महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू: शरद पवार-उद्धव ठाकरे 'स्थिर सरकारसाठी प्रयत्न करणार'

शरद पवार-उद्धव ठाकरे Image copyright Getty Images / ANI

कुठल्याही पक्षाला महाराष्ट्रात सरकार स्थापन न करता आल्याने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली आहे.

त्यामुळे आता विरोधी विचारसरणीच्या दोन पक्षांनी एकत्र येऊन (शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस) व्यवस्थित विचार करून सरकार स्थापन करण्यास बराच वेळ आहे, असं शरद पवार तसंच उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र पत्रकार परिषदांमध्ये सांगितलं.

तत्पूर्वी, आधी भाजपने सत्तास्थापनेस असमर्थता दर्शविल्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी शिवसेनेला आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारस्थापनेचं निमंत्रण दिलं होतं. मात्र कुठल्याही पक्षाला पुरेशा आमदारांचा पाठिंबा न दाखवता आल्याने राज्यात सहा महिन्यांची राष्ट्रपती राजवट 12 नोव्हेंबर रोजी लागू करण्यात आली.

नेमकं काय घडलं दिवसभरात?


रात्री 9 वाजता - राष्ट्रपती राजवट अत्यंत दुर्दैवी - फडणवीस

काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक निवेदन जारी केलं आहे. "नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला सुस्पष्ट जनादेश मिळालेला होता. परंतु तरीही महाराष्ट्र राज्यात सरकार प्रस्थापित न होणे आणि राष्ट्रपती राजवट लागू होणे अत्यंत दुर्दैवी आहे. सर्वच पक्ष जनतेचा गंभीरपणे विचार करतील आणि राज्याला लवकरच स्थिर सरकार मिळेल अशी अपेक्षा करतो," असं भाजप महाराष्ट्रने ट्वीट केलं आहे.

Image copyright Twitter / @BJP4Maharashtra
प्रतिमा मथळा फडणवीसांचं निवदेन

रात्री 8.30 वाजता - सुधीर मुनगंटीवार यांची पत्रकारांशी बातचीत

काही पक्षांच्या हट्टामुळे, जनादेशाचा अनादर केल्यामुळे महाराष्ट्रात आज राष्ट्रपती राजवट लागू झाली. जनादेश असताना लवकर शासन स्थापित व्हावं, ही भाजपची इच्छा होती, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवर म्हणाले.

ते पुढे म्हणाले...

 • शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्वरीत तोडगा निघावा ही अपेक्षा होती. सर्वात मोठा पक्ष असतानाही, जनादेश पाळायचा असूनही आम्ही इतर पर्यायांचा शोध घेतला नाही, आमच्या मित्रपक्षांनी तो घेतला म्हणून ही वेळ ओढावली आहे.
 • मित्रपक्षानं इतरांचा पाठिंबा आहे असं सांगूनही त्यांना तो मांडता आलेला नाही. राज्यपालांकडे इतक्या दिवसात सत्तास्थापनेचा दावा केला नाही.
 • भाजपनेही कालावधी वाढवून मागितला होता पण तो मिळाला नव्हता. त्यामुळे शिवसेनेने सध्या दाखल करण्यात आलेली केस अप्रस्तुत ठरलेली आहे.
 • जनादेशाचा अवमान करणारी ही घटना आहे. काही लोकांनी जो हट्ट केला त्याचा हा परिणाम आहे.
 • भाजप सगळ्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. 'वेट-अँड-वॉच' हीच भाजपची भूमिका ठेवली आहे.
 • राणे जे बोलले ते त्यांचं वैयक्तिक मत, कोअर टीममध्ये अशी कुठलीही चर्चा झाली नाही.

रात्री 8.15 वाजता: नारायण राणे - भाजप सत्तास्थापनेचा प्रयत्न करणार

"माझं आजच माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं. येत्या काळात भाजप सत्तास्थापनेसाठी प्रयत्नशील असेल," असं भाजप नेते नारायण राणे म्हणाले.

