संजय राऊत यांच्या 'शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार' या वक्तव्य करण्यामागचा अर्थ काय?

संजय राऊत Image copyright Getty Images

महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, असा निर्धार शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

अँजिओप्लास्टी झाल्यावर लीलावती रुग्णालयातून त्यांना आज डिस्चार्ज मिळाला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा निर्धार व्यक्त केला आहे.

शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर वाटाघाटी सुरू केल्यानंतर संजय राऊतांनी केलेलं हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे.

"संजय राऊत त्यांच्या भूमिकेचा पुनरुच्चार करत आहेत. भाजप असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असो आमची भूमिका कायम आहे. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवरून त्यांचं भाजपशी फिस्कटलं होतं, त्यामुळे आता सुद्धा ते दोन्ही काँग्रेसशी वाटाघाटी करताना ठाम आहेत. हेच सांगण्याचा प्रयत्न ते करत आहेत," असं फ्री प्रेस जर्नलचे राजकीय संपादक प्रमोद चुंचूवार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं आहे.

"शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागांमध्ये फक्त 2 जागांचा फरक आहे. त्यामुळे अडिच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावर राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये एकमत होऊ शकतं," असंही चुंचूवार यांना वाटतं.

राजकीय विश्लेषक संजय जोग यांच्या मते संजय राऊत यांचं हे वक्तव्य भाजपला इशारा आहे.

"शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा सुरू केली आहे. आता शिवसेनेच्या नेत्यांची आघाडीच्या नेत्यांशी चर्चा सुरू झाली. शिवसेनाला आता भाजपशी कुठलीही तडजोड करायची नाही, हा संदेश संजय राऊत यांना त्यांच्या वक्तव्यातून द्यायचा आहे," असं जोग यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं आहे.

नारायण राणेंनी जे वक्तव्य केलं आहे, त्याला सुद्धा संजय राऊत यांना त्यांच्या या वक्तव्यातून संदेश द्यायचा आहे, असं जोग सांगतात.

भाजपलाही वेळ वाढवून मिळाला नव्हता - दानवे

"कोणताच राजकीय पक्ष सत्तास्थापनेसाठी दावा करू शकत नाही असं राज्यपालांना आढळून आलं तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू झाली. भाजपनंही वेळ वाढवून मागितली होती. पण इतर पक्षांप्रमाणेच भाजपलाही वेळ वाढवून मिळाली नव्हती," असं भाजप नेते रावसाहेब दानवे म्हणाले.

शिवसेनेचे आघाडीशी सूत जुळत आहेत, त्याबद्दल विचारल्यावर ते 'एबीपी माझा'शी बोलताना म्हणाले, "आम्ही किमान समान कार्यक्रम समान केला होता. काही मुद्दे घेऊन आम्ही एकत्र गेलेलो. काही मुद्दे बाजूला ठेवून आम्ही पुढे गेलो."

"अशाच प्रकारे शिवसेनेला राष्ट्रवादीचा समान कार्यक्रम मान्य असेल तर शिवसेनेने पुढे जायचं आहे. एकमत करायचं की नाही हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं ठरवायचं आहे. शिवसेनेने पूर्वी ज्या मु्द्द्यांना विरोध केलाय काँग्रेस आणि राष्ट्रवादीला, त्याच मुद्द्यांचा आता विचार करावा लागणार आहे."

एकत्र बसून निर्णय - अजित पवार

"शिवसेनेसोबत चर्चेपूर्वी आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र बसून निर्णय घेतील," असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे.

"किमान समान कार्यक्रम काय असेल, सरकार स्थापन करायचं झाल्यास महत्त्वाच्या पदाचं वाटप यासंदर्भात आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते चर्चा करतील. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अन्य नेते एकत्र येऊन आम्ही सर्व गोष्टी ठरवू. आम्ही मित्रपक्ष असून आमच्यात एकवाक्यता असणं गरजेचं आहे," असं अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.

राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांची आगामी काळातील भूमिका काय असेल याबद्दल अजित पवार बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी तीनही पक्ष सत्ता स्थापनेच्या दिशेनं जात असल्याचं स्पष्ट केलं. "काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये चर्चा सुरू आहे. सरकारमध्ये कोण कोणत्या पदांवर काम करेल हे ठरवावं लागेल, आगामी निवडणुकांमध्ये तीनही पक्षांची काय भूमिका असेल यावर चर्चा होणं गरजेचं आहे," असं अजित पवार यांनी म्हटलं.

