गुरुनानक जयंती : भारतासोबत पाकिस्तानातही साजरं होत आहे प्रकाश पर्व

शीख Image copyright EPA

शीख धर्माचे संस्थापक आणि शिखांचे पहिले गुरू गुरुनानक देव यांची 550वी जयंती आज देशभरात साजरी करण्यात येत आहे. या निमित्ताने भारत आणि पाकिस्तानमध्येही प्रकाश पर्व साजरं करण्यात येत आहे.

मुस्लिम समाजही गुरुनानकांना एक फकीर म्हणून पूजतो. अनेक धर्मांमध्ये गुरुनानक देव यांना 'गुरू' मानलं जातं. गुरुनानक जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी प्रकाश पर्वाचं आयोजन करण्यात येतं पण यावर्षीचं प्रकाशपर्व विशेष आहे.

भारत - पाकिस्तानदरम्यान कर्तारपूर कॉरिडोर खुला करण्यात आला आहे. ही ती जागा आहे जिथे गुरुनानकांनी आपल्या आयुष्याची शेवटची 18 वर्षं घालवली होती.

Image copyright Getty Images

9 नोव्हेंबरला भारतातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानतर्फे त्यांचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या कर्तारपूर कॉरिडॉरचं उद्घाटन केलं. इथून प्रवास करणाऱ्या पहिल्या पथकात व्हीव्हीआयपींचा समावेश असला तरी त्यानंतर सामान्यांनाही कर्तारपूर दर्शनासाठी जाता येतंय.

प्रकाशपर्वाच्या निमित्ताने इथे मोठ्या संख्येने लोक दाखल होण्याची अपेक्षा आहे. गुरुनानकांच्या आयुष्यातल्या तीन महत्त्वाच्या टप्प्यांच्या दृष्टीने त्यांचं जन्मस्थान ननकानासाहिब (पाकिस्तान), सुलतानपूर लोधी (भारत) आणि कर्तारपूर या शहरांना विशेष महत्त्व आहे.

ननकाना साहिब

गुरुनानकांचं हे जन्मस्थळ आज पाकिस्तानात आहे. ही जागा लाहोरपासून जवळपास दीड तासाच्या अंतरावर आहे. दरवर्षी हजारोंच्या संख्येने शीख भाविक इथे दर्शनासाठी येतात.

बीबीसीचे प्रतिनिधी रविंद्र सिंह रॉबिन सांगतात, की ज्याप्रकारे आपण रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव साजरा करतो तसंच हे 550वं प्रकाश पर्व आहे. वर्षं महत्त्वाचं असलं तरी गुरुनानकांचं हे प्रकाशपर्व शीख समुदाय दरवर्षी इतक्याच श्रद्धेने साजरा करतो.

यावर्षीच्या प्रकाशपर्वाच्या निमित्ताने फक्त भारतातूनच 4200 लोक इथे दाखल झाल्याचं रॉबिन सांगतात.

Image copyright Getty Images

बीबीसीचे प्रतिनिधी अली काजमी सध्या तिथेच आहेत. ते सांगतात, "सध्याचं इथलं वातावरणच वेगळं आहे. हजारोंच्या संख्येनं भाविक दाखल झाले आहेत. इथे शीख अल्पसंख्याक असले तरी सध्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात शीख पहायला मिळत आहेत."

अनेकजण गेल्या अनेक आठवड्यांपासून इथल्या हॉटेल्स आणि तंबूंमध्ये राहत असल्याचं ते सांगतात. हे 550वं प्रकाश पर्व असल्याने मिरवणूक काढण्यात येणार आहे.

मुख्य गुरुद्वाऱ्यापासून सुरू होणारी ही मिरवणूक शहरातल्या इतर 6 गुरुद्वाऱ्यांवरून जाईल. गुरुनानकांच्या लहानपणीच्या आठवणी आणि संदेशांची आठवण म्हणून हे गुरुद्वारे उभारण्यात आले आहेत. गेल्या आठवडाभरापासून यासाठीची तयारी करण्यात येत आहे. कर्तारपूर कॉरिडॉर खुला झाल्याने यावर्षी इथे येणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचंही अली सांगतात.

