महाराष्ट्र सत्तासंघर्ष: शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेचं आमंत्रण, रात्री 8.30पर्यंतची मुदत

उद्धव ठाकरे आणि शरद पवार Image copyright Getty Images

सोमवारी दिवसभर चाललेल्या चर्चा, वाटाघाटी आणि बैठकांनंतरही राज्यातलं सत्तास्थापनेचं चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

शिवसेनेने सत्तास्थापनेचा दावा केला असला तरी राज्यपालांनी त्यांना मुदतवाढ नाकारली आहे. त्यानंतर राजभवनावर राष्ट्रवादीच्या नेत्यांना पाचारण करण्यात आलं आणि त्यांना राज्यपालांनी मंगळवारी रात्री 8.30 पर्यंतची मुदत दिली आहे.

तत्पूर्वी, काँग्रेसने एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे, मात्र त्यात शिवसेनेला पाठिंबा दिल्याचा कोणता उल्लेख नाही. राज्यपालांनी दिलेल्या मुदतीमध्ये पाठिंब्याची पत्रं सादर करण्यात शिवसेनेला अपयश आल्यानंतर तिसरा सर्वांत मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला आमंत्रण देण्यात आलं आहे.

पाहा सोमवारी या सत्तासंघर्षात काय काय घडलं?

10.40: काँग्रेसशी चर्चा करून राज्यपालांना उत्तर देऊ - जयंत पाटील

शिवसेनेने राज्यपालांची भेट घेतल्यानंतर आम्ही एकत्रित आकड्यांवर एक नजर टाकली. आम्ही उद्या काँग्रेसशी चर्चा करू. सध्या सर्व नेते दिल्लीला आहेत. आम्ही काँग्रेसशी चर्चा करून काय ते उत्तर राज्यपालांना देऊ, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.

9.58: महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत निर्णय घेण्यासाठी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी होणार आहे.

9.27: सुधीर मुनगंटीवर यांनी पत्रकारांना सांगितलं, "भाजप वेट अँड वॉच करणार, असं आमच्या आज झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत ठरलं."

Image copyright ANI
प्रतिमा मथळा सुधीर मुनगंटीवार

9.15: राष्ट्रवादीला सत्तास्थापनेसाठी राज्यपालांनी मंगळवारी रात्री 8.30 पर्यंतची मुदत दिली आहे.

8.59: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजभवनावर दाखल. राज्यपालांशी होणार चर्चा.

8.55: सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आम्हाला आज पत्र मिळेल आणि आमचा मित्रपक्ष काँग्रेसशी चर्चा केल्यानंतर आम्ही आमचा अंतिम निर्णय कळवू असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं.

Image copyright ANI/TWITTER

8.44: काँग्रेस नेतृत्व महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी सकारात्मक आहे, असं काँग्रेस नेते राजीव सातव यांनी स्पष्ट केलं आहे. "आमची राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा झालेली नाही, काही निरीक्षक उद्या मुंबईला जातील ते राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करतील. महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या सर्व पर्यायांची यावेळी चाचपणी केली जाईल," असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.  

Image copyright ANI

8.38: राज्यपालांनी भेटायला बोलावलं आहे. त्यांना आम्ही भेटण्यासाठी निघालो आहोत. त्यांनी कशा करता बोलावलं आहे हे आम्हाला माहिती नाही, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

8.30: शिवसेनेनंतर राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आमंत्रण दिलं आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजभवनावर निघाले आहेत.

7.55:आज दिवसभर चाललेल्या घडामोडींनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांनी यापुढील चर्चा मुंबईत होईल असं स्पष्ट केलं आहे.

Image copyright ANI

7.38: आम्हाला मिळालेल्या वेळात आम्ही शिवसेनेच्या आमदारांच्या स्वाक्षऱ्या असलेलं पत्र देऊन आम्ही सत्तास्थापनेचा दावा केला आहे. 2 दिवसांची मुदत वाढवून देण्याची मागणी आपण केली होती. मात्र ती राज्यपालांनी नाकारली. असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Image copyright ANI

7.30: काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी संध्याकाळी एक पत्र प्रसिद्ध केलं आहे. आज काँग्रेस वर्किंग कमिटीनं महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली. तसेच काँग्रेसच्या अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसशी आणखी चर्चा करू असे काँग्रेसने या पत्रात लिहिलं आहे.

Image copyright AICC

6.50: काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या घरातील बैठक संपली आहे.

6.39: आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्यासह तीन अपक्ष आमदारांचा शिवसेनेला पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं आहे.

