविरोधात मतदान केलं आणि सरकार पडलं, तर पर्यायी सरकार निर्माण करण्याबाबत पक्ष विचार करू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक 12 नोव्हेंबरला 11 वाजता बोलवण्यात आली आहे, तेव्हा पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पुढील निर्णय घेतला जाईल," असंही नवाब मलिक म्हणाले.

शिवसेनेचे आमदार मालाडच्या हॉटेलात

भाजपची रणनीती काय आहे, हे अद्याप स्पष्ट नसल्यामुळे शिवसेनेनेही जपून पावले टाकण्याला प्राधान्य दिलं आहे. आमदार फुटू नये यासाठी खबरदारी म्हणून सेनेच्या आमदारांना मालाडच्या रिट्रीट हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे.

तीन दिवसांपूर्वी शिवसेना आणि भाजपमधला सत्तासंघर्ष टोकाला पोहोचला होता. त्यावेळी शिवसेनेने पक्षाच्या आमदारांना रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवलं. रंगशारदामध्ये आमदारांसाठी जागा अपुरी पडत असल्यामुळे त्यांना रिट्रीटमध्ये हलवण्यात आले आहे.

राज्यपालांचा नागपूर दौरा रद्द

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे रविवारी नागपूर दौरा करणार होते, मात्र राजकीय अस्थिरता पाहता त्यांनी हा दौरा रद्द केला आहे.

राज्यपाल कोश्यारी उत्तराखंडच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी रविवारी नागपूरला जाणार होते. तिथं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण सध्याची स्थिती पाहता राज्यपालांनी मुंबईत राहणंच पसंत केलं.

हेही नक्की वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)