Image copyright ANI
प्रतिमा मथळा नारायण राणेंची पत्रकारांशी चर्चा

राणे म्हणाले

 • सत्तास्थापनेसाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू. त्यामुळे कोण-कोणते आमदार आमच्या संपर्कात आहेत, हे मी सांगणं योग्य नाही.
 • लोकशाही आहे. ज्याला वाटेल त्यानं तिथे जावं. भाजपला सरकार स्थापन करायचंय. मग दुसऱ्याला यश मिळेल की नाही मी कसं म्हणू.
 • सत्ता स्थापनेला विलंब होतोय हे योग्य नाही. घोषणा दिल्यात, शेतकऱ्यांना भेटून आलेत. ज्यांच्यामुळे विलंब होतोय तेच या सगळ्यांना जबाबदार आहेत.
 • भाजप राज्यपालांकडे योग्य संख्येची यादी घेऊन जाईल. सत्ता आणायचा आम्ही प्रयत्न करू. आम्हाला कामाला लागण्याचे आदेश आहेत.
 • वेगळी मागणी करणं हे नैतिकतेला धरून नाहीये.
 • कालपासून ज्या बैठका होतायंत त्यात निर्णय कुठे होतायंत. शिवसेनेला "उल्लू बनवण्याचं काम सुरू आहे. कांग्रेसचे नेते पुढे काय बोलतात मागे काय बोलतात याचा, अभ्यास सेनेने केला पाहिजे.

रात्री 8.00 वाजता: शिवसेनेची पत्रकार परिषद सुरू

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरू झाली आहे. पाहूया त्यातील काही प्रमुख मुद्दे -

Image copyright ANI
प्रतिमा मथळा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद
 • उद्धव ठाकरे: काल पहिल्यांदाच शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीला पहिल्यांदा संपर्क साधला होता. काल आम्ही राज्यपालांना 48 तासांची मुदतही मागितली होती. पण महाराष्ट्राला लाभलेले राज्यपाल अत्यंत दयावान आहेत. त्यांनी आम्हाला 48 तास दिले नाहीत. त्यांचं गणित काही कळलं नाही. त्यांनी सहा महिन्यांची मुदत आम्हाला देतो म्हणून सांगितलं. आता या कालावधीत आम्ही एकत्र बसू. कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर काम करू. आमचा सत्तास्थापनेचा दावा पुढे नेऊ.
 • भिन्न विचारधारेचे पक्ष एकत्र कसे येतील ते आमचं आम्ही ठरवू.
 • युती तुटली आहे का, हे विचारल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, "आमच्या मित्रपक्षानेच आम्हाला सांगितलं की जर शिवसेनेला आघाडीबरोबर जायचं असेल तर त्यांना शुभेच्छा. आता एक मित्र म्हणून आम्ही त्यांनी दिलेल्या शुभेच्छांचा मान राखू."
 • राजकारण नव्या दिशेने जाऊ पाहात आहे. त्याची सुरुवात होत आहे तर सगळ्यांनी थोडी वाट पाहावी. नवीन सुरुवात करायची असेल तर तुम्ही सोबत येऊ शकता का, असं सोनिया गांधींना विचारणा केली.
 • राष्ट्रपती राजवटीविरोधात याचिका दाखल केली नाही, असं उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण. "आमचे राज्यपाल अत्यंत दयावान निघाले. आम्ही 48 तास मागितले होते. त्यांनी आम्हाला सहा महिन्यांची मुदत दिली आहे."
 • "देर आए, दुरुस्त आए" असं युतीच्या बाबतीत होऊ शकतं का, असं विचारल्यावर उद्धव म्हणाले, "दुरुस्त करायचं असेलच तर बिघडवायचं कशाला. भाजपचा पर्याय मी संपवलेला नाही. भाजपनं संपवलाय. हे राजकारण आहे. सहा महिने हातात आहेत. बघू काय होतंय."

संध्याकाळी 7.30 वाजता - काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची पत्रकार परिषद

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेत मंचावर काँग्रेसचे अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित.

