कर्नाटकचे 17 आमदार अपात्र घोषित; पुन्हा निवडणूक लढवू शकतात #5मोठ्या बातम्या

सुप्रीम कोर्ट Image copyright Getty Images

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. कर्नाटकचे 17 आमदार अपात्र घोषित; पुन्हा निवडणूक लढवू शकतात

कर्नाटक विधानसभा अध्यक्षांचा 17 आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टानं बुधवारी (15 नोव्हेंबर) कायम ठेवला आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.

न्यायाधीश रमना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं दिलेल्या निकालानुसार 5 डिसेंबरला होणाऱ्या पोटनिवडणुकीत या अपात्र आमदारांना सहभागी होता येणार आहे.

कर्नाटक विधानसभेचे सभापती के. आर. रमेश कुमार यांनी या आमदारांना अपात्र ठरवण्याचा आदेश 29 जुलैला दिला होता. कर्नाटक विधानसभेची मुदत संपेपर्यंत म्हणजेच 2023पर्यंत त्यांना अपात्र ठरवण्यात आलं होतं. अपात्र ठरवण्यात आलेल्या आमदारांपैकी 14 काँग्रेस आणि 3 संयुक्त जनता दलाचे होते.

29 जुलैला रोजी रमेश कुमार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या बहुमत चाचणीच्या वेळी 17 बंडखोर आमदारांना अपात्र ठरवलं होतं. हे सर्व आमदार अविश्वास ठरावाच्या वेळी अनुपस्थित होते. त्यामुळे काँग्रेस-जेडीएस आघाडीचं सरकार पडलं होतं. यानंतर भाजपनं सत्ता स्थापन केली.

2. राज्यातील 27 महापालिकांच्या महापौरपदासाठीच्या आरक्षणाची सोडत जाहीर

राज्यातील 27 महानगरपालिकांच्या महापौर पदाची आरक्षणाची सोडत नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर-पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

Image copyright MCGM
प्रतिमा मथळा मुंबई महापालिका

खुल्या प्रवर्गात मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, कल्याण -डोंबिवली, सांगली, उल्हासनगर महानगरपालिका या महानगरपालिकांचा समावेश आहे तर मागास प्रवर्गात लातूर, धुळे आणि अमरावती महानगरपालिकेचा समावेश आहे.

अनुसूचित जातीसाठी मीरा भाईंदर महानगरपालिका जागा राखीव आहे.

आरक्षण सोडत नियम 2017 मधील तरतुदीनुसार या सोडती काढण्यात आल्या. अनुसूचित जमातीची आरक्षण सोडत काढताना 2007 पासून अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या महानगरपालिकांना सोडतीतून वगळण्यात आलं आहे.

तसंच इतर संवर्गासाठी आरक्षण सोडत काढताना सध्या त्या संवर्गाचे आरक्षण असलेल्या महापालिकांना वगळण्यात येऊन इतर महापालिकांतून आरक्षण काढण्यात आलं आहे.

3. रफाल आणि शबरीमलाच्या फेरविचार याचिकांवर निकाल

शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश द्यायचा की नाही तसंच रफाल कराराच्या फेरविचार याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालय निर्णय जाहीर करणार आहे. इंडिया टुडेनं ही बातमी दिली आहे.

केरळमधल्या शबरीमलाच्या अय्यपा मंदिरात सर्व वयोगटाच्या महिलांना (मासिक पाळी येणाऱ्या महिलांसह) प्रवेश देण्याचा निर्णय 28 सप्टेंबर 2018ला सर्वोच्च न्यायालयानं दिला होता.

त्यानंतर या निकालावर एकूण 65 याचिका दाखल झाल्या असून त्यात 56 फेरविचार याचिका, 4 नव्या आणि 5 हस्तांतर याचिका आहेत.

Image copyright AFP

याशिवाय, फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हीएशन कंपनीकडून रफाल विमानं खरेदी करण्याच्या मुद्द्यावर मोदी सरकारला सर्वोच्च न्यायालयानं एका निर्णयाद्वारे क्लीन चिट दिली होती. या निर्णयावरही फेरविचार याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय गुरुवारी (14 नोव्हेंबर) निकाल जाहीर करणार आहे.

4. राष्ट्रवादीचे नऊ आमदार भाजपच्या संपर्कात : भाजप खासदार

राष्ट्रवादीचे 9 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, असं वक्तव्य माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केलं आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.

Image copyright Ranjeetsinha Naik Nimbalkar/ facebook
प्रतिमा मथळा रणजितसिंह नाईक-निंबाळकर

"काँग्रेस आणि शिवसेनेनं आपल्या आमदारांनी पक्षांतर करू नये म्हणून काळजी घेतली आहे. त्यामुळे सत्तास्थापनेचा घोडेबाजार होणार याची त्यांना भीती आहे. मात्र राष्ट्रवादीचे 9 आमदार आपल्या संपर्कात आहे," असं वक्तव्य निंबाळकर यांनी केलं आहे.

अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या पिकांची पाहणी निंबाळकर माढ्यात आले होते. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडीबाबत हे विधान केलं.

5. विकास आराखड्यानुसार अयोध्या 'अध्यात्मिक नगरी'

सर्वोच्च न्यायालयानं रामजन्मभूमी बाबरी-मशीद जमीन वादावरील निकालात राम मंदिर उभारणीचा मार्ग खुला केल्यानंतर अयोध्येचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे.

या आराखड्यानुसार अयोध्येत पंचतारांकित हॉटेल, रिसॉर्ट, आंतरराष्ट्रीय बस टर्मिनल आणि विमानतळ या सुविधा करण्यात येणार आहेत, लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

Image copyright Getty Images

"अयोध्या तीर्थ विकास परिषदेची स्थापना करण्यात येणार असून अयोध्येचं रुपांतर तिरूपतीसारख्या शहरात करण्यासाठी साधारण 4 वर्षं लागणार आहेत. अयोध्येत आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्यात येणार आहे. अयोध्येतील राम मंदिर देशातील सर्वांत मोठे धार्मिक ठिकाण राहील. 2000 कारागिरांनी रोज 8 तास काम केलं, तर अडीच वर्षांत मंदिराची निर्मिती होऊ शकेल. मंदिराच्या 77 एकर परिसरात अनेक धार्मिक संस्था उभारण्यात येणार आहेत. गोशाळा, धर्मशाळा, वैदिक संस्था यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. अयोध्येचा विकास 'अध्यात्मिक नगरी' म्हणून केला जाणार आहे," असं अयोध्येचे उपमाहिती संचालक मुरलीधर सिंग यांनी सांगितल्याचं बातमीत म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)