"महाराष्ट्रात सध्याच्या स्थितीत कोणताही आमदार फुटणार नाही. चारपैकी तीन पक्ष जर एकत्र आले, तर त्यांच्यासमोर कुणीही निवडून येणार नाही," असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

काँग्रेस नेत्यांकडून संजय राऊतांची भेट

काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लीलावती रुग्णालयात जाऊन संजय राऊत यांची विचारपूस केली. 

"संजय राऊत आमचे जुने मित्र आहेत. संजय राऊत आजारी आहेत म्हणून त्यांची भेट घेतली, त्यांची विचारपूस केली. आत्ता राजकीय चर्चा झालेली नाही. योग्यवेळी योग्य लोक वाटाघाटीची चर्चा करतील," असं यावेळी बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. 

शिवसेनेबरोबरच्या वाटाघाटींबद्दल बोलताना ते म्हणाले, "काँग्रेस आणि राष्ट्रवादी पुढे कसं जायचंय, याबाबतीत निर्णय घेतील. त्यानंतर शिवसेनेबरोबर एकत्रित निर्णय होतील. कालच्या पार्श्वभूमीवर ही सदिच्छा भेट होती. एकत्र चर्चा करून पुन्हा शिवसेनेशी बोलू.

"आम्ही एकत्र बसून प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण करत आहोत. त्या पूर्ण झाल्यावरच आम्ही पुढे जायचं की नाही, याचा विचार करू."

काँग्रेस नेतेविश्वजित कदमहेही "स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न करतोय, त्यावर प्रक्रिया सुरू आहे," असं 'एबीपी माझा'वर बोलताना म्हणाले.

"भविष्यात संघर्षाचा काळ आहे हे लक्षात घेऊनच आम्ही निवडणूक लढवली होती. त्यानंतर विरोधी पक्षाची धुरा सांभाळायची अशा मानसिकतेत आम्ही होतो. गेल्या काही दिवसांमधल्या घडामोडींनंतर आम्ही स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न करतोय. त्यावर प्रक्रिया सुरू आहे.

"आम्ही आमच्या भावना पक्षातल्या ज्येष्ठांपर्यंत पोचवल्या. यातले अनेकजण अनुभवी आहेत. काही पडलेले असले तरी उत्तम संघर्ष करणारे उमेदवार होते. त्यांच्या भावना आम्ही पोहोचवल्या. महाराष्ट्राचं सरकार बनवताना अनेक मुद्द्यांवर चर्चा करावी लागते. ती होईलच. या निवडणुकीत जुन्या-नव्याचं चांगलं कॉम्बिनेशन झालं होतं. त्यामुळे सत्तेवर येवो न येवो महाराष्टातल्या जनतेला युवा नेतृत्व पाहायला मिळेल," असंही ते म्हणाले.

शिवसेनेसोबत आघाडीसंदर्भात चर्चा सुरूच 

गेल्या 24 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाला काल (12 नोव्हेंबर) अल्पविराम मिळाला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली असून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांत चर्चा सुरूच आहेत.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शिवसेनेने सत्तास्थापनेची मुदत वाढवून न दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल सेनेची बाजू कोर्टात मांडणार आहेत.

आम्हाला आता 48 तास नव्हे तर सहा महिन्याचा वेळ राज्यपालांनी दिला आहे, असा टोला काल उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत लगावला

भाजपने सत्ता स्थापन करण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर गेले दोन दिवस महाराष्ट्रात आणि दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला होता. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये अंतर्गत आणि काही अंशी परस्परांमध्ये चर्चा झाल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यासाठी 12 नोव्हेंबरच्या रात्री रात्री 8.30 वाजेपर्यंत मुदत दिली होती. मात्र दुपारीच राज्यपालांनी केंद्राकडे राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. राष्ट्रपतींच्या मंजूरीनंतर ती लागू करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि चर्चेनंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल असं सांगितलं.

उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेत राज्यपालांच्या निर्णयावर तिरकस शब्दांत टीका केली आणि अनेक अडचणीच्या प्रश्नांना बगल दिली. तर भाजपनेही काल 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतली असल्याचं माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलं. तर राज्याला लवकरात लवकर स्थिर सरकार लाभावं अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

दरम्यान काल रात्री शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्यात चर्चा झाल्याचं वृत्त ANI या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)