Image copyright ANI
प्रतिमा मथळा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेत अहमद पटेल, शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे आणि प्रफुल्ल पटेल

पत्रकार परिषदेत महत्त्वाचे मुद्दे -

 • आघाडीचं अधिकृत निवेदन प्रफुल्ल पटेल यांनी वाचून दाखवलं -"शिवसेनेने पहिल्यांदा 11 नोव्हेंबर रोजी अधिकृत संपर्क साधला होता. सर्व मुद्द्यांवर व्यापक चर्चा आवश्यक आहे. दोन्ही पक्षांच्या सहमतीनंतर निर्णय घेण्यात येईल."
 • काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्याकडून राष्ट्रपती राजवट लागू केल्यावरून टीका. ते म्हणाले, "सुप्रीम कोर्टाची मार्गदर्शक तत्त्व पायदळी तुडवली गेली आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला बोलावण्यात आलं, पण काँग्रेसला कुठेही लक्षात घेतलं गेलं नाही. ज्या प्रकारे निर्णय घेण्यात आला तो चुकीचा होता."
 • राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल - काल (11 नोव्हेंबर रोजी) पहिल्यांदाच शिवसेनेने संपर्क साधला. आम्ही सर्व मुद्द्यांचा विचार केला. यातील काही गोष्टींचं स्पष्टीकरण शिवसेनेबरोबर होणं गरजेचं आहे. ते झालं की आम्ही निर्णय घेऊ.
 • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार - आम्ही अद्याप चर्चेला सुरुवात केलेली नाही. एकमेकांशी चर्चा करू, सेनेशी चर्चा करू आणि त्यानंतरच निर्णय घेऊ.

आतापर्यंत काय काय घडलं?

संध्याकाळी 7.09 वाजता - राज ठाकरेंचं ट्वीट

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा राज ठाकरेंचं ट्वीट

संध्याकाळी 6.50 वाजता - काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक सुरू

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तमाम नेते वाय. बी. चव्हाण प्रतिष्ठाण इथे हजर. साडेआठची मुदत संपण्यापूर्वी महत्त्वाच्या बैठकीस सुरुवात.

Image copyright NCPSpeaks

संध्याकाळी 6.00 वाजता: कपिल सिबल म्हणतात...

"भाजपचं सरकार बनवायचं असेल तर दोन दिवस मिळू शकतात. पण बाकीच्या पक्षांना तितका वेळ नाही. ही दुःखाची गोष्ट आहे. राज्यपाल नियमांनुसार वागत नाहीत ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. त्यांनी यापूर्वीच क्रिया करायला हवी होती," असं काँग्रेस नेते आणि सुप्रीम कोर्टात शिवसेनेचं प्रतिनिधित्व करणारे वकील कपिल सिब्बल ANIशी बोलताना म्हणाले.

"राष्ट्रपती राजवट यावी यासाठी केंद्रानेच ही ठराविक पावलं उचलली आहेत. कर्नाटकमध्ये काय झालं हे आपल्याला माहितीये. तेच इथे करायचा प्रयत्न सुरू आहे. हे अतिशय अनैतिक आहे," असं ते पुढे म्हणाले.

संध्याकाळी 5.45 वाजता: सरकारी वकील म्हणतात...

शिवसेनेच्या याचिकेवर महाराष्ट्र राज्याचे सरकारी वकील निशांत काटनेश्वरकर म्हणाले, "मला याचिकेची प्रत मिळाली की, मी त्यातील पक्षाच्या मागण्या, मुद्दे आणि कशाच्या आधारावर याचिका केली आहे ते पाहीन. त्यानंतरच आवश्यक ती पावलं उचलली जातील."

संध्याकाळी 5.35 वाजता - राष्ट्रपती राजवट लागू

राज्यपालांच्या शिफारसीनुसार महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याची बातमी ANIने दिली आहे.

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा राष्ट्रपती राजवट लागू

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी ANIशी बोलताना सांगितलं की, "निवडणुकांची संपूर्ण प्रक्रिया संपून 15 दिवस झाले, मात्र कुठल्याच पक्षाने सरकार स्थापन करण्यास समर्थता दाखवली नाही. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करणं, हाच एक चांगला पर्याय असल्याचं राज्यपालांना वाटलं."

संध्याकाळी 5.30 वाजता - 'मोदींच्या दबावात राज्यपालांनी घाई केली'

काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आयडिऑलॉजीत फरक असला तरी शिवसेनेत बदल होतोय. NCPला साडेआठ वाजेपर्यंतची वेळ दिली होती, पण पंतप्रधानांच्या दबावात त्यांनी घाईत निर्णय घेतला आहे - असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग म्हणाले.

