बुलबुल चक्रीवादळ बंगालच्या खाडीत थडकलं: 20 लाख लोक विस्थापित, 13 जणांचा मृत्यू

चक्रीवादळामुळे विस्थापित झालेली बाई Image copyright Getty Images

भारत आणि बांगलादेशात बुलबुल चक्रीवादळामुळे 20 लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. या वादळात आतापर्यंत 13 जणांनी प्राण गमावले आहेत असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

शनिवारी मध्यरात्री हे चक्रीवादळ पश्चिम बंगालमधील सागर बेटावर थडकलं. कोलकात्यासह अनेक विमानतळं आणि बंदरांवरील सेवा थांबविण्यात आलेली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून बांगलादेशातील मोंगला आणि चितगांव बंदरांवरील तसेच चितगाव विमानतळावरील सेवा थांबविण्यात आलेली आहे.

किनारीप्रदेशातील नागरिकांना 5,550 आश्रयगृहांमध्ये हलवण्यात आल्याची माहिती बांगलादेशचे आपत्कालीन व्यवस्थेचे सचिव शाह कमल यांनी AFP वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

पश्चिम बंगालचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री जावेद खान यांनी ANIशी बोलताना सांगितलं, "एकूण 2 लाख 97 हजार लोकांना याचा फटका बसला आहे. उत्तर 24 परगना जिल्ह्यात 5 आणि दक्षिण 24 परगना जिल्ह्यात 1, अशा एकूण सहा लोकांचा मृत्यू झाला आहे."

चक्रीवादळ किनाऱ्यावर थडकलं असलं तरी लोकांनी शांत राहावं, असं आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विटरवर केलं आहे.

"शाळा-कालेज आणि आंगणवाड्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 1 लाख 20 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. कृपया नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कृपया शांत राहा आणि मदतकार्य करणाऱ्या प्रशासनाला सहकार्य करा. सतर्क राहा, काळजी घ्या आणि सुरक्षित राहा," असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

Image copyright Twitter

हे वादळ उत्तरेच्या दिशेने सरकेल आणि हळूहळू याची तीव्रता कमी होत जाईल, असं हवामानाचा अंदाज व्यक्त करणाऱ्या तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे.

बांगलादेशच्या हवामान विभागाने हे वादळ थडकल्यावर त्याचा वेग प्रतिताशी 120 किमी असेल आणि त्यामुळे समुद्र आणि किनारी प्रदेशातील नद्यांच्या पाण्याची पातळी वाढेल असं सांगितलं आहे.

बांगलादेश आणि पश्चिम बंगालमधील जलवाहतुकीची केंद्रं बंद केल्यामुळे बांगलादेशातील सेंट मार्टिन बेटासह इतर बेटांवर हजारो लोक अडकून पडले आहेत.

आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी जहाजं आणि लष्करी विमानं सज्ज ठेवल्याचं भारतानं स्पष्ट केलं आहे.

बांगलादेशच्या किनारी प्रदेशाला असा चक्रीवादळांचा नेहमीच तडाखा बसतो. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये बांगलादेशने उचललेल्या पावलामुळे नुकसान कमी होण्यास मदत झाली आहे.

चक्रीवादळाची सूचना देणारी व्यवस्था सुधारली आहे. त्यामुळे लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी व्यवस्थेला वेळ मिळतो. स्थानिक लोकांचं संरक्षण करण्यासाठी नव्या निवाराघरांची निर्मिती करण्यात आली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)