नितीन गडकरीः क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतं...

नितीन गडकरी Image copyright TWITTER

महाराष्ट्रामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न चालवले असले तरी अद्याप त्याचं कोणतंही स्पष्ट चित्र तयार झालेलं नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत एका कार्यक्रमात एका प्रश्नाचं उत्तर देताना नक्की कोणाचं सरकार येईल ते माहिती नाही असं सांगून परिस्थितीवर भाष्य केलं.

महाराष्ट्रात नक्की कोणाचं सरकार स्थापन होईल आणि जर भाजपाशिवाय एखादं सरकार स्थापन झालं तर सध्या चालू असलेल्या पायाभूत प्रकल्पांचं काय होईल असा प्रश्न गडकरी यांना या कार्यक्रमात विचारण्यात आला.

त्यावर बोलताना गडकरी यांनी, तुम्ही योग्य प्रश्न एकदम अयोग्य व्यक्तीला विचारला आहे असं उत्तर देऊन आपला महाराष्ट्रातील सध्याच्या घडामोडींशी संबंध नसल्याचं सांगितलं. इतकच नव्हे तर मुंबईत काय चाललं आहे हे आपल्याला माहिती नाही, मला मुंबईबद्दल (मुंबईमध्ये सुरू असलेल्या घडामोडींबद्दल) फारसं माहिती नाही. मी नुकताच दिल्लीवरून आलो आहे. मी दिल्लीशी जास्त संबंधित आहे असंही ते म्हणाले.

'क्रिकेट आणि राजकारणात काहीही घडू शकतं'

राज्यातील सत्तास्थापनेवर भाष्य करताना त्यांनी क्रिकेट आणि राजकारणात काहीही घडू शकतं. कधीकधी तुम्ही पराभूत होत आहात असं वाटायला लागतं पण निर्णय त्याच्या अगदी उलट येतो असं सांगून त्यांनी भाजपची अजून संधी गेलेली नाही हेसुद्धा अप्रत्यक्षपणे सुचवलं.

महाराष्ट्रातील पायाभूत प्रकल्पांचं काय होईल हे जे आगामी सरकार तयार करत आहेत त्यांनाच विचारला पाहिजे. परंतु आपल्याकडील लोकशाही पद्धतीचा विचार करता सरकारं बदलली तरी प्रकल्पांचे काम सुरू राहाते. त्यामुळे राज्यातील प्रकल्प कोणतंही सरकार आलं तरी सुरू राहातील अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.

सत्तास्थापनेच्या तीन अंकी नाटकावर लक्ष ठेवून आहे- शेलार

भारतीय जनता पार्टीचं सध्या राज्यात सुरू असलेल्या तीन अंकी नाटकावर लक्ष आहे असं विधान भाजप नेते आशीष शेलार यांनी केलं आहे. आज भाजपच्या आणि सहकारी पक्षाच्या आमदारांची एकत्र बैठक मुंबईत झाली. त्या बैठकीत नवनिर्वाचित आमदारांना देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केलं असं शेलार यांनी सांगितलं.

सत्तास्थापनेसाठी सुरू असलेल्या चर्चांवर आम्ही लक्ष ठेवू. राज्यभरातील 90 हजार बूथवर भाजपच्या संघटना पातळीवर निवडणुका होणार आहेत. त्या प्रत्येक बुथवर भाजपची संघटना बळकट होण्यासाठी पक्षाचे आमदार काम करणार आहेत.

ग्रामीण, शहरी भागातील आमदार, विधानपरिषदेतील आमदार अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या लोकांना भेटण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी सलग दोन ते तीन दिवसांचा दौरा करतील असंही त्यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांचं दुःख समजून घ्या: देवेंद्र फडणवीस

भाजपाच्या विधानसभा, विधानपरिषद सदस्यांच्या बैठकीत भाजपा विधिमंडळ पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणातील प्रमुख मुद्दे असे....-भाजपाला अतिशय भक्कम यश या निवडणुकीत प्राप्त झाले. प्रत्येक विभागात सर्वाधिक यश, सर्व समाजघटकांना प्रातिनिधित्व प्राप्त झाले.- भाजपचा मोठा सहभाग असल्यानेच मित्रपक्षांच्या जागा अधिक आल्या. भाजपचे नेते सेनेच्या अनेक मतदारसंघात गेले. पण सेनेचा नेता भाजपा उमेदवारांच्या मतदारसंघात प्रचाराला आला नाही.- भाजप वगळता कोणतेही सरकार राज्यात तयार होऊ शकत नाही, अशीच राजकीय स्थिती आहे आणि त्याचा निर्णय योग्य वेळी पक्ष घेईल.- सर्व आमदारांनी जनतेत जावे आणि तेथे काम करावे. मुंबईत थांबण्याची गरज नाही. - शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी व्हा, त्यांना दिलासा द्या, त्यांना मदत करा- शेतकऱ्यांना भक्कम मदत मिळेल, हे सुनिश्चित करा. सत्तेसाठी भाजपा काम करीत नाही, तर जनतेसाठी काम करणे, हे आपले पहिले लक्ष्य आहे.- शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विविध सूचना यावेळी ऐकून घेण्यात आल्या.- संघटना वाढीसाठी प्रत्येकाने योगदान द्यावे. भविष्यातील आपले ध्येय हेच असले पाहिजे.- नेतृत्वाचा आमदारांवर विश्वास असलेला एकमेव पक्ष भाजपा आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)