महाराष्ट्र सत्तास्थापनेचा तिढा: अजित पवार नाराज आहेत का?

अजित पवार Image copyright Getty Images

"नो कमेंट्स, नो कमेंट्स. मी बारामतीला चाललोय," शरद पवारांच्या सिल्व्हर ओक बंगल्यातून बाहेर पडल्यानंतर अजित पवारांनी काढलेले हे उद्गार.

बुधवारी (13 नोव्हेंबर) रात्री 8च्या सुमारास शरद पवारांच्या सिल्व्हर ओक बंगल्यातून अजित पवार तडकाफडकी बाहेर निघाले आणि गाडीत बसले.

"नो कमेंट्स, नो कमेंट्स. मी बारामतीला चाललोय," असं पत्रकारांच्या प्रश्नांवर ते जरा चिडून म्हणाले. त्यांच्यासोबत गाडीत जयंत पाटीलही बसले.

त्यानंतर, अजित पवार हे आघाडीच्या एका महत्त्वाच्या बैठकीतून रागात निघाले, अशी चर्चा सुरू झाली.

याबद्दल शरद पवार यांना विचारणा करण्यात आली, तेव्हा त्यांनी उलट पत्रकारांनाच सुनावलं.

"अजित पवार कुठेही गेलेले नाहीत. माध्यमांसमोर ते चेष्टेनं म्हणालेत. तुमच्या अशा मागे धावण्यानं काही प्रायव्हसी उरत नाही, त्यासाठी ते असं म्हणालेत," असं शरद पवार म्हणाले.

तर, "अजितदादा माझ्यासोबतच आहेत. ते उद्या बारामतीत जातील. आमची बैठक व्यवस्थित सुरू आहे. त्यात काहीही अडचण नाही. महाराष्ट्र राज्याला स्थिर आणि उत्तम काम करणारं सरकार देण्याचंच काम करतोय," असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.

"महाराष्ट्राचे प्रकल्प, नवे-अर्धवट राहिलेले, आर्थिक परिस्थिती, अशा विविध मुद्द्यांवर आम्ही चर्चा करून मगच शिवसेनेशी बोलणार आहोत," असंही ते पुढे म्हणाले.

थोड्या वेळाने माध्यमांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची समन्वय समितीची बैठक सुरू झाल्याची वार्ता आली आणि त्यानंतर काही फोटो माध्यमांमध्ये आले. पण, आघाडीतील सत्तावाटपाची चर्चा फिसकटल्यामुळे अजित पवार बैठकीतून बाहेर पडले होते, अशी चर्चा सुरू झाली.

सगळं काही आलबेल, की...?

अजित पवारांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेविषयी आम्ही ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांना विचारलं.

ते म्हणाले, "शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सत्तावाटपाचा फॉर्म्युला अद्याप समोर आलेला नाही, त्यामुळे अजित पवार नाराज आहेत, असं म्हणणं उचित ठरणार नाही. मुख्यमंत्रीपदाबाबत म्हणायचं झाल्यास पहिले अडीच वर्षं शिवसेनेचा मुख्यमंत्री असायला हवा, असं एकूण जनमानस आहे. याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला, तरी तो पुढच्या अडीच वर्षांसाठी असेल. त्यामुळे अजित पवार सत्तावाटपाच्या फॉर्म्युलावर नाराज आहेत, या निष्कर्षावर आताच पोहोचता येणार नाही."

Image copyright HANDOUT

लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या काळात ज्या घटना घडल्या त्या बघता अजित पवार अस्वस्थ असण्याची शक्यता आहे, असं मत लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान यांनी व्यक्त केलं.

ते म्हणतात, "2014ला राष्ट्रवादीच्या हातातून सत्ता गेली. 2019च्या लोकसभेला अजित पवार यांचा पुत्र पार्थ पवार यांचा पराभव झाला. तसंच 2004ला हाती आलेल्या मुख्यमंत्री पदानं अजित पवारांना हुलकावणी दिली, या सगळ्या घडामोडी बघता अजित पवार अस्वस्थ असू शकतात."

'स्थिर सरकार ही प्राथमिकता'

"अजित पवार यांच्यासारखा अनुभवी राजकारणी आजघडीला राज्यात स्थिर सरकार यावं, यासाठी प्रयत्नशील असेल. गेल्या 5 वर्षांत सत्तेशिवाय राहणं किती कठीण आहे, याचा अनुभव अजित पवारांना आलेला आहे. सिंचन घोटाळ्याची चौकशी असो की, राज्य सरकारी बँकेप्रकरणी दाखल झालेला गुन्हा, सत्तास्थापनेला अजित पवार यांची प्राथमिकता असेल," असं प्रधान सांगतात.

Image copyright Getty Images

"सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांचा प्रयत्न स्थिर सरकार देणं हा असेल. हेही तितकंच खरं आहे की, सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरल्यानंतर मुख्यमंत्री पद म्हणा की उपमुख्यमंत्री पद, ते मिळाल्याशिवाय अजित पवार गप्प बसणार नाहीत. कारण, त्यांनी स्वत:च्या हिमतीवर काही आमदार निवडून आणले आहेत," असं ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य सांगतात.

या सगळ्या अफवा - राष्ट्रवादी काँग्रेस

"आघाडीतील चर्चा फिसकटली आणि त्यामुळे अजित पवार नाराज आहेत, अशा बातम्या देणारी मंडळी नंतर तोंडाशी पडली आहे. कारण, त्यानंतर आघाडीची बैठक पार पडली. पण, अफवा पसरवणारी एखादी गँग असेल, तर आम्ही काय करणार?," असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी बीबीसीला सांगितलं.

सत्तावाटपाच्या चर्चेविषयी त्यांनी सांगितलं, "सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षात समान किमान कार्यक्रमावर संमती बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे."

यात कसली गुप्तता?

अजित पवारांच्या प्रतिक्रियेवर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं, "अजितदादा बोलताना जरा गावरान झटका देऊन जातात. तसंच बोलले आहेत ते फक्त. थोडी गुप्तता पाळण्यासाठी त्यांनी असं सांगितलं. अजितदादा कुठेही गेलेले नाहीत. ते मुंबईच आहेत."

Image copyright Getty Images

पण, तुम्ही एखाद्या बैठकीला जात आहात, आणि तशी माहिती पत्रकारांना सांगणं यात चुकीचं काय आहे. यात कसली गुप्तता पाळावी लागते, असा प्रश्न चोरमारे विचारतात.

अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीआधी आमदारकीचा राजीनामा दिला होता. फॉर्म भरण्याची मुदत संपण्यासाठी काही दिवस उरलेले असताना त्यांनी हा राजीनामा का दिला यावरूनही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)