महाराष्ट्र: शिवसेनेला पाठिंबा देणारी काँग्रेस-राष्ट्रवादीची पत्रं अडकली तरी कुठे?

पवार, उद्धव ठाकरे Image copyright ANI / Getty
प्रतिमा मथळा पवार, उद्धव ठाकरे

शिवसेनेला पाठिंबा देण्याचं काँग्रेस- राष्ट्रवादीचं पत्र नेमकं कुठे अडकलं? सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेसचं पत्र तयार होतं, पण राष्ट्रवादीनं पत्र दिलं नव्हतं असं म्हटलं. तर अजित पवार यांनी काँग्रेसमुळे उशीर झाल्याचं म्हटलं. नवाब मलिक यांनी आधी शिवसेनेनं एनडीएतून बाहेर पडण्याची अट शिवसेनेला पत्रासाठी घातली होती. मग शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचं पत्र त्यांना का वेळेत मिळालं नाही?


रविवारी रात्री सत्तास्थापनेसाठी राज्यपालांनी शिवसेनेला आमंत्रण दिलं आणि सोमवारी मुंबई आणि दिल्लीत खलबतं सुरू झाली.

जोपर्यंत काँग्रेसचा निर्णय येणार नाही तोपर्यंत आम्ही निर्णय कळवणार नाही. त्यांचा निर्णय आल्यावर आम्ही आमची भूमिका ठरवणार असं, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सोमवारी दुपारी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. दोघांमध्ये 40 मिनिटं चर्चा झाली.

अशात सर्वांच्या नजरा दिल्ल्लीकडे लागल्या. नंतर मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये शरद पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते जमले. तिथंही बैठकांचं सत्र सुरू झालं. तिकडे दिल्लीत काँग्रेसनं सकाळी सोनिया गांधींच्या घरी एक बैठक बोलावली.

या पहिल्या बैठकीत कुठलाच निर्णय झाला नाही. म्हणून दुपारी 4 वाजता पुन्हा बैठक बोलावण्यात आली. या बैठकी दरम्यानच काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोनवरून थोडावेळ चर्चा केल्याचं वृत्त ANI या वृत्तसंस्थेनं दिलं.

पण दोन तास झाले तरी बैठक काही संपेना. संध्याकाळचे सहा वाजले. शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता आणि आनंद अशा दोन्ही भावना दिसू लागल्या. वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर वेगवेगळ्या बातम्या येऊ लागल्या. आता सत्तास्थापनेपासून शिवसेना फक्त एक पाऊलच दूर अशा चर्चा सुरू झाल्या. ब्रेकिंगवर ब्रेकिंग येऊ लागल्या. मुख्यमंत्री कोण होणार, या प्रश्नापासून ते शपथविधी कुठे आणि कसा होणार, हेसुद्धा वृत्तवाहिन्यांवर यायला सुरुवात झाली.

Image copyright RajBhavan

मालाडच्या रिट्रीट हॉटेलमधल्या शिवसेना आमदारांनी जल्लोष सुरू केला. तरीही काँग्रेसच्या गोटातून काहीच माहिती पुढे येत नव्हती.

तिकडे राज्यपालांनी शिवसेनेला दिलेली वेळ मिनिटागणिक कमी होत होती. शेवटी काँग्रेसच्या पाठिंब्याच्या पत्राची वाट पाहाणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनी मातोश्रीवरून आदित्य ठाकरे यांच्यासह राजभवनाकडे धाव घेतली. साडेतास वाजता हे स्पष्ट झालं की राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी जास्तीची मुदत वाढवून देण्यास नकार दिला. तसंच ठरलेल्या मुदतीत शिवसेनेला ना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याचं पत्र मिळालं ना काँग्रेसच्या. आणि शिवसेनेच्या हातातोंडाशी आलेला घास काही क्षणात दूर गेला!

त्यानंतरच्या काही मिनिटांमध्ये काँग्रेसनं एक पत्रक जारी केलं. त्यात "सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली तसंच शरद पवारांशी महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केल्याचं म्हटलं. शिवाय ही चर्चा पुढे सुद्धा सुरू राहील," असं स्पष्ट केलं.