संध्याकाळी 5.25 वाजता - उद्धव ठाकरे मातोश्रीहून रिट्रीटकडे रवाना

उद्धव आणि आदित्य ठाकरे हॉटेल रिट्रिटकडे आमदारांशी चर्चा करायला रवाना.

संध्याकाळी 5.00 - शिवसेनेने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत काय म्हटलंय?

शिवसेनेतर्फे दाखल करण्यात आलेल्या याचिकेत महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांचा निर्णय "अनियंत्रित आणि अप्रामाणिक" असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

राज्यपालांनी सरकार स्थापनेच्या दावा फेटाळला असून, सभागृहात बहुमत दर्शवण्यासाठी कामकाजाचे तीन दिवस इतका वाजवी वेळही दिलेला नाही. राज्यपालांनी 11 नोव्हेंबर रोजी अत्यंत घाईनं, त्वरेनं आणि सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेल्या कायद्याचे उल्लंघन करत दावा फेटाळला आहे. 

Image copyright PTI

शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा दावा फेटाळणे, सत्ता स्थापनेसाठीचे बहुमत सिद्ध करण्यासाठी तीन दिवसांचा वाढीव अवधी नाकारणे, अशी कृती राज्यपालांनी केल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलं आहे. 

सरकार स्थापन करणे ही लोकशाहीची सर्वात चांगली राजकीय प्रक्रिया आहे आणि राज्यपाल एखाद्या राजकीय पक्षाला सरकार स्थापनेपासून रोखू शकत नाहीत, असंही याचिकेत म्हटले आहे. 

दुपारी 4.30 - शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येऊ शकतात का?

भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी 'झी 24 तास'शी बोलताना शिवसेनेवरची नाराजी व्यक्त केली. "महाराष्ट्रातल्या जनतेनं महायुतीला मतं दिलं होती. ज्यांनी युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय, त्यांनी जनादेशाचा अनादर केलाय. चर्चेचे दरवाजे बंद केल्यानं सूत जुळण्याचा प्रश्न नव्हता," असं ते म्हणाले.

शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येऊ शकतात का, हा मुद्दा आत्ता गैरलागू असल्याचंही ते म्हणाले.

दुपारी 4.00 - कायद्याच्या चौकटीतून व्हायला हवं होतं - पृथ्वीराज चव्हाण

सगळं कायद्याच्या चौकटीतून व्हायला हवं होतं. पण परस्पर निर्णय घेणं मला योग्य वाटत नाही, असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

"संधी दोन्ही पक्षांना मिळायला हवी होती. काँग्रेसनं विशिष्ट परिस्थितीमध्ये वेगळा पर्याय निघू शकतो का तो राज्यपालांच्या समोर मांडला असता. काँग्रेसचं गटबंधन इतर पक्षांशी करून सत्तास्थापनेचा निर्णय घेता आला असता, किंवा आठ वाजेपर्यंत आमचा काहीतरी पर्याय निघाला असता," असंही ते म्हणाले.

राजकीय विश्लेषक संजय जोग आणि आलोक देशपांडे यांच्याकडून समजून घेऊया

दुपारी 3.50 - 'ज्यांना योग्य काही करायचंय त्याला पाठिंबा मिळाला पाहिजे'

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांनी 'झी 24 तास'शी बोलताना म्हणाले की, "आपण सगळेच जण थोडे थोडे चुकत आहोत. ज्यांना योग्य काही करायचंय त्याला पाठिंबा मिळाला पाहिजे."

दुपारी 3.30 - शिवसेनेची मुदतवाढीसाठी सुप्रीम कोर्टात धाव

शिवसेनेने राज्यपालांच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात खटला दाखल केला आहे, असं शिवसेनेचे प्रवक्ते अनिल परब यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितलं.

काही जणांना 48 तास मुदत मिळाली होती. आम्हाला मात्र 24 तासांत पाठिंब्याची पत्र आणणं शक्य नव्हतं. त्यामुळे तीन दिवसांचा अवधी मागितला होता, असं ते यावेळी म्हणाले.