सुलतानपूर लोधी

गुरुनानकांच्या आयुष्यातलं हे दुसरं महत्त्वाचं ठिकाण असं म्हणता येईल. भारतातल्या या जागी त्यांनी जवळपास 14-15 वर्षं घालवली. त्यांच्या वास्तव्याशी संबंध असलेल्या 5 महत्त्वाच्या जागा इथे आहेत.

Image copyright Getty Images

बेबे नानकी यांचं घर

इथे गुरूनानक यांची बहीण आपले पती जय रामजी यांच्यासोबत राहत असे. इथली पाणपोई आजही सुरू आहे. घराच्या पहिल्या मजल्यावर गुरू ग्रंथ साहिब ठेवण्यात आलाय आणि तिथे एक संग्रहालयही आहे.

गुरुद्वारा हट साहिब

नानकी यांचे पती जय रामजी यांनी सुलतानपूर लोधीमधल्या एका गुरुद्वारामध्ये गुरुनानक देव यांची नियुक्ती केली होती. त्याच ठिकाणी आज हा गुरुद्वारा हट साहिब आहे.

गुरुद्वारा बेर साहिब

या ठिकाणी गुरुनानक ध्यानधारणा करायचे. इथे असलेलं एक बोराचं झाड गुरूनानक यांनी लावलं असल्याचं शीख समुदायाची धारणा आहे.

Image copyright Getty Images

गुरुद्वारा संत घाट

ना हिंदू - ना मुस्लिम हा संदेश गुरुनानक यांनी इथेच दिला होता.

सुलतानपूर लोधी नावाची ही जागा भारतातल्या पंजाबमधील कपूरथलाजवळ आहे. इथल्या नवाब दौलत लोधी यांच्याकडे गुरूनानकांनी कामही केल्याचं मानलं जातं. त्यांच्या मुलांचा जन्मही इथेच झाला.

कर्तारपूर गुरुद्वारा

कर्तारपूर साहिब पाकिस्तानात असलं तरी ते भारतापासून फक्त साडेचार किलोमीटरवर आहे.

शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक 1522मध्ये कर्तारपूरला आले होते, असं मानलं जातं. आपल्या आयुष्याची शेवटची 18 वर्षं त्यांनी इथेच घालवली.

Image copyright Reuters

कर्तारपूरमधल्या ज्या जागी गुरु नानकांचं निधन झालं तिथेच गुरुद्वारा उभारण्यात आल्याचं मानलं जातं.

या गुरुद्वाऱ्यात एक विहीर आहे. असं म्हणतात, की ही विहीर गुरुनानकांच्या काळापासून इथे आहे आणि म्हणूनच भाविक या विहीरीला मानतात.

याच विहीरीजवळ एका काचेच्या कपाटात बॉम्बचा एक तुकडाही ठेवण्यात आलाय. 1971च्या युद्धादरम्यान हा बॉम्ब इथे पडल्याचं सांगितलं जातं.

इथे सेवा करणाऱ्यांमध्ये शीख आणि मुसलमान अशा दोघांचाही समावेश आहे.

रावी नदीला आलेल्या पुरात या गुरुद्वाऱ्याचं मोठं नुकसान झालं होतं. त्यानंतर 1920 ते 1929 या काळात पतियाळाच्या महाराजांनी याची पुनर्उभारणी केली.

भारत - पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर हा गुरुद्वारा पाकिस्तानात गेला. 1995मध्ये पाकिस्तान सरकारने याच्या काही भागांचं पुनरुद्धार केला.

प्रकाश पर्व म्हणजे काय आणि कसं साजरं केलं जातं?

गुरुनानक यांचा जन्मदिवस शीख समुदायात 'प्रकाश पर्व' म्हणून साजरा केला जातो.

Image copyright EPA

या विशेष दिवशी शीख लोक गुरुद्वाऱ्यात जातात. शिवाय ज्या गुरुद्वाऱ्यांमध्ये तळं असेल तिथे स्नान केलं जातं. प्रत्येक गुरुद्वाऱ्यामध्ये धार्मिक कार्यक्रमांचं आणि लंगरचं आयोजन केलं जातं. गुरुद्वारे सजवण्यात येतात आणि लोक घरी दिवे लावून हा दिवस साजरा करतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)