Image copyright Inc

काही मिनिटांपूर्वी पाठिंब्याच्या पत्राची चर्चा सुरू असताना काँग्रेसच्या या पत्रानं सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं. काँग्रेस कन्फ्युज्ड आहे का, अशा चर्चा सुरू झाल्या. अशात राष्ट्रवादीला राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी विचारणा केली.

सोमवार दिवसभर बैठकांवर बैठकाचं सत्र दोन्ही काँग्रेसनं घेऊनही माशी नेमकी कुठे शिंकली? शिवसेनेला दोन्ही काँग्रेसकडून वेळेत पत्रं का मिळू शकली नाही, याची चर्चा सुरू झाली.

दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 नोव्हेंबरला सकाळी पत्रकारांनी अजित पवार यांना याबाबत प्रश्न विचारले. त्यावेळी काँग्रेसचे नेते दिल्ली आणि जयपूरमध्ये असल्यानं त्यांच्याशी चर्चा करणं कठीण होऊन बसल्याचं म्हटलं. एकप्रकारे अजित पवार यांनी पत्र द्यायला काँग्रेसकडूनच उशीर झाल्याचं सूचित करून टाकलं.

"आम्ही लेटर द्यायच्या आधी, आम्ही आदल्या दिवशीदेखील त्यांच्याशी चर्चा करायला तयार होतो. त्यांची सगळी लोक जयपूरला, आम्ही मुंबईमध्ये, वरिष्ठ नेते दिल्लीला. इथं सगळे लोक असते तर निर्णय घ्यायला सोपं गेलं असतं. लवकरात लवकर मुंबईत येण्याची विनंती आम्ही त्यांना केलेली. सरकार स्थापन करायचं असेल तर काँग्रेसशी चर्चा केल्याशिवाय पुढचा कुठलाही निर्णय आम्ही घेऊ शकत नाही," असं अजित पवार म्हणाले

ते पुढे म्हणाले, "काँग्रेसशी चर्चा केल्याशिवाय आम्हाला कुठलाही निर्णय घेता येत नाही, हे फॅक्ट आहे. शिवसेना जो काही निर्णय घेत आहे, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं काही जरी निर्णय घेतला तरी सरकार स्थापन होऊ शकत नाही. ज्यावेळेस आमच्याबरोबर काँग्रेस येईल तेव्हाच काहीतरी मार्ग निघू शकतो. त्यांचे आणि आमचे हायकमांड यांच्यात जी काही चर्चा होईल त्यातूनच काहीतरी निर्णय घेता येईल.

"आम्हाला मिळालेल्या पत्रानुसार आजच सगळ्या आमदारांच्या सह्या घेणं शक्य नाही. त्याबद्दल बोलू आम्ही. हे सगळं पार पडल्यावर तीनही पक्षांमध्ये अनुकूल चर्चा झाल्या पाहिजेत. शिवसेनेबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सरकार चालवलेलं नाही. त्याचाही विचार करायला पाहिजे. चर्चेतून जे फलित निष्पन्न होईल ते कळेलच," त्यांनी सविस्तर सांगितलं.

प्रतिमा मथळा राजभवन

पण याच संदर्भातला प्रश्न काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांना पत्रकारांनी विचारल्यावर त्यांनी "काँग्रेसने पत्र द्यायला कुठलाही उशीर केलेला नाही. आम्ही सुरुवातीपासूनच अलर्ट होतो, राष्ट्रवादी काँग्रेसला तुम्ही पत्र दिलं का, असं आम्ही विचारलं तर त्यांनी दिलं नव्हतं. जे काय करायचं आहे ते दोघांना एकत्र करावं लागेल," असं उत्तर दिलं.

म्हणजेच सुशीलकुमार शिंदे यांनी एक प्रकारे राष्ट्रवादीनं त्यांचं पत्र दिलं नव्हतं, त्यामुळे काँग्रेसनेही दिलं नाही, असं सूचित केलं आहे.

मग नेमका पाठिंब्याचं पत्र द्यायला उशीर कुणी केला आणि अशा काय घडामोडी घडल्या की शिवसेनेला वेळेत आमदारांच्या यादीची यादी राज्यपालांना देता आली नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)