Image copyright ANI

6.30: शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर पोहोचले आहेत.

5.46: काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जयपूरमधील काँग्रेसच्या आमदारांशी चर्चा केली आहे.

Image copyright ANI/TWITTER

5.37: शिवसेनेला अधिक वेळ द्यावा अशी विनंती करण्यासाठी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे राज्यपालांकडे जात आहेतं असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं आहे.

5.20: काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोनवरून थोडावेळ चर्चा केली. काँग्रेसच्या नेत्यांची बैठक संपल्यावर काँग्रेसचा निर्णय स्पष्ट होईल.

Image copyright ANI

5.02: भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची बैठक थोड्याच वेळात वर्षा बंगल्यावर होणार आहे. या बैठकीसाठी पक्षाचे राज्यातले ज्येष्ठ नेते उपस्थित असतील.

4.00:महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या विषयावर चर्चा करण्यासाठी तसेच राज्यातील एकूण राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे नेते अहमद पटेल, ए. के. अॅंटनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या दिल्लीच्या निवासस्थानी 10 जनपथ येथे आले आहेत.

3.37: शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत रुटिन चेकअप साठी लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत, असं शिवसेनेच्या सूत्रांनी सांगितले आहे.

राऊत यांची आरोग्य तपासणी तेथे होईल आणि उद्यापर्यंत त्यांना रुग्णालयातून घरी जाता येईल, अशी माहिती राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी ABP माझा वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं.

3.30: मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे?

"शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा अशी शिवसैनिकांची इच्छा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होणे, ही महाराष्ट्राची गरज आहे," असा मजकूर लिहिलेले फलक मुंबईत लावण्यात आले आहेत.

Image copyright RoHAN TILLU
प्रतिमा मथळा असे फलक मुंबईत लावण्यात आले आहेत.

3.24: काँग्रेसनं शिवसेनेला पाठिंबा दिला तर त्यांनी 5 वर्षं शिवसेनेचं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करू नये, तरच काँग्रेसवर लोकांचा विश्वास बसेल असं मत माजी पंतप्रधान आणि जनता दल सेक्युलरचे अध्यक्ष एच.डी. देवेगौडा यांनी मांडलं आहे.

3.04: महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांबरोबर पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची चर्चा होण्याची शक्यता आहे.

2.53: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामधील बैठक संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरू झाली आहे. यामुळे या दोन्ही पक्षांनी चर्चेमध्ये एक पाऊल पुढे टाकलं आहे अशी स्थिती दिसत आहे.

2.41: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बैठक संपली आहे. आता या बैठकीतून दोन्ही पक्षांनी घेतलेले निर्णय पुढील घडामोडींची दिशा ठरवतील. या दोन्ही नेत्यांनी जवळपास 40 मिनिटे चर्चा केली आहे. दरम्यान भाजपच्या कोअर कमिटीची 5 वाजता बैठक होणार आहे.

2.26 : अरविंद सावंत यांनी आपला राजीनामा ट्वीट केला आहे.

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा अरविंद सावंत यांचा राजीनामा

1.41: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची बांद्रयातील ताज लँड्स एंड मध्ये भेट.

1.38 : अरविंद सावंतांचा राजीनामा

"30 मे रोजी वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्या आशीवार्दाने मी शपथ घेतली. त्यानंतर मला अवजड उद्योगाची जबाबदारी मी पार पाडली. विधानसभा निवडणुकीच्यावेळी जो निर्णय झाला तो झालाच नाही हे सांगून फसवलं . उद्धव ठाकरेंना खोटं ठरवण्याचा प्रयत्न झाला. अशा वातावरणात मी कारभार करावा हे उचित नाही. त्यामुळे मी माझा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाठवला आहे," असं माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत म्हणाले.

मात्र याचा अर्थ युती तुटली आहे का, असं विचारल्यावर त्यांनी "मी राजीनामा दिला याचा अर्थ काय आहे हे तुम्ही समजून घ्या," असं सूचक वक्तव्य केलं.

"मेहबुबा मुफ्ती, मायावती आणि नितीश कुमार यांच्याबरोबर सरकार स्थापन करताना कोणती विचारधारा होती?" असा सवालही त्यांनी केला.

Image copyright NILESH DHOTRE

12. 26 : जोपर्यंत काँग्रेसचा निर्णय येणार नाही तोपर्यंत आम्ही निर्णय कळवणार नाही. त्यांचा निर्णय आल्यावर आम्ही आमची भूमिका ठरवणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी सांगितलं.