Image copyright ANI

नैसर्गिक न्याय पायदळी तुडवला जात असल्याची तक्रारही त्यांनी केली. "काही जणांना 48 तास मुदत मिळाली होती. आम्हाला मात्र 24 तासांत पाठिंब्याची पत्र आणणं शक्य नव्हतं. त्यामुळे तीन दिवसांचा अवधी मागितला होता. सगळ्यांना समान आणि पुरेसा वेळ द्यायला पाहिजे," असं ते म्हणाले.

दुपारी 3.25 - राष्ट्रपती राजवटीची शिफारस

राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केल्याची बातमी ANI वृत्तसंस्थेने दिली आहे.

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा राज्यपालांची ट्वीट

संविधानाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाला कामं करता येणं शक्य नसल्याची खात्री पटल्यामुळे, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी संविधानाच्या कलम 356 मधील तरतुदींनुसार अभ्यास करून अहवाल सादर केला आहे, असं ट्वीट राज्यपाल कोश्यारी यांनी केलं आहे.

दुपारी 2.45: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची पत्रकार परिषद

सर्व आमदारांच्या बैठकीत पर्यायी सरकार स्थापन करण्यासाठीचे सर्व अधिकार शरद पवार यांना देण्यात आले आहेत.

 • तीन पक्ष सत्तेत सहभागी झाल्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही. संध्याकाळी काँग्रेसच्या नेत्यांबरोबर चर्चा होणार आहे, त्यानंतर सर्व निर्णय होणार.
 • आज रात्री 8.30 वाजेपर्यंतचा वेळ आहे. अहमद पटेल, के.सी. वेणुगोपाल, मल्लिकार्जुन खरगे हे मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरला येत आहेत.
 • राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली नाही, असं राजभवनानं स्पष्ट केलं नाही.

दुपारी 2.23:राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली तर शिवसेना सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता. उद्धव ठाकरेंची कपिल सिब्बल आणि अहमद पटेल यांच्याशी चर्चा.

Image copyright ANI

दुपारी 2.19: आम्हाला आज वेळ आहे. काँग्रेसचे नेते आले आहेत. काही सकारात्मक होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी बरोबर बैठक होईल. मग आम्ही पावलं उचलू. कोणी उशीर केला या वादात पडायचं नाही. सगळी चिन्हं सकारात्मक आहे. आम्ही सरकार स्थापन करू असा आम्हाला विश्वास आहे.- अशोक चव्हाण

दुपारी 2.16:आज आमची बैठक आहे. आम्ही एकत्र कशा पद्धतीने जाणार आहे याचा निर्णय एक दोन दिवसात होईल.- माणिकराव ठाकरे.

जेव्हा आम्ही एकत्र बसू तेव्हा शिवसेना नेते आमच्याबरोबर असेल. काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा अशी काँग्रेसची मागणी नाही. पाच वर्षं सरकार टिकवायचं असेल तर अनेक मुद्यावर सहमती हवी. त्यासाठी आम्ही एकत्र चर्चा करू. विचारसरणीच्या फरकारसाठी कॉमन कार्यक्रम करू. त्यावर चर्चा झाली की आम्ही पुढे जाऊ.

दुपारी 2.04 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली मंत्रिमंडळाची बैठक. राज्यात राष्ट्रपती राजवटीची शक्यता.

दुपारी 1.49: 'राष्ट्रपती राजवट लागू करण्याची राज्यपालांची शिफारस'

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राज्यपालांनी केल्याची बातमी दूरदर्शनने सूत्रांच्या हवाल्याने ट्वीट केली आहे.

Image copyright Twitter

दुपारी 1.26 : आमचा पक्ष कुणालाही पाठिंबा देणार नाही- ओवैसी

 "भाजप आणि शिवसेना हे दोघं हिंदुत्वाला मानणारे आहेत, त्यांनी विचार केला पाहिजे, महाराष्ट्राला सरकारची गरज आहे. आमचा पक्ष शिवसेना किंवा भाजपचं कुणाचंही सरकार येत असेल तर त्यांना पाठिंबा देणार नाही. आमच्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये कुठलाही फरक नाही. मतांचं विभाजन आता कोण करत आहे हे लोकांना कळेल." असं ते म्हणाले.