12.18:आज कोअर कमिटीची बैठक संपली. चार वाजता पुन्हा बैठक घेणार आणि महाराष्ट्राच्या नेत्याशी सल्लामसलत करून अंतिम निर्णय होईल.- मल्लिकार्जून खरगे

11.59: "कोण कसं सरकार स्थापन करेल हा मुद्दा नाही. मात्र राज्यात अस्थितरेची शक्यता नाकारता येत नाही. पुडे निवडणुका झाल्यात काँग्रेस शिवसेनेबरोबर लढणार का?" असं ट्विट संजय निरुपम यांनी केलं आहे. राज्यात 2020 मध्ये निवडणुका होतील, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

Image copyright TWITTER
प्रतिमा मथळा संजय निरुपम यांचं ट्वीट

11.15: भाजपच्या बैठकीला मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी काही वेळात सुरुवात होणार.

10.49 : शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला मुंबईत सुरुवात. महत्त्वाचे नेते उपस्थित. बदलत्या राजकीय परिस्थितीत कोणत्या पक्षाने कुणाबरोबर जावं हा इतका साधा प्रश्न नाही. कारण अनेक प्रश्न त्यातून निर्माण होतात. आमची कुणाबरोबर चर्चा झालेली नाही. बदलत्या परिस्थितीत आज जे प्रश्न निर्माण झाले यावर आम्ही चर्चा करणार असं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.

10.46 :दिल्लीत काँग्रेस कोअर कमिटीच्या बैठकीला सुरुवात. बैठकीला मल्लिकार्जून खरगे, अहमद पटेल यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती.

9.56: तुमची विरोधी पक्षात बसण्याची तयारी आहे पण आमच्यासोबत चर्चा करण्याची तुमची तयारी नाही असं वक्तव्य संजय राऊत यांनी म्हटलं. भाजपला सत्तास्थापनेसाठी 72 तासांची मुदत दिली होती तर आम्हाला केवळ 24 तासांची मुदत दिली आहे असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं. असं असलं तरी आम्हाला राज्यपालांविषयी तक्रार नाही.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे भारतातलेच पक्ष आहेत. त्यांच्याशी आमचे मतभेद आहेत पण ते काही देशद्रोही नाहीत असं संजय राऊत म्हणाले.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
संजय राऊत : भाजपच्या निर्णय आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री

भाजपने काश्मीरमध्ये पीडीएफशी हातमिळवणी केली तेव्हा त्यांचे कुठे विचार सारखे होते पण ही आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्रॅमच्या आधारावर एकत्र येणार आहोत.

9.54 :"शिवसेनेच्या केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. शिवसेनेनं एनडीएतून बाहेर पडावं, अशी आमची पहिली अट होती. आता पुढचा निर्णय घेण्यासंदर्भात आम्ही चर्चा करू. काँग्रेसनंही त्यांच्या वर्किंग कमिटीची बैठक बोलावली आहे," असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे. सकाळी दहा वाजता ही मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथं ही बैठक पार पडेल. या बैठकीला अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यासह पक्षाचे अन्य महत्त्वाचे नेते उपस्थित असतील. शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देण्याबाबतच्या भूमिकेबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

अरविंद सावंत यांचा राजीनामा

केंद्रीय अवजड उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांनी राजीनामा देण्याची घोषणा ट्विटरवरून केली आहे. यासंदर्भात दिल्लीत 11 वाजता ते पत्रकार परिषद घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात आणखी एक ठिणगी पडली आहे. अरविंद सावंत शिवसेनेचे दक्षिण मुंबईतून शिवसेनेचे खासदार आहेत.

"लोकसभा निवडणुकी आधी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता. दोघांना तो मान्य होता.आता हा फॉर्म्युला नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभिमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपाने फारकत घेतलीच आहे. शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे?

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा अरविंद सावंत

आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देत आहे. या संदर्भात आज सकाळी 11.00 वा. दिल्ली येथे मी पत्रकार परिषद (Press Conference) घेणार आहे." असं ते ट्विटमध्ये म्हणाले.

काल भाजपाने सत्तास्थापन करण्याबाबत असमर्थता दर्शवल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेबाबत विचारणा केली होती. महाराष्ट्रात सत्ता स्थापन करायची असेल तर एनडीएतून बाहेर पडण्याचं आवाहन काल राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आलं होतं. तर शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसच्या वर्तुळातही खलबतं सुरू आहेत.

दरम्यान संजय राऊत यांनीही ट्विट करून सत्तास्थापनेबाबत एक सूचक वक्तव्य केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)