12.49 : मतभेद असले तरी एकमेकांच्या तब्येतीची चौकशी करणे ही संस्कृती- आशिष शेलार

भाजप नेते आशिष शेलार यांनी संजय राऊत यांची लीलावती रुग्णालयात भेट घेतली. ते म्हणाले, "आमचे मित्र' संजय राऊतजी जे सामनाचे मित्र आहेत त्यांच्या तब्येतीचे चौकशी करण्यासाठी आलो होतो. कोणतीही राजकीय चर्चा नाही. किंबहुना त्यांनी कमी बोलावे अशीच आमची अपेक्षा आहे तब्येतीच्या कारणाने."

12.34: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल आणि मल्लिकार्जून खरगे मुंबईत येणार

12.16 :शरद पवार आणि सोनिया गांधींशी चर्चा झाली. चर्चेमध्ये काय होईल हे सांगता येत नाही. आम्ही दोघं एकत्र मिळून निर्णय घेऊ.- मल्लिकार्जून खरगे

11.54: शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या भेटीसाठी लीलावती रुग्णालयात पोहोचले.

11.17 - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दाखल. रोहित पवारही उपस्थित.

11.01- सत्तास्थापनेला पेचप्रसंग नक्की सुटेल. कुणाचं काही चुकलं नाही. लवकरच सरकार स्थापन होईल. चर्चा सुरू होईल. घाबरण्याचं कारण नाही असं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ माध्यमांशी बोलताना म्हणाले.

10.46: काँग्रेस कोअर कमिटीची बैठक रदद्. महाराष्ट्रातील नेते परत मुंबईला परतणार.

10: 25 : शिवसेना नेते अरविंद सावंत यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे. अरविंद सावंत यांनी काल (11 नोव्हेंबर) केंद्रीय अवजड उद्योग मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

10.00 : राष्ट्रवादीनं एकट्यानं निर्णय घेऊन काही घडणार नाही- अजित पवार

"आम्ही दिवसभर वाट पाहिली. मात्र, संध्याकाळपर्यंत त्यांचं पत्र नव्हतं. सकाळी 10 पासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आम्ही सर्वजण पत्राची वाट पहात होतो. आधी सकाळी पत्र मिळेल असं सांगितलं, त्यानंतर आम्ही वाट पाहिली. तरीही पत्र मिळालं नाही. लवकरात लवकर पत्र द्या अशी विनंती केली. आम्ही एकटं काही करू शकत नाही. काँग्रेसशी चर्चा झाल्याशिवाय आम्हाला कोणताही निर्णय घेता येत नाही," असं अजित पवार यांनी म्हटलं.

"मी आमदारांची बैठक बोलावली आहे असं शरद पवारांनी काल काँग्रेसला सांगितलं. आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा जनादेश दिला आहे. आम्ही एकट्याने निर्णय घेतल्याने सरकार स्थापन होणार नाही. आम्ही कालपासून त्यांना बोलावतोय. अजूनही कुणी आलेलं नाही. ते आल्यावर आम्ही तातडीने चर्चा करू. आमची 2 वाजता बैठक आहे," असंही अजित पवार यांनी सांगितलं.

काँग्रेस कोअर कमिटीची बैठक 10 वाजता सुरू होणार आहे.

काल राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ने वेगवेगळ्या बैठका घेऊन शिवसेनेला पाठिंबा द्यावा की नाही याबाबत चर्चा केली. भिन्न विचारसरणीचे हे दोन पक्ष एकत्र येणार का याबाबत दिवसभर उत्सुकतेचं वातावरण होतं.

संध्याकाळी आदित्य ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर विविध चर्चांना पूर्णविराम मिळाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांची भेट घेतली. आज पुन्हा सरकार स्थापनेबाबत वेगवान घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

9.45 : शरद पवार लीलावतीकडे रवाना

संजय राऊतांची भेट घेण्यासाठी शरद पवार लीलावती हॉस्पिटलकडे रवाना. तत्पूर्वी मी फक्त काँग्रेस अध्यक्षांशी बोलतोय, मी बाकी कुणाशी बोलत नाही असं ते प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)